Wednesday, 05 Aug, 2.47 pm बहुजननामा

होम
रशियानं सर्वांच्या अगोदर बनवलंय 'कोरोना'विरूध्दचं वॅक्सीन ? WHO नं सांगितलं सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या आठवड्यात रशियाने घोषणा करून सर्वांना चकित केले होते की, ते ऑक्टोबरपासून कोरोना विषाणूची लस तयार करण्यास सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे रशियाने स्वतः असे म्हटले आहे की, उत्पादनासह लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू राहील. रशियाच्या लस बनवण्याच्या दाव्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने शंका व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने रशियाला लस उत्पादनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. खरंतर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टियन लिंडमियर यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकार परिषदेत विचारले गेले होते की, फेज ३ मधील चाचणी न करता लस तयार करण्यासाठी परवाना दिल्यास संघटना त्याला धोकादायक घोषित करते का ?

रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी घोषणा केली होती की, त्यांचा देश कोविड-१९ विरुद्ध ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात लस अभियान सुरू करण्याची तयारी करत आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, लस विनामूल्य असेल आणि सर्वप्रथम ती डॉक्टर आणि शिक्षकांना दिली जाईल. रशियन आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, उत्पादनासह लसीची क्लिनिकल चाचणीही सुरू राहिल आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

लिंडमियर म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा अशा बातम्या येतील किंवा अशी पावले उचलली जातील तेव्हा आपण सावध राहिले पाहिजे. अशा बातम्या सावधगिरीने वाचल्या पाहिजेत.’

ते म्हणाले, “कधीकधी असे घडते की काही संशोधक दावा करतात की त्यांनी खरोखरच एक महत्त्वाचा शोध लावला आहे, जी खरोखरच एक चांगली बातमी असते. परंतु एखादे संशोधन करणे किंवा लसीचे परिणामकारक निकाल येणे आणि सर्व क्लिनिकल चाचण्या पार करणे यात खूप फरक आहे. आम्हाला अद्याप अशी कोणतीही अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही. जर अधिकृतपणे काही घडले असते तर युरोपमधील आमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी नक्कीच या प्रकरणात लक्ष घातले असते.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एक सुरक्षित लस तयार करण्यासाठी बरेच नियम आहेत आणि यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही आहे. या नियमांचे आणि मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करणे महत्वाचे आहे जेणेकरुन आम्हाला हे माहित होऊ शकेल की, एखादी लस किंवा उपचार किती प्रभावी आहे आणि एखाद्या रोगाविरुद्ध लढण्यास मदत करू शकतात.

ते म्हणाले, मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करून आम्हाला हे देखील समजते की कोणत्याही उपचारांचा किंवा लसीचा दुष्परिणाम आहे किंवा त्याच्या फायद्यापेक्षा नुकसान तर होणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर क्लिनिकल चाचण्या घेतलेल्या २५ लसींची यादी केली आहे, तर १३९ लस सध्या पूर्व-क्लिनिकल अवस्थेत आहेत. फेज ३ च्या क्लिनिकल चाचणीमध्ये फक्त काही लस आहेत ज्यात रशियाची लस समाविष्ट नाही. आतापर्यंत ब्रिटनची ऑक्सफर्ड, अमेरिकेची मॉर्डना आणि चीनची सीनोव्हॅक लस तिसर्‍या टप्प्यात आहे.

त्याच वेळी रशियाच्या एका वृत्तसंस्थेनुसार, ‘सेचेनोव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीतर्फे लसीची चाचणी घेण्यात आली आहे. या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा १८ जूनपासून सुरू झाला होता, ज्यामध्ये १८ स्वयंसेवकांच्या गटाला लस दिली गेली होती. यानंतर २३ जून रोजी दुसरा टप्पा सुरू झाला, ज्यामध्ये २० लोकांच्या गटाला लस दिली गेली.’ Sputnik च्या एका अहवालात असे म्हटले गेले की, ‘गामालेया इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’कडून लस तयार केली आणि तिच्या सुरक्षेची पुष्टी केली गेली. मात्र संशोधन रचना आणि टाईम फ्रेम पाहिल्यानंतर तज्ञांनी या लसीचा पहिला टप्पा मानला आहे.

वास्तविक लस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात मानवाच्या छोट्या गटावर लसीच्या सुरक्षेची चाचणी केली जाते. लसीची मोठ्या प्रमाणावर तपासणी होण्यापूर्वी ही चाचणी अनेक वर्षे चालू शकते. यामध्ये ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या गटांवर चाचणी केली जाते. बाजारात येण्यापूर्वी या प्रक्रियेस काही वेळा १० वर्षे देखील लागू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली होती की, लस तयार करण्यासाठी घाई करू नये. लसीच्या चाचणीत थोडीशी चूक झाल्यास लोकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. मात्र कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानादरम्यान अनेक तज्ञांनीही या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२१ च्या सुरूवातीच्या काळात लस येण्याबाबत म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BahujanNama
Top