Thursday, 17 Oct, 11.11 am AM News

देश विदेश
मलाही राग येतो-कधी-कधी नाचावेसेही वाटते - धोनी

नवी दिल्ली । महेंद्रसिंग धोनी म्हणजे गुढ व्यक्तिमत्व. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. मुळात खेळाडू म्हणून सध्या तरी तो आपले विचार, मते कायम खासगीत ठेवतो. वनडे वर्ल्डकपनंतर त्याने बीसीसीआयकडून सुटी मागून घेतली. तो लष्कराच्या सेवेत रुजू झाला. दरम्यान त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा झाली; पण त्याने याबाबत काही न बोलणे पसंत केले. बुधवारी तो बऱ्याच महिन्यांनी मीडियापुढे आला.

शांतचित्त स्वभावामुळेच धोनीची ओळख भारतीय क्रिकेटमध्ये 'कॅप्टन कूल' बनली. दोनवेळचा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीवर विजय आणि पराभवानंतर कधीही भावनांचे ओझे जड झालेले नाही. 'प्रत्येक सामन्यानंतर भावना उचंबळून येतात पण मी त्यावर सहज नियंत्रण राखतो,' असे धोनीने सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी 'कॅप्टन कूल' नावाने ओळखला जातो. तुलनेत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा नेहमी आक्रमक असतो आणि कित्येकदा त्याच्या या स्वभावाचं दर्शन सर्व क्रिकेटप्रेमींना झालेलं आहे. मात्र मी देखील इतरांसारखाच आहे, फक्त मैदानात मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो, एका दिलेल्या मुलाखतीत धोनी बोलत होता. "मी असं म्हणेन, मलाही इतरांप्रमाणे नैराश्य येतं. मलाही कधीकधी राग येतो, पण या सर्व भावना कधीही कायम नसतात. त्या क्षणी एक कर्णधार किंवा खेळाडू म्हणून काय करणं गरजेचं आहे हे माझ्यासाठी नेहमी महत्वाचं असतं. आता यापुढे मी काय करु? कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याबद्दल विचार करायला लागलो की सर्व भावनांमधून मी बाहेर येतो."

सध्या महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार धोनी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी दिली. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत साहानेही पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यष्टींमागे चांगली कामगिरी केली आहे. त्यातचं ऋषभ पंतच्या फलंदाजीतल्या अपयशावर निवड समितीसह प्रशिक्षक रवी शास्त्रीही नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आगामी काळात निवड समिती ऋषभ पंतला संधी देते की महेंद्रसिंह धोनी संघात पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AM News
Top