Friday, 06 Jul, 5.50 am अक्षरनामा

नवे लेख
विश्वेश्वरय्या 'एक महान अभियंता होते' म्हणणाऱ्या कुणालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व कळलेले नाही!

'द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरय्या' हे मुकुंद धाराशिवकर यांनी लिहिलेले सविस्तर चरित्र नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला चरित्रलेखकानं लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश...

इतर कोणाही तरुण अभियंत्याप्रमाणे विश्वेश्वरय्या हे नाव अगदी विद्यार्थी असतानाच माहीत झाले. ते एक 'फार मोठे' अभियंता (इंजिनीअर) होते हे कळाले. इतरांच्या '...जय'मध्ये आम्हीही आमचा '...की जय'चा आवाज मिसळवू लागलो. वर्षांमागून वर्षे जातच होती.

"ते कोणत्या कामामुळे एवढे ग्रेट झाले हो?'' माझा दहा वर्षांचा मुलगा मला प्रश्न विचारीत होता. प्रश्न विश्वेश्वरय्यांबद्दल असण्याबाबत नव्हता; पण आपले विचार, आपले आदर्श हे पुन्हा तपासून पाहिले पाहिजेत एवढी जागरूकता निर्माण करणारा होता. त्यातूनच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या समजून घेतले पाहिजेत, ही प्रक्रिया मनात सुरू झाली; बरीच वर्षे मनात घर करून राहिली.

मुलगी बेंगलुरूला! त्यानिमित्ताने तिथे जाणे-येणे होई. थोडी माहिती काढली. पत्ते मिळवले. श्रीमती शकुंतला कृष्णमूर्तींना भेटलो. सतीश मोक्षगुंडम यांनाही भेटलो. त्यांच्याशी झालेल्या अनेक भेटींमधून आणि चर्चांतून, एम.व्ही. हे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून कसे होते, ते एखाद्या प्रसंगात कसे वागत, कशी प्रतिक्रिया देत, हे समजू लागले. जसे समजू लागले, तसतसा त्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच पाहिजे हा माझ्या मनातला रस वाढू लागला.

म्हैसूरचे दिवाण किंवा पंतप्रधान! त्यामुळे तिथे बरेच कागदपत्र असणार, हा होरा होता. घर बेंगलुरूला होते, तिथेही कागदपत्रे सापडतील ही अपेक्षा होतीच. या दोन्ही गावांनी निराश केले नाही. म्हैसूर राजवाडा, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, म्हैसूर; इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, बंगलोर; तामीळनाडू स्टेट सेंटर ऑफ इन्स्टिट्यूट्स, चेन्नई; तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, हैदराबाद इथून बरीच कागदपत्रे मिळाली. ती झेरॉक्स करून घेता आली. विश्वेश्वरय्यांचे घरी, म्हणजे सतीश यांच्याजवळ असलेले आणि त्यांनी मुद्देनहळ्ळी येथील संग्रहालयात ठेवलेले सगळे दस्तऐवज मला मिळाले. अनेक दुर्मीळ छायाचित्रे मिळाली. अनेक ठिकाणी जाऊन मला फोटो घेता आले.

हा शोध आणि भटकंती हा जवळजवळ पाच वर्षांचा काळ होता. मी जे जे पाहत होतो, ऐकत होतो, त्यावरून एक गोष्ट पुन:पुन्हा स्पष्ट होत गेली : 'त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नाही!'

किंबहुना, 'ते एक महान अभियंता होते' असा एक शिक्का मारून बाजूला सरकून जाणाऱ्या कुणालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व कळलेले नाही. हत्ती पाहू इच्छिणाऱ्या आंधळ्यासारखी आमची 'दृष्टी' आहे. 'आम्हाला कळेल तेवढीच समोरची व्यक्ती' ही भावना समाजात सर्वत्रच, सर्वदूर पसरलेली दिसते.

आम्हाला जेवढे माहीत तेवढेच विश्वेश्वरय्या, हा मुद्दा मला मान्य नव्हता. मला 'ते जसे होते तसे' समजून घ्यायचे होते, समजून द्यायचे होते.

