Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानक हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या पश्चिमेकडील एक महत्वाचं रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर असून अनेक औद्योगिक आणि आयटी कंपन्या पुण्यात आहेत.
परिणामी देशभरातून हजारो- लाखो लोक पुण्यात नोकरीसाठी किंवा अन्य व्यवसायासाठी येत असतात. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक नेहमीच गजबजलेलं असते. पुणे रेल्वे स्थानकातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातील महत्वाच्या शहरात रेल्वे उपलध असल्याने स्टेशनवरही मोठा ताण पडतो. अशावेळी पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) 'यार्ड रिमॉडेलिंग' अर्थात यार्ड पुनर्रचनेचा एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवणे, स्थानकाची क्षमता वाढवणे आणि गर्दी कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकल्पासाठी सुमारे ३९८ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ६ नवीन फलाटांचे बांधकाम, विद्यमान फलाटांचा विस्तार आणि प्रवाशांसाठी अधिक सुलभ प्रवेश व निकासद्वार तयार करणे यांचा समावेश आहे. रेल्वे सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. स्थानकाच्या संपूर्ण पुनर्विकासाचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात पुणे विभागाने २,२३८.२० कोटी रुपयांची कमाई नोंदवली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ३.७% जास्त आहे. यात प्रवासी महसूल १,६५७.२४ कोटी रुपये राहिला, म्हणजे १३% वाढ झाली. तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसुलात ५७.५% वाढ झाली आणि तो ३० कोटी रुपयांवर पोहोचला. जाहिरात, खानपान आणि पार्किंग सेवांमधील महसूलही सातत्याने वाढत राहिला. या कालावधीत संपूर्ण विभागात प्रवासी वाहतुकीत ६.३% वाढ झाली.
हंगामी मागणी लक्षात घेऊन विभागाने विशेष गाड्या चालवल्या. दिवाळी, छठ, नाताळ, नवीन वर्ष आणि होळी या काळात १,१०० पेक्षा अधिक अतिरिक्त सेवांचा समावेश होता. पुणे शहराला जोधपूर, रेवा, अजनी, तिरुपती आणि मुझफ्फरपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडणाऱ्या नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या. तसेच्या बीडपर्यंत प्रथमच रेल्वे धावली. Pune Railway Station
पुणे गर्दी निवारण उपक्रमा’अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विस्तारात हडपसर आणि खडकी येथील ‘कोचिंग टर्मिनल्स’च्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. यामध्ये यार्डची क्षमता वाढवणे आणि अधिक फलाटांची निर्मिती करणे या बाबींचा समावेश आहे. दीर्घकालीन कार्यक्षमतेस बळ देण्यासाठी, प्रवासी सुविधा, स्थानक इमारती आणि पादचारी पुलांवर (फूट ओव्हरब्रिज) लक्ष केंद्रित करणारे अनेक प्रकल्पही मंजूर करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या आघाडीवर, विभागाने आठ लेव्हल क्रॉसिंग हटवणे, अनेक ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे बांधकाम, तसेच सिग्नलिंग आणि टेलिकॉममधील बिघाडात २४% घट यांसारख्या प्रमुख कामगिरीची नोंद केली. १४९ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले, तसेच ओव्हरहेड उपकरण प्रणालीतील सुधारणांचे कामही पूर्ण झाले. ‘कवच’ सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी प्रगतीपथावर असून, तिची स्थापना आणि चाचण्या सुरू आहेत. Pune Railway Station
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अनेक स्थानकांचा आधुनिकीकरण करण्यात आला. यामध्ये लिफ्ट, एस्केलेटर, ऊर्जा बचत तंत्रज्ञान तसेच सुरक्षितता आणि आराम वाढवण्यासाठी १७ ट्रेन रेक्स LHB कोचमध्ये रुपांतरित केले गेले. स्थानकांवर ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. पुणे विभागाने पायाभूत सुविधा, कार्यक्षमतेत सुधारणा आणि प्रवासी सेवांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे आणि भविष्यातही या प्रगतीवर भर दिला जाईल असं राकेश कुमार वर्मा यांनी सांगितलं.

