Fake Milk : तुम्ही रोज सकाळी अत्यंत विश्वासाने पीत असलेला चहा किंवा मुलांच्या आरोग्यासाठी दिलेले दूध शरीरात शक्तीऐवजी 'स्लो पॉयझन' तर ठरत नाही ना? अशी भीती निर्माण करणारा एक धक्कादायक खुलासा अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) कमिशनर तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
राज्यात केवळ दुधात पाणी मिसळण्याचे जुने धंदे आता राहिलेले नसून, थेट रासायनिक प्रयोगशाळेत तयार होणारे ‘कृत्रिम दूध’ थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले आहे.
नाममात्र खर्चात विषारी बनावट दूध
तुकाराम मुंढे यांनी एका विशेष मुलाखतीत दूध माफियांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात मिळणाऱ्या अस्सल दुधाला हुबेहूब टक्कर देणारे बनावट दूध बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, पाम ऑईल, इमल्सिफायर्स, कॉस्टिक सोडा आणि शॅम्पू तसेच कपडे धुण्याच्या डिटर्जंटचा उघडपणे वापर केला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या गाईच्या दुधासाठी नागरिक 60 ते 70 रुपये मोजतात, ते कृत्रिम दूध केवळ 15 रुपयांत तयार होते, तर म्हशीचे बनावट दूध 30 रुपयांत माफियांच्या अड्ड्यांवर बनवले जात आहे. या स्वस्त केमिकल लोचा मुळे प्रामाणिक व्यावसायिक देशोधडीला लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. Fake Milk
राज्याभरात धडक मोहीम; कोट्यवधींचे साहित्य जप्त
हा काळाबाजार मोडून काढण्यासाठी कमिशनर मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी कारवाई सुरू केली आहे. ठाणे, पुणे, सोलापूर, जालना आणि अहिल्यानगर (अहमदनगर) अशा अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या धाडसत्रात करोडो रुपयांचे पाम ऑईल, पांढरी केमिकल पावडर, शॅम्पू आणि दुधाचा दाटपणा वाढवणारी घातक रसायने जप्त करण्यात आली आहेत. सोलापूरच्या सांगोला भागात तर चक्क 37 हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले असून अनेक बेकायदेशीर कारखाने सील केले आहेत. Fake Milk
आरोग्यावर गंभीर परिणाम; यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका
वैद्यकीय तज्ज्ञांनी या रासायनिक दुधाच्या सेवनाबद्दल अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. दुधात मिसळले जाणारे शॅम्पू, डिटर्जंट आणि कॉस्टिक सोडा हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. या दुधाच्या सातत्यपूर्ण वापरामुळे माणसाची पचनसंस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते. तसेच यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा मोठा धोका असतो. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्तींना बसू शकतो, ज्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून थेट मानवी जिवाशी खेळ ठरत आहे. Fake Milk
सुजाण नागरिकांसाठी ओळखण्याची गुरुकिल्ली; अशी करा घरगुती चाचणी
तुमच्या घरातील दूध शुद्ध आहे की केमिकलचे, हे ओळखण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकार्यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत…
- थोडे दूध हाताच्या तळव्यावर घेऊन रगडा. जर तुम्हाला ते अतिशय गुळगुळीत आणि साबणासारखे चिकट वाटले, तर त्यात डिटर्जंट किंवा शॅम्पू असण्याची शक्यता जास्त असते.
- अस्सल दूध उकळल्यानंतर पांढरे किंवा हलके साययुक्त राहते. परंतु, रासायनिक बनावट दूध उकळल्यास त्याचा रंग हलका पिवळसर किंवा फिकट होतो.
- दुधाला नैसर्गिक सुवास असतो. जर दुधातून कपडे धुण्याच्या पावडरीसारखा किंवा तीव्र रासायनिक उग्र वास येत असेल, तर ते दूध अजिबात वापरू नका.
- भेसळयुक्त दूध जास्त तापवल्यास किंवा आटवल्यास ते खव्याऐवजी रबरासारखे चिवट बनत असल्याचेही काही कारवायांमध्ये उघड झाले आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एफडीए आता दूध पुरवठा साखळीत ‘ट्रेसेबिलिटी’ नियम लागू करत आहे. म्हणजेच दुधाची पिशवी किंवा पुरवठा नेमका कोणत्या शेतकऱ्याकडून किंवा संकलन केंद्रातून झाला, याची संपूर्ण नोंद ठेवावी लागेल. जोपर्यंत प्रत्येक थेंबाचा माग काढता येत नाही, तोपर्यंत हा काळा धंदा पूर्णपणे थांबवणे आव्हानात्मक आहे. नागरिकांनीही दूध खरेदी करताना ब्रँड आणि गुणवत्तेची खात्री करावी, तसेच संशयास्पद दूध आढळल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Fake Milk

