Pune Metro | पुणे शहरातील शिवाजीनगर ते हिंजवडी या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मेपर्यंत हि मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन अजूनही सुरु झाली नाही.
या मेट्रो प्रकल्पाअंतर्गत अनेक कामे अपूर्ण असल्यामुळे पुन्हा एकदा डेडलाइन चुकली आहे. आता ही मेट्रो सेवा १५ जून २०२६ पासून दोन टप्प्यांत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधीही या प्रकल्पासाठी अनेक वेळा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. यापूर्वी शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो ट्रेन मार्च २०२५, सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६ आणि मे २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल असं बोललं जात होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या बहुप्रतीक्षित मेट्रोचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. Pune Metro
हा मेट्रो मार्ग सुमारे २३ किलोमीटर लांबीचा असून त्यात २३ स्थानके आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी परिसरातून पुणे शहरात ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर दररोज प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ हा ट्राफिक मध्येच वाया जातो.
हा प्रकल्प 'पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप' (PPP) तत्त्वावर राबवला जात आहे. या प्रकल्पाची उभारणी टाटा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सीमेन्स आणि इतर भागीदार कंपन्यांच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे पुण्यातील ही पहिलीच मेट्रो असेल जी ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणालीवर चालेल. त्यामुळे वरून जाणाऱ्या विजेच्या तारांची आवश्यकता राहणार नाही. Pune Metro
सध्या हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था खूपच खराब आहे. रोज हजारो लोक दुचाकी, कार, बस किंवा कंपनीच्या वाहनांनी प्रवास करतात. खड्डे, ट्रॅफिक आणि वेळेचा अपव्यय यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर होते. अशावेळी हि मेट्रो लवकर सुरू व्हावी, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. सुरुवातीला प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी आशा होती. पण सततच्या विलंबामुळे लोकांमध्ये नाराजी वाढली आहे.
हा मेट्रो प्रकल्पाला विलंब होण्यामागे काही महत्वाची कारणेही आहेत. काही कामगार निवडणुकांसाठी गावी परत गेले, तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे कामाचा वेग कमी झाला. मात्र आता १५ जूनपर्यंत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल असं बोलले जात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजीज फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मॅरियट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल आणि रामनगर अशा १२ स्थानकांचा समावेश आहे.

