Dailyhunt
Mumbai Local Train : मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा; 1 मे पासून 14 नॉन-AC ट्रेन धावणार

Mumbai Local Train : मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा; 1 मे पासून 14 नॉन-AC ट्रेन धावणार

Mumbai Local Train | मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर १४ नॉन-AC लोकल गाड्यांचे रूपांतर AC (वातानुकूलित) सेवांमध्ये करण्यात येणार आहे.

१ मे पासून या लोकल ट्रेनच्या फेऱ्या होतील. प्रवाशांकडून वाढत्या आरामदायी प्रवासाच्या मागणीचा विचार करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उन्हामुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांची रेल्वेतील उकाड्यामुळे सुटका होणार आहे.

या बदलानंतर मध्य रेल्वेच्या AC उपनगरीय सेवांची एकूण संख्या तब्बल १०८ वर पोहोचणार आहे. यामध्ये हार्बर मार्गावरील २८ AC सेवा आणि मुख्य मार्गावरील ८० सेवांचा समावेश असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल, वाशी आणि बेलापूर या मार्गांवर धावणाऱ्या हार्बर लाईनवर या सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. Mumbai Local Train

विशेष म्हणजे, हार्बर मार्गावर AC लोकल सेवा यावर्षी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रथमच सुरू करण्यात आल्या होत्या. त्याला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता आणखी १४ सेवांचे रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या AC गाड्या दोन्ही दिशांनी CSMT कडे जाणाऱ्या (UP) आणि पनवेल, वाशी, बेलापूरकडे जाणाऱ्या (DOWN) धावणार आहेत.

प्रवाशांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून, या सेवांमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या 'पीक अवर्स'मधील गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

परंतु या AC सेवा फक्त सोमवार ते शनिवार या कामकाजाच्या दिवशीच चालवल्या जातील. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या गाड्या पुन्हा नॉन-AC स्वरूपात धावतील. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना हा फरक लक्षात ठेवणे गरजेचं आहे. Mumbai Local Train

या बदलामुळे काही सध्या सुरु असलेल्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, बेलापूर-CSMT सेवा पूर्वीपेक्षा लवकर सुटणार आहे, तर वाशी-CSMT आणि रात्री उशिराच्या काही सेवांच्या वेळांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांना स्पष्ट सल्ला दिला आहे की, प्रवास करण्यापूर्वी अपडेटेड वेळापत्रक तपासावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे हार्बर मार्गावरील प्रवास अधिक आरामदायी, वेगवान आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24