विश्वेश्वरय्यांनी आपल्या उमेदीच्या आयुष्यातली सुमारे सव्वीस वर्षे सलगपणे महाराष्ट्रात घालवली. (एडन दोन वर्षे आणि सक्कर एक वर्ष, हा यात पडलेला खंड हा अपवाद!) मात्र, त्यांच्या या समग्र व्यक्तिमत्त्वाचे चित्र आमच्यासमोर उभे करील असा ग्रंथ मला मराठीत मिळाला नाही. पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्रात जी कामे केली, त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे महाराष्ट्र PWD किंवा इरिगेशनमध्ये मिळाली नाहीत. १९४१ मध्ये त्यांनी 'इरिगेशन कमिशन'समोर जी ऐतिहासिक साक्ष दिली, तिच्या अधिकृत नोंदीही मला इथे मिळाल्या नाहीत.

तरीही मि. सतीश म्हणत होते, 'कर्नाटकापेक्षा महाराष्ट्राने विश्वेश्वरय्या चांगले जपले आहेत.' त्यांना (महाराष्ट्राला ते अधिक जवळचे, आपले वाटतात.) हे विधान खरोखरच करायचे असेल आणि तशीच वस्तुस्थिती असेल, तर नि:संशयपणे तो मोठाच आनंद आहे.

मला विश्वेश्वरय्यांमध्ये दिसले ते एक विजिगीषू व्यक्तिमत्त्व! लढवय्या वृत्तीने, कितीही विपरीत प्रसंग ओढवला तरीही डगमगून न जाता त्याला तोंड देत देत, यशस्वीपणे त्या संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधणारे व्यक्तिमत्त्व! ताठ, निर्णयकठोर, सगळी कामे ठरल्यानुसार पार पडतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवणारे, चतुरस्र, हाताखालच्या व्यक्तीकडून कठोरपणे काम काढून घेणारे, त्याचबरोबर त्यांना वेळेवर जेवण मिळेल याची काळजी घेत कार्यालयात त्यादृष्टीने व्यवस्था करणारे, जादा कामासाठी 'ओव्हरटाईम देणारे' आणि हाताखालच्या व्यक्तींची कार्यक्षमता वाढावी म्हणून 'एफिशियन्सी ऑडिट' करवणारे!

ते खूप संतापले आहेत, असे प्रसंग फार सापडत नाहीत. ते आणि महात्मा गांधी हे विचाराने विरुद्ध टोकांवर होते. मात्र, तरीही दरबारात ब्रिटिश अधिकाऱ्याला खुर्ची; मात्र दिवाणासह सर्व अधिकाऱ्यांनी जमिनीवर बसायचे, ही पद्धत त्यांना मान्य नव्हती. अशा वेळी त्यांनी जो मार्ग वापरला, तो गांधीजींचा मार्ग होता. सनदशीर बहिष्काराचा मार्ग!

विश्वेश्वरय्या हे स्वत:बद्दल, स्वत:च्या कामाबद्दल फारसे बोलत नाहीत, लिहीत नाहीत. जणू ते म्हणतात, 'मी उभी केलेली कामे पाहा. माझ्याबद्दल ती कामेच तुम्हाला सारे काही सांगतील.' त्यांनी 'Memoirs of my Working Life' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे! इंग्रजीतून! मात्र, त्यात स्वत:, स्वत:चे कुटुंब यांना अजिबात जागा नाही. काम आणि कुटुंब या जणू व्यक्तिमत्त्वाच्या भिन्न बाजू आहेत. त्यामुळे त्यांच्या या आत्मचरित्रातून त्यांनी कोणकोणती कामे केली हे कळते, त्यांच्या कालावधीबद्दलच्या नोंदीही मिळतात; पण इतर सर्व बाबतीत ते मौन बाळगतात.

अगदी पहिल्या कामावर असताना त्यांनी आपल्या वरिष्ठांना पत्र पाठविले. 'प्रशासनाचे आर्थिक नुकसान होऊ नये' म्हणून लिहिले. मात्र, उत्तरात मिळाला तो मेमो! 'तुम्हाला सल्ला देण्यासाठी नव्हे, तर काम करण्यासाठी नेमले आहे. ते काम करा. जमत नसेल तर राजीनामा द्या' असे कठोरपणे कळवणारे हे पत्र मिळाल्यावर त्यांची काय मानसिक स्थिती झाली व त्याला त्यांनी कसे तोंड दिले, हे ते कधीच उघडपणे सांगत नाहीत.

