Monday, 22 Jul, 9.34 am अक्षरनामा

नवे लेख
२०२३ चा वर्ल्ड कप भारताला जिंकायचा असेल तर काय केलं पाहिजे?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बदलण्याची तयारी सुरू झाली असून बीसीसीआयनं नव्यानं अर्ज मागितले आहेत. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ४५ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यांना ती मिळायलाही नको.

२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस प्रशिक्षक व कॅप्टन या दोघांचं बिनसलं आहे, अशा प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये झाला होता. सामना सुरू होण्यापूर्वी टॉस जिंकला तर प्रथम बॅटिंग घ्यायची, हा निर्णय घेण्यात आला होता. पण टॉस जिंकूनदेखील विराट कोहलीनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अनिल कुंबळे यांनी याबद्दल विचारणा केली असता विराट कोहलीने काहीच उत्तर दिलं नव्हतं. ही बातमीसुद्धा प्रसारमाध्यमांत येऊन गेली होती. त्यानंतर झालेल्या घडामोडींत विराट कोहलीनं आपलं वजन रवी शास्त्री यांच्या पारड्यात टाकलं आणि त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

मुळात बीसीसीआय देईल तो प्रशिक्षक कर्णधारानं घ्यायचा असतो. पण विराट कोहलीनं अनिल कुंबळे यांच्यासोबत काम करताना अडचण येते, असं सांगत त्यांना विरोध केला. रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यावर विराट कोहलीला काही प्रमाणात निर्णय घेण्यास मुभा मिळाली. याचा परिणाम असा झाला की, वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंची निवड काही अंशी चुकली. आता बीसीसीआयनं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, विराट कोहलीचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही. हे एका अर्थानं बरंच झालं. आता तरी बीसीसीआय कडक पाऊल उचलेल अशी अपेक्षा आहे.

यंदाचा विश्वचषक इंग्लंडचा संघ का जिंकला, ते एकदा आपल्याला नीट तपासून पाहावं लागेल. गेल्या चार वर्षांपासून इंग्लंडनं वर्ल्ड कप आपल्या देशात कसा राहील या पद्धतीनं आपल्या खेळाचं नियोजन केल्याचं दिसून येतं. इंग्लंडचा सेमी फायनलपर्यंतचा प्रवास अडखळत राहिला असला तरी त्यांनी सेमी फायनल व फायनलमध्ये चांगला खेळ केला, हे आपल्याला दिसून येईल.

इंग्लंडनं नेमकं काय केलं? त्यांची सलामीची जोडी जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी प्रत्येक सामन्यात सहाच्या धावगतीनं धावा काढायचं काम केलं. सुरुवातीच्या १० किंवा १५ षटकांमध्ये सहाच्या धावगतीनं धावा काढायच्या. एक-दोन सामन्यात ही जोडी अपयशी ठरली अन्यथा त्यांनी सहा किंवा सहापेक्षा अधिक धावा पहिल्या काही षटकांमध्ये केल्या.

१९९६ ला श्रीलंका या संघानंही असंच केलं होतं. पहिल्या १५ षटकांमध्ये सनथ जयसूर्या व रोमेश कालूवितरणा सहाच्या धावगतीनं धावा काढायची. त्याचा परिणाम असा झाला की, श्रीलंकेनं त्या वर्षीचा वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी आणखी एक केलं, ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा जो चांगला गोलंदाज असेल त्याच्या षटकांमध्येच त्यांनी जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक गोलंदाजाचीच धुलाई इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी केली.

इंग्लंडचे फलंदाज जरी बाद होत असले तरी अपेक्षित धावगती त्यांनी कायम ठेवली. त्यामुळे नवीन येणाऱ्या फलंदाजावर दडपण येत नसे. तोही फटकेबाजी करत धावगती हलती ठेवत असे.

भारताचा रोहित शर्मा सुरुवात संथ करतो, जम बसला की मग तो धावा काढतो. पण या गडबडीत तो बाद झाला तर येणाऱ्या फलंदाजावर धावा काढण्याचं व अपेक्षित धावगतीनं धावा काढण्याचं दडपण येतं. आणि मग भारतीय फलंदाज चुकीचे फटके मारून बाद होतात. इंग्लंडनं ती चूक यावेळी केली नाही.

भारतीय फलंदाजांना या वर्ल्ड कपमध्ये आणखी धावा काढण्याची संधी होती. रोहित शर्मानं जी पाच शतकं केली, ती ३० ते ४० या षटकांमध्ये. म्हणजे त्याच्याकडे खेळण्यासाठी अजून बरेच बॉल शिल्लक होते. पण तो शतकं झाल्यावर लगेच बाद झाला. याला पाकिस्तानचा सामना अपवाद होता. पण त्या सामन्यातही तो आपल्या धावामध्ये आणखी काही धावांची भर घालू शकला असता.

राहुलच्या बाबतीतही तेच झालं. तेच विराट कोहलीच्या बाबतीत झालं. हे इंग्लंडनं घडू दिलं नाही. आपण अजून धावा काढू शकलो असतो, याची कबुली नंतर विराट कोहलीनंदेखील दिली.

