Friday, 26 Apr, 4.02 am अक्षरनामा

नवे लेख
हे पुस्तक वाचल्यानंतर समस्याच माहीत नाहीत, असे तरी वाचक म्हणणार नाहीत

डॉ. गुरुदास नूलकर यांचं 'अनर्थशास्त्र - अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विषमता' हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखकानं लिहिलेलं हे मनोगत...

अगदी गेल्या दशकापर्यंत अप्रचलित असलेली 'शाश्वत विकास' ही संज्ञा आजकाल मात्र वारंवार कानांवर पडू लागली आहे. माध्यमांतून व राजकीय वर्तुळांतही तिचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. काही पर्यावरणीय चळवळींत तर तिला 'युद्ध-पुकारी'चा दर्जा मिळालेला दिसतो. शाश्वत विकास म्हणजे काय? तो कसा असावा? नसला तर काय होईल? या विषयांवर प्रगल्भ लिखाण आणि चर्चा होत आहे खरी; पण, आजही यावर एकमत नसल्याचे उघड आहे. काहींच्या मते शाश्वत विकासात सामाजिक कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे, तर पर्यावरण संवर्धनाशिवाय सामाजिक विकास फोल आहे, असे काहींचे मत आहे. यांपैकी कोणता मार्ग मानवाला भविष्यात तारेल याबाबत वाद असला, तरी कोणती समस्या अधिक मोठी आहे, याबाबत काहीच वाद नाही. सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या आज जगाला तितक्याच तीव्रतेने भेडसावत आहेत. विकासाच्या वाटचालीत अनेक आव्हाने समोर आली. काही आव्हाने आपण पार केलीत, तर काही अधिक जहाल झाली. बहुतेक राष्ट्रांत अन्न-सुरक्षा झाली आणि तंत्रज्ञानाने जीवन सुखकर झाले. शिक्षण, प्रवास, दळणवळण, मनोरंजन, यांत मोठी प्रगती झाली. इंटरनेटमुळे तर उद्योग-व्यापाराचा कायापालटच झाला.

पण असे असले, तरी आजही जगात अकरा टक्के जनता अतिगरिबीत आहे. दारिद्रय आणि कुपोषणाने अनेक देशांना वेढले आहे. हवामान बदल आणि तापमानवाढीचा अधिक त्रास छोटे शेतकरी आणि निसर्गावर उपजीविका अवलंबून असलेल्या हजारो जमातींना होत आहे. घटती जंगले आणि निकृष्ट परिसंस्थांमुळे वन्यजीवनाला सर्वाधिक धोका आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या सर्वांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम मानवाच्या स्वास्थ्यावर होत आहे. असाध्य रोगांचे प्रमाण वाढले आहे आणि सार्स, स्वाइन फ्लू, इबोला, झिका यांसारखे नवनवीन आजार उद्भवत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे निसर्गावर मानवाचा बोजा काही पटींनी वाढत आहे. प्रदूषणाने हवा, पाणी आणि मातीची प्रत घटली आहे. सात अब्ज लोकसंख्येला अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवण्यासाठी ऊर्जेचा वापर आणि खर्च वाढत चालला आहे. आपण या परिस्थितीत अवतरलो, याचे मूळ कारण आपल्या अर्थनिर्मितीच्या कार्यात आढळते. आजवर आपण अर्थव्यवस्थेवर विश्वास टाकला खरा; पण इतक्या विद्वान अर्थतज्ज्ञांची नजर असताना या समस्या बळावल्या कशा?

