Pune Metro : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रो सुरु करण्यात आल्या आहेत. पुण्यात सध्या २ मार्गावर मेट्रो ट्रेन धावत असून इतर अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत.
मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सोप्पा आणि कमी वेळेत होत आहे. तसेच आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येत आहे. आता लवकरच पुण्यात आणखी एक नवीन मेट्रो ट्रेन धावणार असून तिचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.
भक्ती-शक्ती चौक’ ते चाकण असा या मेट्रोचा मार्ग (Pune Metro) असणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक पट्टा यांच्यातील वाहतुकीसाठी हि मेट्रो अतिशय महत्वाची ठरणार आहे. हा प्रस्तावित कॉरिडॉर ४०.९२६ किलोमीटर लांबीचा असेल आणि यामध्ये ३१ स्थानके असतील. या ३१ रेल्वे स्थानकांपैकी २५ स्थानके पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असतील, तर उर्वरित ६ स्थानके चाकण नगर परिषदेच्या अधिकारक्षेत्रात येतील. भक्ती-शक्ती चौक’ ते चाकण मेट्रो प्रकल्पासाठी अंदाजे १०,३८३.८९ कोटी रुपयांचा खर्च असू शकतो.
सध्याच्या घडीला दापोडी ते पिंपरी या दरम्यान मेट्रो सेवा कार्यरत आहे, तर निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम प्रगतीपथावर आहे. या क्षेत्रातील मेट्रो विस्ताराचा दुसरा टप्पा म्हणून निगडी-चाकण कॉरिडॉरचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा मूळ आराखडा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे (PCMC) सादर करण्यात आला होता आणि सप्टेंबरमध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधींसमोर तो सादर करण्यात आला होता. या लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर आधारित अनेक बदलांचा सुधारित प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. Pune Metro
सुधारित बदलांमध्ये मेट्रो ३ ऐवजी ६ डब्ब्यांची करणे, तळवडे चौकामार्गे चाकण MIDC कडे जाणारा मार्ग सुधारित करणे, नाशिक फाटा आणि भोसरीमार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गांचा विचार करणे, तसेच भुजबळ चौक आणि वाकड यांसारख्या इंटरचेंज पॉईंट्स वर प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करणे, यांचा समावेश आहे.
सुधारित अलाइनमेंट, हा कॉरिडॉर भक्ती-शक्ती चौक, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी MIDC, मोशी, आळंदी फाटा आणि चाकण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून जाईल. या मार्गामध्ये आता भोसरीचाही समावेश करण्यात आला आहे. भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची बऱ्यापैकी सुटका होईल.

