Sunday, 16 Feb, 11.00 pm अर्थसाक्षर

नवे लेख
आर्थिक नियोजन - भाग ३

"मी, टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे का?" व्यावसायिक असलेल्या एका मित्राने विचारलेला प्रश्न.

"तुझी आर्थिक साक्षरता काय कौल देते?" माझा प्रतिप्रश्न.

मग त्याने त्याच्या एकंदरीत त्याच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची आकडेमोड सांगायला सुरुवात केली.

"यातली निकड भासल्यास ताबडतोब रोकड सुलभता देईल अशी किती मालमत्ता आहे?" माझ्यातल्या सल्लागाराने विचारले.

"लगेच तर नाही सांगता येणार पण होऊ शकते", असे मोघम उत्तर मित्राने दिले.

तुझ्या पहिल्या प्रश्नाला काहीतरी उपप्रश्न आहे असे मला जाणवतेय म्हटल्यावर मित्राने उत्तर दिले, " मला टर्म इन्शुरन्स हा 'खर्च' वाटतो."

तेव्हा कुठे मला कळाले की खरी मेख ही आहे तर!

 • भारतात विमा हा सुरक्षिततेपेक्षा गुंतवणूक म्हणूनच अधिक विकला जातो. आर्थिक जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर काही दुर्दैवी प्रसंग ओढावल्यास कुटुंबाची आर्थिकदृष्टया आबाळ होऊ नये म्हणून विमा कवच असणे गरजेचे आहे. त्यामुळे कमवित्या व्यक्तीने प्रथम मुदतीचा विमा "खर्च" म्हणून विकत घ्यावा व नंतर जोखीम स्विकारण्याची क्षमता नसलेल्यांनी स्थिर अथवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या विमा योजनांत गुंतवणूक करावी.
 • "विमा" हा शब्द तसा प्रत्येकाच्या परिचयाचा करून देण्यात आयुर्विमा महामंडळाचे मोठे योगदान आहे. पूर्वी विमा हे गुंतवणूकीचे साधन म्हणून बघितले जाई. जेव्हा खासगी कंपन्यांना विमा व्यवसायात येण्याची परवानगी मिळाली तेव्हा विम्याचे शुद्ध गुंतवणूक सोडून सुरक्षितता या संज्ञेकडे संक्रमण झाले.
 • २०१४ साली स्विडीश अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणात सरासरी भारतीय व्यक्तीला किंवा कुटुंबाला १ कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाची आवश्यकता असतांना केवळ ८ लाखांचे कवच असल्याचे नमूद केले आहे.
 • सुपर मार्केटमधे गेल्यावर सर्वच वस्तू गुणवत्ता व नाममुद्रा यांच्यानुसार कमी जास्त किमतीत उपलब्ध असतात. त्याप्रमाणे सध्या विम्यासोबत विविध पर्याय उपलब्ध आहेत. विमा घेताना तुम्हाला कुटुंबासाठी सुरक्षा कवच हवे आहे की तुम्ही विम्यापोटी भरलेल्या हप्त्यावर परतावा हवा आहे, हे अगोदर ठरवावे लागेल.
 • विमा खरेदी करतांना कुठल्या गरजा पडताळून बघितल्या पाहिजेत हेच कुणी आपल्याला सांगत नाही आणि सांगितले जरी तरी ते आपल्या पचनी पडत नाही. कारण विमा घेतांना हप्ता (Premium) कमी पण सुरक्षा कवच (Insurance Cover) अधिकचे हवे, ही आपली पहिली अट असते. तर मी भरलेले पैसे परत मिळाले पाहिजेत, ही दुसरी अट असते.
 • विमा घेताना पुढील घटकांचा विचार केला गेला पाहिजे -

  वरील सर्व मुद्दे एका आर्थिक सूत्रात बसवून तुम्हाला किती रकमेचा विमा गरजेचा आहे, हे तपासून विमा खरेदी करणे गरजेचे आहे.

 • समजा कुटुंबाचा सध्याचा वार्षिक खर्च ३,६०,००० /- रुपये आहे. म्हणजेच पुढील २५ वर्षात घर खर्चासाठी ८ % महागाई दराने अंदाजे २ कोटी ५० लाख रुपये लागतील. कर्जे व देणी ७५ लाख रुपये. पाल्याचे शालेय व उच्च शिक्षण पूर्ण करण्यासठी ९० लाख रुपये. या सर्वांची बेरीज केल्यास ४,१८,६०,०००/- रुपयांचे विमाछ्त्र तुम्हाला आवश्यक आहे.
 • टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्ही आयकर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक असते. तुमच्या उत्पन्नाचा निश्चित स्त्रोत माहित असणे अनिवार्य आहे.
 • वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक जबाबदारी किंवा जोखीम जास्त असू शकते म्हणूनच तरुण व्यक्तीस जास्त विमाछ्त्र तर वयस्कर व्यक्तीस कमी विमाछ्त्र प्राप्त होऊ शकेल अशी व्यवस्था विमा नियंत्रकाने करून ठेवली आहे. म्हणूनच सरासरी मुदतीचा विमा हा वयाच्या ६५ पर्यंत घेणे उचित असते.
 • कुठल्या वयोगटाला वार्षिक उत्पन्नाच्या किती विमाछ्त्र मिळू शकते, याची एक आदर्श सूची पुढील प्रमाणे असते.

 • कमवित्या व्यक्तीला त्याच्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची त्याच्या पश्चात पूर्तता होण्यासाठी सुरक्षितता गरजेची असते. म्हणूनच त्याला मुदतीचा शुद्ध विमा (Term Insurance) "खर्च" म्हणून घेणे आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे.
 • "गुंतवणूक" म्हणून टर्म इन्शुरन्सच्या हप्त्याकडे बघितल्यास जर विमा घेतलेल्या कालावधीत दावा आल्यास कुटुंबाची फरफट होणार नाही एवढी रक्कम नक्कीच मिळू शकते.
 • मित्राकडून बाहेर पडतांना नवी चारचाकी गाडी बघितली. सहजच विचारले या गाडीचा विमा उतरविला आहे का? अर्थातच.. त्याने उत्तर दिले.

  का? कारण गाडीला काही अपघात वगैरे झाल्यास खिशातून खर्च करणे परवडण्यासारखे नसते म्हणून. मग तुम्हाला काही झाल्यास कुटुंबाचा व व्यवसाय सुरु ठेवण्यासाठीचा खर्च कोण करणार? माझा प्रश्न. मित्र अनुत्तरीत झाला.म्हणूनच सुरक्षितता ही "प्राथमिकता" असली पाहिजे "पर्याय" नाही, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

  - अतुल प्रकाश कोतकर

  9423187598

  atulkotkar@yahoo.com

  Dailyhunt
  Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArthaSakshar
  Top