Saturday, 14 Dec, 12.00 am अक्षरनामा

नवे लेख
'बेरीज वजाबाकी', 'सिनिअर सिटीझन' आणि 'विक्की वेलिंगकर' : अनुक्रमे उत्तम, सरस आणि नीरस

आयुष्याचं महत्त्व दोन पिढ्यांना पटवून देताना दिग्दर्शकानं केलेली 'बेरीज वजाबाकी' आपल्याला उत्साही करून जाते!

पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या सुप्तगुणांना दाबून ठेवतं. त्यामुळे मुलांची आपली आपण भविष्याची वाट शोधण्याची आणि मनाप्रमाणे जगण्याची इच्छा हळूहळू मारली जाते. परिणामी मुलांचं आयुष्य पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात निघून जातं. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन संकुचित होत जातो. याला जसे पालक जबाबदार आहेत, तसेच सामाजिक परिस्थितीदेखील तितकीच जबाबदार आहे. परिणामी नात्यातलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा संपून कडवटपणा येऊ लागतो. या अट्टहासापायी हरवून चाललेल्या पिढीला वास्तवाचं भान राजू भोसले दिग्दर्शित 'बेरीज वजाबाकी' हा सिनेमा देण्याचं काम करतो.

दोन पिढ्यांच्या नात्यातील संवाद आणि चिमुरड्या कलाकारांच्या निरागस अभिनयाला चांगल्या कथेची साथ लाभलेला हा सिनेमा शिक्षणव्यवस्थेवरसुद्धा भाष्य करतो. मुलांच्या आयुष्याकडे स्पर्धेचं वाहक म्हणून पाहणाऱ्या पालकांची ही कथा आहे. सिनेमाची सुरुवात एका शाळेपासून होते.

तत्त्वनिष्ठ शिक्षक चौधरी सर (नंदू माधव) आदर्श अशा शाळेत शिक्षक असतात. या शाळेत विद्यार्थ्यांना कुठलीही सक्ती नसते. मोकळ्या जागेत शाळेतले विद्यार्थी आपल्या कौशल्यानुसार काम करत असतात. म्हणजे कुणी वस्तूंची तोडमोड करून नवीन वस्तू बनवतात, तर काही विद्यार्थी पटांगणात रोपट्यांची लागवड करतात. त्यामुळे बंधनविरहित अशी ही शाळा असते. या शाळेवर चिपळूणकर सरांचं (मोहन जोशी) विशेष लक्ष असतं.

या शाळेच्या जागी मोठा मॉल उभा करण्याचं स्वप्न शामराव (प्रवीण तरडे) पाहत असतो. शेवटी शाळा बंद होण्याच्या टप्यावर येते आणि तशी ती होऊ नये म्हणून शाळेचे दोन हुशार विद्यार्थी रोहित (नील बक्षी) व दिपा (जाई राहाळकर) एका स्पर्धेत भाग घेतात. 'ट्रेझर हंट' (या खेळात संकेत स्वरूपात स्पर्धकाला एक चिठ्ठी दिले जाते. त्यात शोधमोहिमेची पुढच्या टप्प्याची दिशा दर्शवलेली असते.) या खेळात हे विद्यार्थी जंगलात जातात. तिथून पुढचा भाग हा सिनेमा खरा गाभा आहे.

अत्यंत संयमी पद्धतीने पटकथा पुढे जात राहते. संवादाच्या पातळीवर प्रेक्षकाला सिनेमा गुंतून ठेवण्यात यशस्वी होतो. नाट्यमय पद्धतीने उत्तरार्धाची उकल होत राहते. जंगलात गेलेली मुलं सामंजस्यानं एकत्र येऊन प्रत्येक गोष्टीशी झगडत पुढे जातात. तेव्हा त्यांना स्वतःच्या वाटा शोधण्याची मजा यायला लागते. दिग्दर्शकानं 'ट्रेझर हंट' या खेळाचा उपयोग करून परिणामाकारकरित्या करून घेतला आहे.

संपूर्ण सिनेमा विद्यार्थ्यांभोवती फिरत राहतो. यातील बालकलाकारांचा अभिनय प्रसन्नता टिकवून ठेवतो. या मुलांच्या आई-वडिलांची एक कथा दिग्दर्शकानं स्वतंत्रपणे दाखवली आहे. त्यामुळे दोन पिढ्यांचं जगणं समोर येत राहतं. एक-दोन दृश्यामुळे त्यातली अतिशयोक्त मांडणी उघडी पडते, पण ते समजण्यासारखं आहे. कॅमेरा आणि तांत्रिकबाबीत सिनेमा थोडासा मागे पडतो. म्हणून काही दृश्यांचा प्रभावीपणा तितकासा होत नाही. पटकथा, संगीत, एडिटिंग या पातळीवर सिनेमा चांगला आहे.

