Petrol Price Down In Pakistan | इराण आणि इस्राईल यांच्यात युद्ध आणि हार्मोझ समुद्रधुनीतील तणावामुळे भारतावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. देशात पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
मागील १० दिवसांत तब्बल ४ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस चांगला चिंतेत आहे. मात्र एकीकडे भारतात पेट्रोल डिझेल महाग होत असताना दुसरीकडे आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल २२ रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. महागाईच्या काळात पाकिस्तान सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर २२ रुपये, तर हायस्पीड डिझेलच्या दरात प्रतिलिटर २२ रुपयांची कपात केली आहे. नवीन दरानुसार आता पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ३८० रुपये झाली आहे. तर डिझेलचे भाव प्रतिलिटर ३८१ रुपये झाले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केली आहे. इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मागील काही महिन्यापासून वाढ झाली होती. परंतु मागच्या आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती ११ टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने इंधन दर कमी करण्याचा निर्णय घेतला. Petrol Price Down In Pakistan
दुसरीकडे, भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.१२ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर ९५.२० रुपयांवर पोहोचला आहे. ज्ज्ञांच्या मते, वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची घसरण आणि वाढत्या आयात खर्चामुळे तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. याशिवाय, रिफायनिंग मार्जिनमधील बदलांचाही इंधनाच्या दरांवर परिणाम होत आहे. बराच काळ किमती स्थिर ठेवल्यानंतर, सरकारी तेल कंपन्या आता हळूहळू वाढीव खर्च ग्राहकांवर लादत आहेत. यामुळेच मागील १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर सुमारे ५ रुपयांनी महाग झाले आहे.

