Mumbai Pune Expressway Toll | मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध शहरांना जोडणारा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आता प्रवाशांसाठी २०६० पर्यंत महागच रंगण्याची शकयता आहे.
कारण या महामार्गावरील टोल आता २०६० पर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या मागचं मुख्य कारण म्हणजे या महामार्गाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची तयारी सुरू आहे. सध्या आठ पदरी असलेला हा मार्ग पुढील काळात दहा पदरी करण्याची योजना आखली जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, म्हणजेच MSRDC, सध्या टोल वसुलीची मुदत वाढवण्याचा विचार करत आहे. आधी ही मुदत २०४५ पर्यंत होती, पण आता ती आणखी जवळपास १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या विस्तारासाठी आणि इतर सुधारणा कामांसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे. Mumbai Pune Expressway Toll
खरं तर, हा महामार्ग २००२ मध्ये सुरू झाला आणि सुरुवातीला असा अंदाज होता की २०१९ पर्यंत त्याचा खर्च वसूल होईल. त्यानंतर टोल बंद होईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात, देखभाल, दुरुस्ती आणि 'मिसिंग लिंक'सारख्या प्रकल्पांमुळे टोलची मुदत आधी २०३० आणि नंतर २०४५ पर्यंत वाढवली गेली.आता पुन्हा एकदा विस्ताराची योजना समोर आल्यामुळे निधी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारी निधी अपुरा असल्याने, कर्ज घेणे आणि टोल कालावधी वाढवणे हे पर्याय समोर ठेवले गेले आहेत. Mumbai Pune Expressway Toll
या विस्ताराचं काम पावसाळ्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, वाहतुकीवर फारसा परिणाम होऊ नये म्हणून हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर प्रचंड वाहतूक असते. रोज साधारण ६५ हजार वाहनं आणि सुट्टीच्या दिवशी तर एक लाखांहून अधिक वाहनं या मार्गावरून जातात. त्यामुळे वाढती गर्दी लक्षात घेता, हा मार्ग १० पदरी करण्यात येणार आहे.
मात्र, टोलची मुदत पुन्हा वाढवण्याच्या निर्णयामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मूळ खर्च आधीच वसूल झाला असताना अजूनही टोल का घेतला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, प्रकल्पाच्या खर्चाबाबत अधिक स्पष्टता हवी, अशी मागणीही केली जात आहे.

