Central Railways | भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांच्या तिकिटाच्या माध्यमातूनच पैसे कमावते असं नाही तर भंगार विक्रीतूनही रेल्वेला दरवर्षी करोडो रुपयांचा फायदा होतो. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
खरं तर रेल्वे बोर्डाने ठरवलेले उद्दिष्ट ₹४५० कोटी होते, मात्र ते उद्दिष्ट पार करून मध्य रेल्वेने दमदार कामगिरी केली आहे. ही गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भंगार विक्रीत विविध प्रकारचे साहित्य समाविष्ट आहे. यात ४७,५०२ मेट्रिक टन रेल्वे रुळांचे भंगार, ३१,२९८ MT लोह-भंगार, ३,६१६ MT अलोह-भंगार, तसेच २,६५,६२५ स्लीपर्स, ५० लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स यांचा समावेश आहे. याचा अर्थ फक्त लोखंडाचे भंगार नव्हे, तर रेल्वे वाहने आणि उपकरणांची कार्यक्षम विल्हेवाटीही झाली आहे. Central Railways
मध्य रेल्वेच्या (Central Railways) स्टोअर्स विभागाने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. कुर्ला कटिंग यार्ड, नाशिक ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप आणि मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये भंगार विल्हेवाटी मोहिमा राबवल्या गेल्या. या केंद्रित उपक्रमामुळे महसूलात लक्षणीय वाढ झाली.
विभागानिहाय विक्रीत भुसावळ विभाग प्रथम क्रमांकावर आहे. भुसावळ विभागाने भंगार विक्रीतून तब्बल १०५.३९ कोटी महसूल मिळवला. त्यानंतर माटुंगा वर्कशॉप ₹६८.३९ कोटी, नागपूर विभाग ₹६४.०२ कोटी, मुंबई विभाग ₹५५.४९ कोटी आणि पुणे विभाग ₹५० कोटी इतके महसूल कमावले. उर्वरित महसूल इतर विभाग आणि उत्पादन युनिट्सकडून मिळाला.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य रेल्वेने फक्त भंगार विक्रीवर लक्ष केंद्रित केले नाही, तर संसाधनांचा कार्यक्षम वापरही केला. उदाहरणार्थ, नाशिक येथील एक रोटाटेक प्रिंटिंग मशीन, जे वापरले गेले नसले तरी कार्यरत होते, ते भंगारात टाकले नाही. त्याऐवजी, त्याची किंमत ८.७५ कोटी ठरवून प्रिंटिंग प्रेसकडे हस्तांतरित केले गेले. यावरून हि गोष्ट सिद्ध झाली कि मध्य रेल्वे संपत्ती व्यवस्थापनात अत्यंत विचारपूर्वक काम करत आहे.