अशा परिस्थितीत शाश्वत विकासावर संशोधन झालं नाही, तरच नवल. पण या कथित शाश्वत विकासासाठीचा मार्ग निवडण्यावर एकमत होत नाही यात नवल नाही. या संज्ञेतील दोनही शब्दांचे दृष्टिकोन वेगळे आहेत - 'शाश्वत' शब्द सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनांतून वापरला जातो, तर 'विकास' हा मानवी दृष्टिकोनातून. काही विचारवंतांच्या मते हे दोन मार्ग अथवा दोन प्रकारचे विकास परस्परविरोधी आहेत, तर काहींच्या मते हाच एक मार्ग आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांची मतेही भिन्न आहेत. स्टीफन हॉकिंग म्हणतात, 'मानवाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर आपल्याला पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जावे लागेल.' तर, ई.ओ. विल्सन म्हणतात, की 'मानवाने पृथ्वीचा किमान अर्धा भाग संपूर्णपणे संवर्धन करून जैवविविधता जोपासली तर मानवी अस्तित्व सुरक्षित राहील.' कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्यासाठीही आज वेळ उरलेला नाही. आता वेळ आली आहे ती कृतीची. केवळ सरकार हे प्रश्न सोडवू शकणार नाही हे मात्र सर्वमान्य आहे. मानवी अस्तित्व सुरक्षित करायचे असेल तर पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचे यात योगदान अपेक्षित आहे. कोणी काय करायचे यातही वाद आहेत. पण समस्यांची जाणीव राखणे ही पहिली पायरी आहे. त्यांच्या निवारणात आपली भूमिका जाणून घेऊन आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करणे ही पुढची पायरी.

वाचकांपुढे या समस्यांची विस्तृत मांडणी करून आपल्या समोर असलेल्या पर्यायी मार्गांची ओळख करून देणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

दारिद्रय, विषमता आणि पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांचा उगम कसा झाला? त्यांची वाढ का झाली? आणि आजपर्यंत त्यांच्या निवारणासाठी काय प्रयत्न झाले आहेत? हे या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शाश्वत विकासाच्या अभ्यासासाठी अर्थशास्त्राचा इतिहास आणि अर्थशास्त्राच्या उत्पत्तीचे ज्ञान महत्त्वाचे असल्याने त्यावर या पुस्तकात सविस्तर चर्चा आहे; पण, यात अर्थशास्त्राची सांगड निसर्गस्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्य यांच्याशीही घातली आहे. मानवीसौख्यात नैसर्गिक परिसंस्था आणि संसाधनांचे स्थान आणि अर्थशास्त्रात त्यांना हाताळण्याची पद्धत यांचा विचार मांडला आहे. सामान्य माणसाला अर्थशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत, संज्ञा आणि संकल्पना कळाव्यात यासाठी सोप्या भाषेत आणि बाळबोध स्वरूपात त्यांवर विवेचन केले आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना हे कदाचित फार प्राथमिक वाटेल; त्याबद्दल आधीच क्षमा मागतो!

पहिल्या चार प्रकरणांतून मुख्यत: मानवी इतिहास आहे. पृथ्वीवर माणसाला उच्च स्थान कसे प्राप्त झाले यावर थोडी चर्चा आहे. पुढे मानवी इतिहासातील चार अवस्था - अन्न-संकलन, शेती, व्यापारी व औद्योगिक - आणि त्यातून सामाजिक आणि पर्यावरणीय बदल काय झाले यांवर विवेचन केले आहे. प्राचीन मानवाच्या साध्या वस्तुविनिमयातून आधुनिक अर्थव्यवस्था कशी बांधली गेली याचा आढावा पुढे घेतला आहे. धर्म आणि युद्ध यांचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम मांडला आहे. पाचव्या प्रकरणात आधुनिक अर्थव्यवस्था कशी आहे हे सोप्या भाषेत मांडून काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून सांगितल्या आहेत. सहाव्या प्रकरणात आधुनिक अर्थव्यवस्थेच्या मर्यादा आणि त्यांतून उद्भवणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा आहे. अर्थव्यवस्थेचा सामाजिक आणि पर्यावरणीय ठसा; त्यावर पाश्चात्त्य आणि भारतीय विचारसरणींतील तोडगे काय होते त्याबद्दल मांडणी केली आहे. सातव्या प्रकरणात शाश्वत विकास म्हणजे काय, त्यात जागतिक विचारधारा काय आहे, यांची चर्चा आहे. पुढे शाश्वत विकासासाठी पर्यायी अर्थव्यवस्था कशी असायला हवी यावर विवेचन केले आहे. शेवटी, पर्यायी अर्थव्यवस्थेच्या मापन पद्धती कोणत्या असाव्यात हे मांडले आहे.

