Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून सुरू असलेला पावसाचा खेळ आता थांबला आहे. आज महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा पूर्वपदावर आलं आहे. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी पुन्हा एकदा उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
अनेक ठिकाणी पारा ३७°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अक्षरशः उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागणार आहेत.
७ एप्रिल रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु हे २ जिल्हे सोडले तर राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळसह विदर्भाच्या इतर भागांत सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. या भागांत कमाल तापमान ३८°C ते ४२°C च्या दरम्यान, तर किमान तापमान २४°C ते २७°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. Maharashtra Weather Update
मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारपट्टीच्या पट्ट्यात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३२°C ते ३५°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान २४°C ते २६°C च्या आसपास राहू शकते. यामुळे हवेतील उच्च आर्द्रतेमुळे अस्वस्थपणा वाढण्याची शक्यता आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडेच राहील. या भागांत कमाल तापमान ३४°C ते ३८°C पर्यंत, तर किमान तापमान २०°C ते २३°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. Maharashtra Weather Update
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि नांदेड यांसारख्या भागांत तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. येथील तापमान ३६°C ते ४०°C पर्यंत असेल तर ते सातत्याने ४०°C पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ दिसून येईल. या भागांत दिवसाचे कमाल तापमान ३३°C ते ३७°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