अशा वेळी मला आणखी एक स्रोत सापडला. त्यांनी वरिष्ठांशी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्या कामांबद्दल वृत्तपत्रात आलेल्या टीका, स्तुतीपर लेख, स्वत: त्या आकडेवारींना दिलेली उत्तरे... सगळे काही! सुमारे ५५० पानांचा एक, असे ३६ खंड आहेत. मला पुष्कळशा नोंदी मिळाल्या, त्या तिथून! आता ही सगळी कागदपत्रे उलट गणना करता १२० वर्षे ते ७५ वर्षे एवढ्याच जुन्या काळातली आहेत. त्यांचे टायपिंग पुसट होऊ लागले आहे. त्यांचे स्कॅनिंग, मायक्रोफिल्मिंग अथवा फोटोकॉपिंग करून त्यांचे जतन करायला हवे. तो एक राष्ट्रीय ठेवा आहे.

मी सांगत होतो तो मूळ मुद्दा वेगळाच आहे. विश्वेश्वरय्या हे एक अभियंता म्हणून महान होतेच, त्याचबरोबर ते एक उत्तम प्रशासक होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे पंतप्रधानपद/दिवाणपद अत्यंत उत्तमपणे संभाळले. एका व्यक्तीचे सगळे आयुष्य ज्या कामांत संपून जाईल अशी कामे त्यांनी त्या पाच-साडेपाच वर्षांत केली.

ते उद्योगांचे एक श्रेष्ठ जाणकार होते; किंबहुना स्वत:च उद्योजक होते. त्यामुळे 'भद्रावती स्टील' हा कारखाना मोडीत काढावा आणि भंगारात विकून टाकावा, असा सल्ला 'तज्ज्ञ', 'परदेशी' सल्लागारांनी दिल्यानंतर कारखान्यामधून सर्व अमेरिकन तंत्रज्ञांना काढून टाकून, केवळ स्थानिक माणसांच्या सहकार्याने, तेही फक्त साडेपाच वर्षांत, सर्व तोटा भरून काढून त्यांनी कारखाना फायद्यात आणून दाखवला.

सर्व प्रगतीचे मार्ग हे शिक्षणातून जातात. त्यामुळे, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे इथपासून ते कौशल्य विकासाचे तांत्रिक शिक्षण आणि महाविद्यालयीन उच्च शिक्षण यांवर त्यांनी भर दिला. मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यासाठी इंजिनीअरिंग डिप्लोमा सुरू केला. घराबाहेर राहून शिक्षण घेता यावे यासाठी खासकरून मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली. 'शिक्षण हे स्थानिक भाषेतून आणि उच्च शिक्षण इंग्रजीतून' हा विचार रुजविला. त्यासाठी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचे कानडीत भाषांतर करून घेतले. 'कन्नड साहित्य सभे'ची स्थापना केली. व्यापार, उद्योग, कारखानदारी, स्वयंरोजगार यांमध्ये तरुणांना शिरता यावे यासाठी विचार देणारी 'इकॉनॉमिक परिषद' स्थापन केली.

मुळात या सगळ्या उद्योगांना लागतो, तो पैसा! तो पैसा उपलब्ध करून देऊ शकेल अशी बँक काढली. त्यातून शेतकऱ्यांनाही 'पीक कर्ज' द्यायला सुरुवात केली. थोडक्यात, 'सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा आर्थिक स्तर सुधारणे' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून धोरण आखले. अशी धोरणे आखता यावीत व राबविता यावीत म्हणून दिवाणपद; त्यातून उद्योगधंद्यांना उत्तेजन देणारे धोरण, त्या उद्योगांसाठी पैसा हवा म्हणून बँका, कामगार हवेत म्हणून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम, कारखानदारी-व्यवस्थापन उत्तम व्हावे म्हणून तंत्रज्ञ आणि उच्चशिक्षित मंडळी, कारखानदारीचा चांगला विकास व्हावा म्हणून उत्तम पायाभूत सुविधा. रस्ते, रेल्वे, वीज, दूरसंपर्क यंत्रणा या पाणी आणि कालव्यांपेक्षाही त्यांना महत्त्वाच्या वाटत ते याच कारणासाठी!

सर्व काम करू शकण्याच्या वयात असणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या हातांना बाराही महिने काम मिळाले पाहिजे, त्या कामांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यांवर त्यांचा भर होता. सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे शेतीवर अवलंबून; आणि शेती ही अनियमित पावसावर अवलंबून, हे चित्र बदलायला हवे; शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी व्हायला हवी. जे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून 'ब्लॉक पद्धत', शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रक्रिया उद्योग; शेतीला पूरक अशा दूध, अंडी, वगैरे रोख पैसे देणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन, शेतमाल व भाजीपाला विक्रीची सहकारावर आधारित योजना, एक ना अनेक!