एक गोष्ट मात्र खटकत राहते. जंगलात गेलेली मुलं आणि काळजी न करणारे आई-वडील यांच्यातलं जे चित्रण दिग्दर्शकानं उभं केलं आहे, ते फारसं पटत नाही. त्याचबरोबर सिनेमात काही ठिकाणी दैवी चमत्कार होत राहतात. एक मुलगा येतो, तो काहीच बोलत नाही आणि निघून जातो. मध्येच दिग्दर्शक एका मोठ्या सामाजिक विषयाला हात घालतो आणि अर्धवट सोडून देतो. मात्र त्याचा मूळ कथेवर फारसा परिणाम होत नाही.

दोन पिढ्यांमध्ये 'करिअर'वरून सुरू असलेल्या उथळ स्पर्धात्मकतेला बाजूला सारून आयुष्याचं महत्त्व एकाच वेळी दोन्ही पिढ्यांना पटवून देताना दिग्दर्शकानं केलेली 'बेरीज वजाबाकी' आपल्याला उत्साही करून जाते.

'सिनिअर सिटीझन' : दमदार अभिनय, चांगली पटकथा आणि प्रभावी संवाद या जमेच्या बाजू

सेवानिवृत्त मेजर अभय देशपांडे (मोहन जोशी) पत्नी लक्ष्मी (स्मिता जयकर)सह मुंबईत राहत असतात. त्यांच्या घराशेजारी सौम्या (अमृता पवार) राहत असते. साहिल (सुयोग गोऱ्हे) हा तिचा बॉयफ्रेंड. आयुष्याचा सर्वाधिक काळ सैन्यात घालवलेल्या अभय देशपांडेचा स्वभाव शिस्तप्रिय असतो. ते वयाच्या पंच्याहत्तरीतही स्वतःला तरुण समजतात. आता समाजात राहून देशसेवा करायची त्यांची मनोवृत्ती असते.

एकीकडे मेजर देशपांडेसारखे अधिकारी, तर दुसरीकडे भरदिवसा वृद्धांना गुंडांकडून होणारा त्रास असं विरोधभासी चित्र समोर असतं. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालेल्या देशपांडेसमोर गुंड एका वृद्धाला मारहाण करतात. पंचाहत्तरीतले देशपांडे दहा-बारा गुंडांची धुलाई करतात. (हे दृश्य पाहून काही क्षण टॉलिवुडच्या अॅक्शनपटाची आठवण येते!) तिथेच असलेली एक पत्रकार हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करते. पुढे पोलिसात तक्रार केली जाते. इन्स्पेक्टर कोल्हे (कमलेश सावंत) या गुन्ह्याचा तपास करत असतात. देशपांडे यांचा योगायोगानं या घटनेशी आलेला संबंध पुढे उकलत जातो. ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते व्यथित होतात. त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे म्हणत ते अन्यायाविरुद्ध व्यक्तिगत पातळीवर लढा देतात.

मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांचा अभिनय दमदार आहे. अडीच तासाच्या सिनेमात या दोन ज्येष्ठ कलाकारांनी ज्या पद्धतीनं भूमिका केल्या आहेत, त्यात आपण अक्षरशः गुंतून जातो. जोशी यांची देहबोली, हावभाव सैन्यातल्या अधिकाऱ्यासारखे आहेत. मात्र त्यांची अॅक्शन दृश्यं अतिशयोक्त वाटतात. जयकर यांनी कणखर गृहिणीची भूमिका प्रभावीपणे रंगवली आहे. कमलेश सावंतने इन्स्पेक्टरला न्याय दिला आहे. त्याच्या संवादशैलीमुळे विनोदनिर्मिती होते. अमृता आणि सुयोग ही तरुण जोडी मात्र अभिनयाचं आव्हान पेलण्यात कमी पडली आहे. सुयोगची भूमिका 'श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा' या छापाची आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पात्राला न्याय देत नाहीत. परिणामी अभिनयाच्याबाबतीत सिनेमा 'सिनिअर' कलाकारांनी प्रभावित केला आहे.

सिनेमाच्या संथ गतीचा उपयोग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी केला गेला आहे. परिणामी रहस्यमय पद्धतीनं कथा शेवटाकडे जाते. सिनेमा मुंबई घडत असल्यानं तो या शहरातल्या झगमगत्या दुनियेची सफर घडवून आणतो. तरुणाच्या अंमली पदार्थच्या वाढत्या प्रमाणाचा समाजावर होणारा परिणाम, त्याचबरोबर चंगळवादी प्रवृत्तीला जीवनपद्धती म्हणून स्वीकारणाऱ्या वर्गाचं भविष्य यावर सिनेमा भाष्य करतो. काही दृश्यांत 'किल्लर' या कपड्याच्या ब्रँडसोबत 'जॅग्वार' या कारचीही जाहिरातबाजी पाहायला मिळते.

दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी प्रभावी तंत्राचा वापर केला आहे. कॅमेरा सफाईदार आहे. पटकथेची मांडणी प्रभावी आहे. अधूनमधून येणारे विनोदी संवाद प्रसन्नता निर्माण करतात. संगीतात मात्र भडकपणा आहे.

सिनेमा मनोरंजन, सामाजिक संदेश या दोन्ही पातळीवर समांतर वाटचाल करतो. अर्थात त्यातला गडदपणा टाळून! सीमेवरील देशसेवेपासून सुरू झालेलं कथानक मर्यादित अर्थानं महानगरात चाललेल्या अनागोंदीवर भाष्य करू पाहतं. दमदार अभिनय, चांगली पटकथा आणि प्रभावी संवाद जमेची बाजू ठरतात.

'विक्की वेलिंगकर' : साधी मनोरंजनाची अपेक्षाही पूर्ण करत नाही!

'टाइम मशीन' या कल्पनेभोवती फिरणारं अतिगूढ पण अपरिणामकारक कथानक आणि 'गेम ओव्हर' या हिंदी सिनेमाचा प्रभाव 'विक्की वेलिंगकर' या मराठी सिनेमाला निरस करतो. असंबद्ध वळणं कथानकाची मजा घालतात. परिणामी 'मिकी व्हायरस', 'गर्ल इन रेड', 'सेवन अवर्स टू गो' या हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या सौरभ वर्मा यांचा हा मराठी सिनेमा साधी मनोरंजनाची अपेक्षाही पूर्ण करत नाही.

विक्की (सोनाली कुलकर्णी) ही तरुणी तिच्या आजीसोबत मुंबईत राहत असते. ती पुस्तकं आणि घड्याळाचं एक दुकान चालवते. त्याचबरोबर ती कॉमिक्स बुक्ससुद्धा लिहिते. तिचा मित्र लकी लोखंडे (संग्राम समेळ) हॅकर असतो. विक्की आणि विद्या (स्पृहा जोशी) यांच्या जवळची मैत्रीण असलेल्या सृष्टीचा (जुई पवार) अचानक खून होतो. जुईने आत्महत्या केली आहे, असं इन्स्पेक्टर साळुंखे (केतन सिंग) यांचं म्हणणं असतं. मात्र मैत्रिणीच्या खुनाचं कारण विक्की शोधू लागते. या शोधमोहिमेत येणारी आव्हानं तिला चक्रावून टाकतात. ती मात्र आव्हानांशी झुंज देत राहते. आणि मग हळूहळू उलगडत जाणारी कथा सिनेमाच्या शेवटाकडे जाते.

सोनाली कुलकर्णी विक्कीच्या भूमिकेत प्रभावी ठरत नाही. गंभीर चक्रव्यूहात गुंतलेल्या विक्कीच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंचितही बदलत नाहीत. स्पृहा जोशी मात्र अगदीच कमी वेळात भाव खाऊन जाते. संग्राम समेळची देहबोली आणि भूमिका यांच्यात विरोधाभास जाणवतो. केतन सिंगला एकाच वेळी दोन भूमिका साकारताना कुठल्याच भूमिकेला न्याय देता आलेला नाही.

सिनेमात अनेक विरोधाभास दिसतात. संपूर्ण सिनेमात पुस्तक-घड्याळाच्या दुकानात एकही ग्राहक येत नाही. कथा एका दिवसात घडणाऱ्या घटनेबद्दल आहे. मात्र घर आणि इमारतीचं बांधकाम चालू असणारी जागा एवढंच संपूर्ण सिनेमात दिसत राहतं. एक दिवस विक्कीची मैत्रीण तिच्याकडे एक समस्या घेऊन येते. विक्की अडचण सोडवते. पण त्यानंतर ती मैत्रीण एकाही दृश्यात दिसत नाही. अशी अनेक पात्रं अचानक गायब होत जातात.

सिनेमातले संवाद बाळबोध आहेत. विक्कीच्या मैत्रिणीचा खून झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर जराही दुःख नसतं. उलट त्या वेळी तिच्या तोंडून येणारं वाक्य असतं- 'सृष्टी नेहमी लॅपटॉपला कवटाळून बसलेली असायची!' हेच वाक्य सिनेमात पुढे तीन वेळेला येतं. संवादाची बाजू अशा अनेक दृश्यांत ढासळलेली दिसते.

प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली वेळ महत्त्वाची असते, हा संदेश सिनेमा देऊ पाहतो. पण सिनेमा संपला तरी तो काही ठसत नाही.

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aksharnama
Top