Tractor Price Hike | ट्रॅक्टर हा जणू शेतकऱ्याचा खास असा मित्रच असतो. ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांची अनेक कामे सोप्पी होतात. ट्रॅक्टरमुळे नांगरणी, पेरणी, फवारणी आणि मालाची वाहतूक यांसारखी जड कामे कमी वेळात व कमी कष्टात होतात.
ट्रॅक्टरचा वापर केवळ नांगरणीसाठीच नाही, तर रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, ट्रॉली जोडणे, आणि फवारणीसाठीही केला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी नवीन ट्रॅक्टर खरेदी करत असतात. मात्र आता लोकप्रिय ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्स कुबोटाने आपल्या ट्रॅक्टरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १५ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
एकीकडे इराण आणि इस्राईल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. ट्रॅक्टरसाठी गरजेचं असलेल्या डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच आता ट्रॅक्टरच्या किमतीही वाढल्याने शेती करणं आणखी अवघड झालं आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि परिचालन खर्चातील वाढ यामुळे ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ करण्यात आली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Tractor Price Hike
प्रीमियम कुबोटा श्रेणीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसला तरी, फार्मट्रॅक आणि पॉवरट्रॅक ब्रँडचे ट्रॅक्टर महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आता आणखी पैसे मोजावे लागतील. या दरवाढीमुळे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लागणारा सुरुवातीचा खर्च वाढेल, त्यामुळे ग्रामीण भागातील मागणीवर परिणाम होऊ शकतो. किंमती मॉडेल आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या असल्यामुळे, त्याचा प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक बाजारपेठेत वेगवेगळा असू शकतो. खरेदीदार अधिक सावध होऊ शकतात आणि निर्णय घेण्यापूर्वी विविध पर्यायांची तुलना करू शकतात. Tractor Price Hike
दरम्यान, एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड भारतातील ट्रॅक्टर बाजारपेठेतील एक प्रमुख कंपनी म्हणून कायम आहे. मार्च २०२६ मध्ये कंपनीने एकूण १२,११९ ट्रॅक्टरची विक्री केली, जी मागील वर्षीच्या ११,३७४ युनिट्सच्या तुलनेत ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची कामगिरी खूपच मजबूत राहिली आहे.

