Wednesday, 25 Mar, 8.32 am अर्थसाक्षर

नवे लेख
गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट - आर्थिक नियोजनाची फरफट?

आज गुढीपाडवा ! दरवर्षी आनंद आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या सणावर यावर्षी मात्र "कोरोना" नामक विषाणूचे सावट आहे. दरवर्षी बाजारपेठा तुडुंब भरून वाहत असतात. सोने, फर्निचर, कपडे, अप्लायन्सेस, इत्यादी वस्तूंच्या खरेदीची झुंबड उडालेली असते. यावर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे सगळीकडे सामसूम आहे, अर्थात ती आवश्यकच आहे.

"दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल.". सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका. आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही मात करण्यात आपल्याला यश मिळेल.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. पण, परिस्थितीला घाबरून न जाता धीराने तोंड द्या.

 • दररोज घड्याळ्याच्या गजराच्या आवाजाने नाईलाजाने उठून एका क्षणाचीही उसंत न घेता आपण फक्त धावत असतो. पण आता मात्र "सेल्फ क्वारंटाईन"च्या निमित्ताने का होईना, तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या अनेक आवडत्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ मिळेल.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळ खेळा, त्यांना विविध गोष्टी शिकवा. त्यांना अनेक बोधप्रद गोष्टी सांगा.
 • पुस्तके वाचा, चित्रपट पहा. नेटफ्लिक्स व अमॅझोन प्राईम यासारख्या चॅनेल्सनी आपल्या मेम्बरशिपच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. अनेक चांगल्या वेबसिरीज पाहता येतील.
 • अशा अनेक गोष्टी ज्या रोजच्या व्यापात करायला जमत नाहीत, त्या तुम्हाला करता येतील. त्या तुम्ही कराच पण याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम करा.
 • व्यायामासाठी अनेक ॲप्स मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे बाहेर न जाता कोणत्याही मशिनशिवाय तुम्ही घरच्या घरी व्यायाम करू शकता. दिवसातून किमान चाळीस मिनिटे तरी व्यायामासाठी राखून ठेवा.
 • या सर्व गोष्टी तुम्ही सहज कराल किंवा करत असाल. पण याचबरोबर तुम्हाला तुमच्या भवितव्याची चिंता काही प्रमाणात सतावत असेल. हा ताण हलका करणाऱ्या खालील गोष्टी आवर्जून करा.

  १. नवीन कौशल्ये आत्मसात करा -

 • Udemy या विविध कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटने आपले अनेक कोर्सेस फ्री केले आहेत, तर काही कोर्सेसची फी कमी केली आहे. त्याचा लाभ घ्या व आपल्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारे कोर्सेस करा.
 • Udemy सारख्या ऑनलाईन कोर्सेस देणाऱ्या अजूनही काही चांगल्या वेबसाईट आहेत. तुम्ही त्यामधील एखादा कोर्स निवडू शकता एखादी अशी कला किंवा कौशल्य जी भविष्यात तुमच्या पर्यायी उत्पनाचे साधन बनू शकेल त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्या.
 • २. आर्थिक नियोजन -

 • अर्थसाक्षर.कॉम ने वेळोवेळी आर्थिक नियोजनाचे महत्व पटवून देणारे, त्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे लेख प्रसिद्ध केले आहेत.
 • प्रत्येक लेखामध्ये आपत्कालीन निधी म्हणजेच "इमर्जन्सी फंड"चे महत्व अधोरेखित केले आहे.
 • सध्या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचे परिणाम खूप काळ राहणार हे निश्चित. अशा परीस्थितीत आपला इमर्जन्सी फंड व्यवस्थित राखून ठेवा.
 • जर आर्थिक नियोजन केले नसेल, तर घाबरून जाऊ नका. यामधून धडा घ्या आणि जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करा.
 • ३. बचतीची संधी -

 • पाडव्याच्या नवीन खरेदीचे, सुट्टीमध्ये बाहेर फिरण्याचे, इत्यादी अनेक प्लॅन्स तुम्हाला रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे तुमची एकप्रकारे बचत झालीच आहे.
 • पुढे काय होईल काही सांगता येत नाही, ही परिस्थिती सुधारायला वेळ लागणार आहे. त्यामुळे बचतीचा योग्य विनियोग करा.
 • "होम क्वारंटाईन" चालू असल्यामुळे, पेट्रोल, बाहेरचं खाणं, चित्रपट, इत्यादींवर खर्च होणारे सर्व पैसे वाचले आहेत. त्यामुळे नकारात्मक मानसिकतेला दूर सारून सकारात्मक विचार करा.
 • ४. दीर्घकालीन गुंतवणूक बंद करू नका -

 • शेअर बाजार कोसळला, आता काय? म्युच्युअल फंड गुंतवणूक खरंच सुरक्षित असते का? माझी महिन्याची 'एसआयपी' बंद करू का? असे अनेक प्रश्न मनात येत असतील. पण घाबरून जाऊ नका.
 • आपली दीर्घकालीन गुंतवणूक तशीच चालू ठेवा. लक्षात घ्या दीर्घकालीन गुंतवणूक म्हटली की चढ उतार येतच राहणार. ते अपेक्षितच असतं. त्यामुळे आपली गुंतवणूक काढून घेऊ नका.
 • ६. आरोग्य विमा -

 • आरोग्य विमा घेतला असेल, तर त्याचे नूतनीकरण कधी आहे ते तपासा. जर जवळ आले असेल, तर ते तातडीने करा.
 • "कोरोना व्हायरस"च्या ट्रीटमेंटच्या खर्चाबाबत आपल्या आरोग्य विमा पॉलिसीचे नियम व अटी समजून घ्या. बहुतेक सर्व विमा कंपन्या हा खर्च 'कव्हर' करत आहेत. परंतु तरीही एकदा नियम व अटी समजून घ्या.
 • आरोग्य विमा घेतला नसेल, तर कृपया त्याचे महत्व ओळखा.
 • गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. तो आपल्या कुटुंबासोबत घरात राहूनच आनंदाने साजरा करा.

  टीम अर्थसाक्षरतर्फे 'अर्थ'पूर्ण व आरोग्यदायी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

  Dailyhunt
  Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: ArthaSakshar
  Top