उद्देश एकच - "माझ्या देशाचा नागरिक सुखी व्हावा!'' सुखी होण्यासाठी त्याला त्याची जात, धर्म, लिंग, कुळ, शिक्षण, वगैरे कोणत्याही गोष्टी आड येऊ नयेत. 'माझ्या पूर्वजांनी हे उत्तम केले, ते इतके मोठे होते' हा इतिहास विसरावा. वर्तमानात जगावे. त्यासाठी जगात जे जे काही उत्तम मिळेल, ते ते घ्यावे. आपल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावा. आपली माणसे तयार करावीत; त्या त्या उद्येागांना भारतीय रूप द्यावे, या उद्देशाने त्यांनी अकरा पुस्तके लिहिली. 'Reconstructing India' हा समग्र विकासाचा विचार आणि 'Nation Building' हा पंचवार्षिक योजना म्हणजेच लघुकालीन व दीर्घकालीन विकासाचा मार्ग त्यांनी १९२० सालीच देशासमोर मांडून ठेवला. त्यांसाठी त्यांनी इतर छंद सोडले. आवडीनिवडी नव्हत्याच. 'माझ्या देशाचा विकास' या एकाच मार्गावर चालत राहिले. आपल्या बुद्धी, कष्टाळू वृत्ती, वेळेबाबतचा काटेकोरपणा, नीटनेटकेपणा, एकदा एखादा विचार पटला आणि त्यानुसार निर्णय घेतला की पुन्हा मागे वळून न पाहता त्याचा पाठपुरावा करून तो पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार, हे सगळे दुर्मीळ गुण त्यांच्या व्यक्तित्त्वात आश्रयाला आले. वाढले. उत्तुंग शिखरे असलेले हिमालयासारखे उंच व्यक्तिमत्त्व म्हणून ते आपल्यासमोर उभे राहिले. दुर्दैवाने त्यांच्या या पैलूचा फारसा परिचय भारतीयांना नाही; मराठीत तर असे पुस्तकच नाही. इंग्रजीतही मला फारसे संदर्भ मिळाले नाहीत. जवळजवळ पन्नासच्यावर व्यक्तींना भेटी, दहा-वीस ठिकाणी वारंवार जाऊन माहिती व छायाचित्रे गोळा करणे, यांतून मला हा ग्रंथ लिहिण्यासाठी जी सामग्री लागते ती गोळा करता आली. त्यातून मला विश्वेश्वरय्या किती कळले, जे कळले ते किती पेलवले, जे पेलवले ते तुमच्यापर्यंत किती पोहोचवता आले ते तुम्हीच उत्तम रीतीने ठरवू शकाल.

विश्वेश्वरय्या यांच्या 'वर्किंग लाईफ'ची सुरुवात झाली ती मुंबई PWDमधील नाशिक विभागात, धुळे येथे असिस्टंट इंजिनीअर म्हणून! एप्रिल १८८४ पासून सोळा महिने ते धुळ्याला होते, धुळ्यातल्या PWDमध्ये! त्या खात्यात काम करणारे आणि काम करून निवृत्त झालेले इंजि. पाटोळे, इंजि. ओसवाल, असेच अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील व त्यांचा चमू, नाशिकस्थित मुख्य अभियंता देशमुख तसेच माझे इतर सहकारी सतीश पाटील, जकातदार, इत्यादी मंडळींच्या साहाय्याने धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबारमधील सर्व प्रकारचे अभियांत्रिकी व्यवसाय - म्हणजे शिक्षण, निर्मिती, सेवाक्षेत्र, सरकारी व्यवस्थापन तसेच ठेकेदारी वा तत्सम व्यवसाय ह्या सर्व क्षेत्रांतील - तसेच, विद्युत, यांत्रिकी, स्थापत्य, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, इत्यादी सर्व विद्याशाखांमधील सर्व अभियंत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी 'भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृती समिती' स्थापन केली. त्यामार्फत ज्या जागेत विश्वेश्वरय्या १८८४-८५ मध्ये बसत असत, ती जागा शोधून काढली. मिळवली. तेथेच त्यांचे स्मारक व्हावे यादृष्टीने 'विश्वेश्वरय्या जीवन व कार्य' या स्वरूपाचे एक मोठे व सुंदर असे कायमस्वरूपी संग्रहालय स्थापन केले. हे मला करता आले, अनेकांच्या सहकार्याने करता आले; याचा मला रास्त अभिमान आहे आणि सर्व सहकाऱ्यांबद्दलही मला आदर व अभिमान आहे.