आता भारतीय संघाच्या सलामीचे फलंदाज या वर्ल्ड कपमध्ये कसे खेळले? सुरुवातीच्या १० षटकांमध्ये साडेतीन किंवा चारच्या धावगतीनं धावा काढायच्या, प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य गोलंदाजाट्या वेळी धावा काढायच्या नाहीत, जो पाचवा गोलंदाज असेल त्याच्या षटकांमध्ये जास्त धावा वसूल करायच्या, ही त्यांची रणरीती फसलेली दिसते. इंग्लंडच्या सामन्यात रोहित शर्मा व राहुलनं खूप संथ सुरुवात करून दिली. पहिल्या १० षटकांमध्ये आपण ३० धावाही करू शकलो नाही. त्याचं नुकसान असं झालं की, नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दडपण आलं. आणि ते चुकीचा फटका मारून बाद झाले. पुढच्या वर्ल्ड कपची तयारी करताना सलामीच्या जोडीनं धावांचा पाठलाग करताना अपेक्षित धावगती राखलीच पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इंग्लंडच्या संघात पहिले दोन फलंदाज बाद झाले तरी मागे रूट व मॉर्गन होते. मॉर्गन हा चौथ्या क्रमांकावर खेळला. आपल्याकडे चौथ्या क्रमांकावर कोण, हा प्रश्न चार वर्षांत आपण सोडवू शकलो नाही. हा क्रमांक एकदिवसीय सामन्यात अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला या क्रमांकासाठी आतापासूनच शोधमोहीम हाती घ्यावी लागेल. २०२३चा वर्ल्ड कप हा भारतामध्ये होणार असल्यामुळे हा क्रमांक महत्त्वाचा असणार आहे.

धोनी पुढचा वर्ल्ड कप नक्कीच खेळणार नाही. म्हणून त्याच्या जागेवर कोण हा प्रश्न मोठा असणार आहे. धोनी हा फक्त विकेट कीपर नव्हता. तो कर्णधार राहिलेला आहे. तो मधल्या फळीतील मुख्य फलंदाज होता. तो थिंक टॅंकमधला मुख्य खेळाडू होता. त्याच्याकडे विविध कल्पना असत. त्या कल्पनेतून त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचे डावपेच बऱ्याचदा प्रतिस्पर्धी खेळाडूंना समजत नसत. धोनीची जागा भरून काढणं हे कठीण काम असणार आहे. रिषभ पंतला त्याचा दावेदार मानलं जातं असलं तरी तो अजूनही आपल्या फॉर्मसाठी झगडत आहे. शिवाय तो अजून चांगला खेळाडू होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे त्याला अजून वेळ द्यावा लागेल.

इंग्लंडकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू आहे. असे एक किंवा दोन खेळाडू संघात असतील तर विजयाची खात्री अधिक असते. आपल्याला किमान दोन अष्टपैलू खेळाडू शोधावे लागतील, जे सामन्याचा पूर्ण गियर बदलून सामना जिंकून देऊ शकतात. इथं बीसीसीआयला खूप विचार करावा लागेल.

क्रिकेट हा खेळ बऱ्याच अंशी खेळपट्टीवर अवलंबून असतो. भारताकडे सद्यपरिस्थितीमध्ये चांगले गोलंदाज आहेत, पण खेळपट्टी जर त्यांना अनुकूल नसेल तर त्यांची धुलाई होताना दिसते. त्यामुळे येणाऱ्या चार वर्षांत बुमराह, भुवनेश्वर, शमी यांच्यानंतरची दुसरी फळी तयार करावी लागेल.

इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आयपीएलच्या वेळेस भारतात खेळला आहे. भारतीय खेळपट्टीवरदेखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. इतर संघाचे अनेक गोलंदाज भारतात येऊन आपली कमाल दाखवत असल्यामुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत करावी लागेल.

२०१५ च्या वर्ल्ड कपमधील अनेक खेळाडू २०१९ ला भारतीय संघात नव्हते, हे लक्षात घेऊन दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी व केदार जाधव हे तीन खेळाडू २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये नसतील. यांच्या जागेवर आपल्याला चांगले खेळाडू शोधावे लागतील. सुदैवानं भारताकडे बेंच स्ट्रेंथ मजबूत व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. जी इतर संघाकडे नाहीये.

२०११ ला महेंद्रसिंग धोनीच्या संघानं कोणते डावपेच टाकून सामने जिंकले तेही पाहावं लागेल. त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू युवराज सिंग होता. त्याची जागा अजून कुणी घेऊ शकलेलं नाही. मधल्या फळीत व डेथ ओव्हरमध्ये असा फलंदाज आपल्याला लागणार आहे.

येणाऱ्या काळात चारशेहून अधिक धावा होण्याची शक्यता आहे, अशा वेळेस युवराज सिंगसारखा खेळाडू आपल्याला शोधावा लागेल. नव्यानं पुन्हा संघाची बांधणी करावी लागेल.

२०२३ चा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्यामुळे सर्व संघांना समान संधी असणार आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल विटोरीनं न्यूझीलंड पुढचा वर्ल्ड कप जिंकेल, असं आत्ताच सांगितलं आहे.

लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aksharnama
Top