Wednesday, 23 Sep, 5.49 pm AMC Mirror

होम
'माझे कुटुंब' मोहिमेत सर्व्हे करू.. पण डाटा भरणार नाही; आशा सेविकांचे आंदोलन

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्य सरकारने कोरोना रुग्णांच्या शोधासाठी सुरू केलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेत फक्त घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण आम्ही करू, पण त्याचा डाटा भरण्याचे काम आम्ही करणार नाही, असा पवित्रा आशासेविकांनी घेतला आहे. तसेच सर्व्हेक्षणाच्या कामाचा रोज ३०० रुपये भत्ता दिला जावा, अशीही त्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी बुधवारी काम बंद करून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.


अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदसमोर निदर्शने करून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी सर्वेक्षणास आशा सेविकांनी विरोध दर्शवून त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. ग्रामीण भागात मोबाईलला रेंज नसते. अशा परिस्थितीमध्ये आशा सेविका मोबाईलवर माहिती भरू शकत नाही. तसेच दररोज किमान ३०० रुपये भत्ता दिल्याशिवाय आशा सेविका सर्वे करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. माझे कुटुंब-माझे जबाबदारीमधील सर्व्हे व डाटा भरण्याची दोन्हीही दिलेली कामे एकाच वेळी पार पाडली जाऊ शकत नाहीत. आशा सेविका फक्त सर्वे करतील त्यांच्यावर डाटा भरण्याची सक्ती करू नये, त्या मोबाईलवर माहिती भरणार नाहीत तसेच हा सर्वे करताना इतर कामे शिथिल करा व जुलै 2020 पासून आशा सेविकांना 2 हजार रुपये व गटप्रवर्तकांना 3 हजार रुपये 1 ते 10 ऑक्टोंबरच्या पगारात फरकासह देण्यात यावे, जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत सर्वे केला जाणार नाही, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, कामगार कायद्यातील कामगार विरोधी धोरण मागे घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, जिल्हा सचिव अ‍ॅड.सुधीर टोकेकर, कोमल कासार, रुपाली बनसोडे, विजया लंके, अंबादास दौंड, सुनंदा भोसले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या. माझे कुटुंब-माझी जबाबदारी सर्व्हेसाठी आशा वर्करवर शासनाने मोठी जबाबदारी टाकली असली तरी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना ही जबाबदारी मान्य नसून, आयटक संघटनेतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी प्रतिरोध दिवस पाळण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: AMC Mirror
Top