Dailyhunt
Navi Mumbai Cricket Stadium : महाराष्ट्रातील 'या' शहरात उभारले जाणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

Navi Mumbai Cricket Stadium : महाराष्ट्रातील 'या' शहरात उभारले जाणार जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

Navi Mumbai Cricket Stadium | आपल्या भारतात क्रिकेटचे मोठं वेड आहे. क्रिकेटचे सामने बघायला लोक अक्षरशः स्टेडियम फुल्ल करतात. क्रिकेटला जणू भारतात धर्मासारखं महत्व आहे आणि याच क्रिकेटची पंढरी मानली जाते ती मुंबईला.

मुंबईत सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम अशी ३ क्रिकेट स्टेडियम आहेत. मात्र आता आणखी एक नवीन क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकर क्रिकेटप्रेमींसाठी हि मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, MCA आणि सिडको (CIDCO) यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंग यांच्याशी अनेक बैठका घेतल्या असून, लवकरच योग्य भूखंड मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकल्पामागे (Navi Mumbai Cricket Stadium) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनीच MCA ला १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. मुंबईतील क्रिकेटप्रेमींची वाढती संख्या आणि असोसिएशनचा मोठा इतिहास लक्षात घेता, हे प्रस्तावित स्टेडियम महत्वाचे आहे. प्रस्तावित स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि जागतिक स्तरावरील क्रीडा अनुभव देणारी रचना असणार आहे.

सध्या मुंबईत वानखेडे स्टेडियम हेच प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. मात्र, सुमारे ३३ हजार प्रेक्षक क्षमतेमुळे अनेक चाहत्यांना सामने पाहण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या क्षमतेच्या नव्या स्टेडियमची गरज गेल्या काही वर्षांपासून जाणवत होती. याच पार्श्वभूमीवर मे २०२५ मध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी MCA ला स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले होते की, जर असोसिएशनने योग्य प्रस्ताव सादर केला, तर राज्य सरकार त्यांना भव्य आणि मोठ्या स्टेडियमसाठी योग्य जागा उपलब्ध करून देईल

दरम्यान, MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून, या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढील पावले उचलली जाणार आहेत. हे क्रिकेट स्टेडियम (Navi Mumbai Cricket Stadium) उभारल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे क्रिकेट केंद्र म्हणून उदयास येईल. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, रोजगारनिर्मिती आणि क्रीडा पर्यटनाला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24