टीम बाईमाणूस
- नंदुरबारच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकानेच मुलीसाठी फोडला MPSC औषध निरीक्षक पदाचा पेपर
- 12 लाखांच्या सौद्यात तीन MPSC अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक, प्रकरण ब्रेकअपमुळे उघडकीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमृत पाटील हा केवळ एक सामान्य पालक नसून, नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक आहे.
विशेष म्हणजे त्याला यापूर्वी राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच शिक्षकाने आपल्या मुलीला, ऋतुजा पाटीलला, परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी संपूर्ण कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
12 लाखांचा सौदा, अधिकाऱ्यांचा थेट सहभाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत पाटील याने प्रवीण पाटील या दलालाच्या मदतीने MPSC च्या तीन अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला आणि तब्बल 12 लाख रुपयांना पेपर विकत घेण्याचा सौदा केला.
यापैकी 5 लाख रुपये रोख स्वरूपात अगोदरच देण्यात आले होते, तर उर्वरित 7 लाख रुपये अद्याप द्यायचे बाकी होते. या व्यवहारात एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, तसेच गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते हे दोन कक्ष अधिकारी सामील असल्याचे तपासात उघड झाले आहे. या तिघांनी संगनमताने मूळ प्रश्नपत्रिकेतून प्रश्न घेऊन स्वतंत्र संच तयार केला आणि तो लीक केला.
प्रेमप्रकरण, ब्रेकअप आणि सूड
लीक झालेला पेपर ऋतुजा पाटीलने अभ्यासासाठी आपला त्यावेळचा बॉयफ्रेंड गौरव याला दिला. परीक्षा पार पडल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाला. या रागातून गौरवने सूड घेण्याचे ठरवत थेट पोलीस आणि MPSC कडे पेपरफुटीचे पुरावे सादर केले, आणि त्यातूनच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
आमदार रोहित पवार यांनी जुलै महिन्याच्या अखेरीसच हा मुद्दा उपस्थित केला होता. नंदुरबारमधील एका कोचिंग क्लासमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी बहुतांश प्रश्नांची माहिती मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर MPSC ने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
गौरवची यू-टर्न भूमिका, पोलिसांचा संशय
तपासादरम्यान गौरवचा जबाबही नोंदवण्यात आला. मात्र तपास आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचे लक्षात येताच गौरवने पुन्हा MPSC शी संपर्क साधत, आपला गोंधळ झाल्याचे सांगत तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावर एका तपास अधिकाऱ्याने स्पष्ट शंका उपस्थित केली "जर गौरवचा खरोखर पेपरफुटी उघड करण्याचा उद्देश असता, तर त्याने परीक्षा होण्याआधीच MPSCला ही माहिती दिली असती."
गुन्हे शाखेने मंगळवारी MPSC ला अहवाल सादर करत एफआयआर नोंदवला, आणि बुधवारी सहा आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. मुख्य आरोपी ऋतुजा पाटीलला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही, तिला केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती विद्यार्थी आणि इतर कोणत्या परीक्षांचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

