Dailyhunt
Nagpur To Goa Train : नागपूर ते गोवा रेल्वे आता नियमितपणे धावणार; विदर्भवासीयांना मोठा फायदा

Nagpur To Goa Train : नागपूर ते गोवा रेल्वे आता नियमितपणे धावणार; विदर्भवासीयांना मोठा फायदा

Nagpur To Goa Train | मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, सध्या द्विसाप्ताहिक स्वरूपात धावणारी नागपूर-गोवा विशेष गाडी आता नियमित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे विदर्भातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून, प्रवाशांना त्यांच्या नियोजनांनुसार प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत गाडी क्रमांक 01139/01140 नागपूर-मडगाव विशेष गाडी 'स्पेशल चार्जेस'सह धावत होती, मात्र आता ती नियमित गाडी म्हणून 11203/11204 या क्रमांकाने धावणार आहे.

सध्या 'अजनी-मडगाव एक्सप्रेस'ला नागपूर ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या मार्गावर अधिक सोयीस्कर आणि नियमित सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. गोवा हे देशातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने, विदर्भ आणि गोवा यांच्यातील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठे महत्त्व आहे. आता हि रेल्वेगाडी नियमित झाल्याने पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत जाणून घ्यायचं झाल्यास, गाडी क्रमांक 11203 'नागपूर-मडगाव एक्सप्रेस' दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल आणि गुरुवारी व रविवारी सायंकाळी १७:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 11204 'मडगाव-नागपूर एक्सप्रेस' गुरुवारी आणि रविवारी रात्री २०:०० वाजता मडगावहून सुटेल आणि शुक्रवारी व सोमवारी रात्री २१:३० वाजता नागपूरला पोहोचेल. Nagpur To Goa Train

या ट्रेनला अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांचा समावेश आहे. Nagpur To Goa Train

रेल्वे प्रशासनाच्या मते, हि ट्रेन नियमित धावणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सोप्पा होईल. 'रेल यात्री संघ'ने (RYS) देखील या निर्णयाचे स्वागत केले असून, ही सेवा नियमित करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती. संघटनेचे सचिव ब्रिज भूषण शुक्ला यांनी सांगितले की, हा निर्णय प्रवाशांसाठी अत्यंत सकारात्मक असून, या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावेळी त्यांनी काही सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. विशेषतः, प्रवासाचा कालावधी सुमारे २४ तासांचा असल्याने तो कमी करण्यासाठी गाडीचा वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, काही थांबे कमी करून गाडी अधिक जलद आणि कार्यक्षम बनवावी, असेही त्यांनी सुचवले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24