इतकी वर्षे दृष्टिआड राहिलेल्या पृथ्वीच्या मर्यादा आता अर्थनिर्मितीच्या आड येऊ लागल्या आहेत. हवेतील कार्बन सहन कण्याची क्षमता, सागरांची प्रदूषण पचवण्याची मर्यादा आणि परिसंस्थांची आघात झेलण्याची क्षमता आपण ओलांडली आहे की नाही, यांवर फक्त अनुमाने लावता येतील. पृथ्वीवर साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात पाच वेळा बहुतांश प्रजाती लुप्त होण्याचा प्रसंग आला आहे. याला शास्त्रज्ञ मास एक्स्टिंक्शन असे म्हणतात. पाचही प्रसंगांना नैसर्गिक कारणे जबाबदार आहेत. उल्कापात, ज्वालामुखी, भूकंप, हवामानबदल, बर्फाचे आच्छादन, वातावरणातील बदल, अशा अनेक नैसर्गिक कृती त्यास कारणीभूत होत्या. प्रत्येक वेळेस किमान सत्तर टक्के प्रजाती लयाला गेल्या आहेत आणि वर्चस्व असलेली प्रजातीही नष्ट झाली आहे. पाचही प्रसंगांतील कालावधी कमी कमी होत चालला आहे. निसर्गाच्या चक्रात सहावे मास एक्स्टिंक्शन येईल, यात शंका नाही. निसर्गातील मानवी हस्तक्षेप असेच वाढत राहिले, तर आपल्या हातीच आपला नाश होईल अशी भीती आहे. बेगम अख्तर यांनी गायलेल्या शकील बदायूंनी यांच्या गझलेची इथे आठवण होते -

मेरा अझ्म इतना बुलंद है, कि पराए शोलोंका डर नहीं ।

मुझे ख़ौफ आतिश-ए-गुल से है, ये कहीं चमन को जला न दे ॥

(मला निखाऱ्यांचे भय नाही, पण माझ्या बागेतील पेटलेल्या फुलानेच बाग उद्ध्वस्त होईल याची भीती आहे.)

सहावे मास एक्स्टिंक्शन कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही; पण पृथ्वीवर मानवाचे साम्राज्य आहे आणि मानवाचा नाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवकळा आलीच तर कोणीच वाचणार नाही, हे निश्चित. पृथ्वीवरील समस्या आता कोणा एका राष्ट्राच्या किंवा आर्थिक स्तराच्या राहिलेल्या नाहीत. गरीब-श्रीमंत किंवा प्रगत-मागासलेला असा भेदभाव निसर्ग करणार नाही. सर्व तरतील किंवा सर्वच संपतील. प्रत्येक माणसाने आपली भूमिका निभावली तरच काहीतरी आशा आहे. इतिहास आपल्याला दाखवितो, की निसर्गात प्रत्येक प्रजातीचा विनाश हा अटळ असतोच. एखाद्या प्रजातीचे अस्तित्व इथे किती काळ राहील हे त्या प्रजातीचे परिस्थितीला अनुकूलन करण्याच्या क्षमतेवर ठरते. तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपाचा वेग इतका आहे, की झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीला हजारो प्रजाती अनुकूलन करूच शकणार नाहीत. निसर्गात त्यांचे अस्तित्व हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा आज अंदाज करता येणार नाही. पण असे झाले, तर अन्नसाखळीतील बदलांनी परिसंस्थांची उत्पादनक्षमता घटेल आणि अखेरीस मानवी अस्तित्वाला धोका संभवेल.

या पुस्तकातून वाचकांना निसर्गाला साजेशी भूमिका घेण्याची स्फूर्ती मिळेल, अशी आशा आहे. प्रत्येक वाचक मार्ग निवडून कृतीत उतरवेल ही मोठी अपेक्षा आहे, पण ज्यां पॉल सार्त्रने आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचल्यानंतर समस्याच माहीत नाहीत, असे तरी वाचक म्हणणार नाहीत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aksharnama
Top