Dailyhunt
Volvo Car Price Hike : 1 मे पासून 'या' कंपनीच्या गाड्यांच्या किमती महागणार

Volvo Car Price Hike : 1 मे पासून 'या' कंपनीच्या गाड्यांच्या किमती महागणार

Volvo Car Price Hike | जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील प्रीमियम कार निर्माता कंपनी Volvo Car India ने १ मे २०२६ पासून आपल्या सर्व गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या दरवाढीमुळे काही गाड्यांच्या किमतीत तब्बल तर १ लाखांपर्यंत वाढ होणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ अचानक घेतलेला निर्णय नसून, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक बदलांचा परिणाम आहे. गेल्या काही महिन्यांत जागतिक पुरवठा साखळीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर परकीय चलन दरातील चढ-उतार, विशेषतः युरोच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, यामुळे आयात खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम गाड्यांच्या उत्पादन खर्चावर होत आहे.

Volvo भारतात EX30, EX40, XC60, XC90 आणि EC40 यांसारखी प्रीमियम आणि इलेक्ट्रिक वाहने विकते. सध्या या गाड्यांच्या किंमती ४१ लाखांपासून ते ९७.८० लाखांपर्यंत आहेत. आता १ मे नंतरच्या दरवाढीनंतर या सर्व गाड्या आणखी महाग होणार आहेत. त्यामुळे खरेदीदार ग्राहकांच्या खिशाला फटका बसेल. Volvo Car Price Hike

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ३० एप्रिल २०२६ पर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना जुन्याच किमतीत कार मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर ३० एप्रिलच्या आत बुकिंग करा.

जर जागतिक आर्थिक परिस्थिती आणि भू-राजकीय तणाव असेच कायम राहिले, तर भविष्यात आणखी दरवाढ होऊ शकते. कंपनीसाठी सुरक्षितता आणि दर्जा राखणे हे प्राधान्य असल्याने, खर्च वाढल्यास तो ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अपरिहार्य ठरत आहे असे स्पष्टीकरण वोल्वोने दिले.

फक्त Volvoच नाही, तर इतर वाहन उत्पादक कंपन्याही दरवाढीच्या तयारीत आहेत. BYD India आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती २ ते ३ टक्क्यांनी वाढवणार आहे. ही २०२६ मधील दुसरी दरवाढ असेल. त्याचबरोबर Hyundai Motor India देखील आपल्या गाड्यांच्या किमतीत सुमारे १ टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. Volvo Car Price Hike

मध्य पूर्वेतील तणाव आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडचणींमुळे सुटे भाग वेळेत मिळत नाहीत. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात खर्च वाढला आहे. CAFÉ 3 आणि BS7 सारख्या कडक नियमांमुळे कंपन्यांना नवीन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आता नवीन गाडी खरेदी करणे जास्ती खर्चिक होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: AhmednagarLive24