असा आदर्श समोर ठेवणारी माणसे एकांडी आणि एकाकीच असतात. बहुधा लोकांना आवडतील असे निर्णय ते घेत नाहीत, त्यामुळे ते खूप लोकप्रियही नसतात. दीर्घकालीन कल्याणाच्या योजना ह्या बहुधा खूप श्रम करायला लावणाऱ्या असतात, खूप वाट पाहायला लावणाऱ्या असतात. त्यामुळेच अशी दूरदृष्टी असणारी माणसे इतरांपासून पन्नास पावले पुढे असतात. त्यांच्या विचारांची झेप आम्हा सर्वसामान्यांना समजत नाही. उद्योगासाठी आपला जीव पाखडणारे विश्वेश्वरय्याही समाजाला पेलवले नाहीत. पं. नेहरू म्हणत असत- 'लोकनेत्याने लोकांपेक्षा फार पुढे जाऊन चालत नाही. जरा मागे हात केला, तर गर्दीतल्या एखाद्याला तो लागेल एवढेच अंतर असावे.'

'त्यामुळेच जिल्हा विकास, त्यातून राज्याचा विकास, त्यातून देशाचा विकास' हा पुस्तकात उत्तम वाटणारा त्यांचा विचार देशातल्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला नाही. केवळ म्हैसूरमधल्या दोन जिल्ह्यांनीच त्यांना प्रतिसाद दिला.

विश्वेश्वरय्या त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन-चार दशकांतच विस्मृतीत गेले. त्यांची कार्ये व त्यांनी उभे केलेले लोकोत्तम आणि उत्तुंग मानदंड तरी असे विस्मृतीत जाऊ नयेत, म्हणून हे पुस्तक माझ्या हातून घडले असावे.

एक महान अभियंता, एक उत्तम प्रशासक, एक दूरदृष्टी असलेला उद्योगपती, त्यासाठी आवश्यक असलेले अर्थज्ञान असलेला अर्थनीतिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, क्रीडा व करमणुकीवर प्रेम करणारा, स्थानिक भाषेच्या समृद्धीसाठी झटणारा, शेतकऱ्यांचे व सामान्य माणसाचे जीवन प्रगतीपथावर जावे व त्यांची उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर आपले श्रम पणाला लावणारा, पायाभूत सुविधा विकसित करणारा, देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारा आणि ती सत्यात कशी आणता येतील ह्यावर विचार करून अकरा पुस्तके लिहिणारा; असे हे पैलू एकाच विश्वेश्वरय्या या माणसाचे आहेत, यावर कुणाचा विश्वासही काही दशकांनंतर बसणार नाही!

दुर्दैवाने त्यांचा आवाज आज जपलेला नाही. पत्रे, सह्या, वगैरे आहेत. मात्र, तेही नष्ट होतील अशा अवस्थेत! एखाद्या संस्थेने अथवा शासनाने पुढाकार घेऊन हे जतन करायला हवे. यातून अनेक स्फूर्तिदायक गोष्टी बाहेर येतील.

सन १९३७ मध्ये सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना, त्यांनी पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 'उद्योग विकास नीती'साठी एक समिती नेमली होती. विश्वेश्वरय्या हे त्या समितीत तंत्रज्ञ म्हणून प्रमुख होते. तो अहवाल ३७ खंडांत आहे. मला तो पाहता आला नाही; पण त्याचा शोध घ्यावयास हवा व तो पाहिल्यावर या विषयावर अधिक प्रकाश टाकता येईल.

या पुस्तकाचे काम करताना मी जणू त्यांच्या सहवासातच होतो. चार-पाच वर्षे मला हे सुख भोगता आले, हा आनंद अवर्णनीय आहे.

विश्वेश्वरय्या, विश्वेश्वरैय्या, विश्वेश्वरअय्या, विश्वेश्वराया असे वेगवेगळे उच्चार मराठीत वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. 'Vishveshvaraya' हे त्यांच्या नावाचे मूळ स्पेलिंग! त्यावरून उच्चार विश्वेश्वराया व्हायला हवा. मात्र, विश्वेश्वरय्या हा उच्चार रूढ आहे, तोच मी येथे सर्वत्र वापरला आहे. इतर कुणाला दुसरा कोणताही उच्चार हा नाव म्हणून वापरायचा असेल, तर हरकत नाही.

मुकुंद धाराशिवकर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aksharnama
Top