Dailyhunt
Pandharpur Corridor Project : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी; आता 6-7 तासांत होणार विठुरायाचे दर्शन

Pandharpur Corridor Project : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी; आता 6-7 तासांत होणार विठुरायाचे दर्शन

Pandharpur Corridor Project | पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्रातील करोडो भाविकांचे आराध्य दैवत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने जात असतात, जणू आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्त आतुरलेले असतात.

आता याच विठ्ठल भक्तांसाठी मोठीच आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला राज्याच्या सर्वोच्च समितीकडून मंजुरी मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वारीदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भविष्यात गर्दीच्या काळातही भाविकांना अवघ्या ६ ते ७ तासांत विठुरायाचे दर्शन घेणे शक्य होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो भाविक महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशाच्या विविध भागांतून येथे दर्शनासाठी येतात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे अनेकदा दर्शनासाठी भक्तांना १२ ते १५ तासांहून अधिक वाट बघावी लागते. नव्या कॉरिडॉरमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. Pandharpur Corridor Project

प्रकल्पासाठी ४ हजार कोटींची तरतूद

सुधारित आराखड्यानुसार, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी ३,९९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी सुमारे २,०२६ कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. प्रशासनाने हा प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, प्रारंभीच्या निधीपैकी जवळपास ३० टक्के निधी पुढील काही दिवसांत वितरित होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत. त्यामध्ये, शहरात १४ भव्य स्वागतद्वारांची उभारणी, चंद्रभागा नदीवर दोन नवीन पादचारी पूल, शहरभर CCTV सुरक्षा व्यवस्था, तीन हेलिपॅड्सची उभारणी, वाहनतळ (पार्किंग) सुविधांचा विस्तार, पोलीस आणि गर्दी नियंत्रण व्यवस्थेचे आधुनिकीकरण, हिंदू स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे. Pandharpur Corridor Project

अधिकाऱ्यांच्या मते, पुढील ५० वर्षांतील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि वारकऱ्यांची सुविधा या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून शहराचा विकास केला जाणार आहे. Pandharpur Corridor Project

या कॉरिडॉरमुळे विठ्ठल दर्शन अधिक सोपे आणि जलद होईलच. मात्र याशिवाय पंढरपूरमधील धार्मिक पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा प्रकल्प भविष्यात मोठा दिलासा ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24