प्रसाद लाड
- भारताची स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने आज निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. अजिंक्यसाठी हा निर्णय सोपा नव्हता, कारण गेली अनेक वर्ष तो संघाबाहेर होता.
- निवृत्तीचा व्हिडीओ शेअर करताना 'तुम्ही मला कधी परकं मानलं नाही' हे बोलताना तो भावूक झाला होता.
- अजिंक्य रहाणे हा बुडत्याला आधार आहे...संकटांत तारून नेणारी नौका आहे...पराभूतांमध्ये प्राण फुंकणारे नवचैतन्य आहे...तरीही भारतीय क्रिकेटविश्वातल्या मनसबदारांच्या रांगेत त्याला मान मिळाला नाही. त्याच्या गुणवत्तेचा यथोचित सन्मान झाला नाही.
- अशा या अव्वल दर्जाच्या परंतु प्रकाशझोतापासून दूर राहणाऱ्या अजिंक्यच्या चाहत्यांच्या मनातल्या खदखदीला वाट करून देणारा हा लेख…
तरुणाई तर त्याच्यासाठी वेडी होतीच, पण खासकरून तरुणींच्या गळ्यातला तो ताईत होता. मराठी सिनेसृष्टीत खऱ्या अर्थाने तो हिरो (धष्टपुष्ट, अभिनयाचा वारसा असलेला, पण आजच्यासारखा दिखाऊ सिक्सपॅक वगैरे नसलेला) होता. हा हिरो एकामागून एक यशाची शिखरं चढत होता. सिनेसृष्टीच्या नभांगणातील हा तारा चमकत असताना एका मध्यमवर्गीय कुटुंबात एका बाळाचा जन्म झाला. अन् त्या हिरोच्या नावावरून आपल्या बाळाचं नाव ठेवायचं, त्यांचं ठरलं. जेव्हा एखाद्याला डोळ्यासमोर ठेवून आपल्या बाळाचं नाव ठेवलं जातं, तेव्हा तो त्याच्यासारखा यशस्वी व्हावा, असं आई-वडिलांना वाटत असतं. पण घडलं मात्र सोन्याहून पिवळं. म्हणजे, तो हिरो मराठी सिनेसृष्टीपुरताच बऱ्यापैकी मर्यादित राहिला असला तरी या पठ्ठ्याची कीर्ती मात्र जगभरात पोहोचली. आपल्यातील सुप्तगुणांच्या जोरावर जगभरात त्याचं गुणगान गायलं गेलं. अजिंक्य देववरून ज्याचं नाव ठेवलं होतं, तो आता तुमच्या लक्षात आला असेलच, ही गोष्ट आहे अजिंक्य रहाणेची.
शापित योद्धा
भारताचं नेतृत्व करताना सर्वार्थाने 'अजिंक्य' राहिलेला रहाणेंचा घरातला हा कायम स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवणारा चिरंजीव. अजिंक्यची रास कोणती हे माहिती नाही, पण त्याच्या राशीला शापितपण पुजलेलं. अजिंक्यकडे काय नाही. तंत्रशुद्ध फलंदाजी आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे फटके आहेत. कुशल नेतृत्त्वगुण आहेत. कितीही संकटं आली तर त्यांचा समर्थपणे सामना करणारी निधडी छाती आहे. शांतचित्ताने परिस्थिती हाताळण्याची हातोटी आहे. खेळाला जागण्याचं, जगवण्याचं स्पिरीट आहे. 'लीडिंग फॉर्म द फ्रंट' म्हणजेच संघापुढे आपल्या खेळाचा आदर्श ठेवण्याची कुवत आहे.
एका आदर्श कर्णधाराला किंवा खेळाडूला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. पण सध्याच्या घडीला हातात काय, तर पुन्हा एकदा जैसे थे. क्रिकेटची सेवा तो करतच राहिला, पण सरतेशेवटी ललाटी शापितपणाचा लागलेला शिक्का अजून पुसला गेलेला नाही. कारण अजिंक्यने नेतृत्व करताना इतिहास रचला असला तरी त्याला आयपीएलमध्ये कर्णधार करायला त्याचा संघही तयार नाही.
form is temporary class is permanent, असा क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार आहे. गेल्या आयपीएलला अजिंक्यचा फॉर्म चांगला नव्हता, त्यामुळे हे खेळाडू नेतृत्व करण्यात अकुशल आहेत, असं म्हणणं कधीच योग्य ठरणार नाही. उलटपक्षी भारतीय संघ जेव्हा जेव्हा संकटात सापडला होता, तेव्हा अजिंक्यनेच देशाला तारलं आहे. ही फक्त ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची गोष्ट नाही, तर यापूर्वीही जेव्हा धरमशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना होता, अन् कोहली खेळणार नव्हता, तेव्हा हा काटेरी मुकुट अजिंक्यच्याच डोक्यावर चढवला होता. त्यावेळीही अजिंक्यने भारताला विजय मिळवून दिला होता. पण तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतरही नाहीच नाही.

अजिंक्यचं चुकतं कुठे माहिती आहे का, तो बोल्ड नाही. बोल्ड म्हणजे फक्त उथळपणा नाही, तर आपल्या यशाचं योग्य मार्केटिंग त्याला कधीच करता आलं नाही. किंवा झालेल्या अपमानाला कधीच वाचा फोडता आली नाही.एरवी, रोहित शर्मा किंवा विराट कोहलीपेक्षा तो भारताचे भविष्य उज्ज्वल बनवू शकतो, असं त्याच्याबाबत काही माजी क्रिकेटपटू बोलू लागतात. तिथे अजिंक्यचा मात्र शांततेच्या फेऱ्यात अडकलेला अभिमन्यू झालेला असतो. हे चक्रव्यूह त्याच्याच स्वभावानं बनलेलं असतं आणि त्यामध्येच तो गुरफटून जात आहे. ते भेदताना तो सध्याच्या घडीला तरी दिसत आहे. वास्तविक अजून अजिंक्य बरीच वर्षं खेळावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण जिथे एका मालिकेत चार अर्धशतकं झळकावल्यानंतरही अजिंक्यला संघातून बाहेर काढलं होतं, तर यापुढे त्याचं कधी काय होऊ शकतं, हे सांगणं उचित नाही !
खेळात राजकारण मात्र आणायचं नसतं, आपण आपल्या ताकदीच्या जोरावर जे कमावू शकतो तेवढंच आपलं, असंच कदाचित अजिंक्यचं तत्त्व असेल. त्यात काही गैर नाहीच. पण जेव्हा गोष्ट तुमच्या अस्तित्वाची लढाई येते तेव्हा तरी तुम्ही झगडायला हवं. युद्धात सर्वच माफ असतं, असचं काहीसं सध्याच्या घडीला खेळातही दिसतं. पण साम, दाम, दंड, भेद हे कधीच अजिंक्यच्या भात्यातील अस्त्र नाहीत, असं वाटतं. एक आदर्शवत खेळाडू तर तो नक्कीच आहे, याबद्दल कोणाचं दुमत नाही.
कर्णासमान भागधेय
हिरा कुठेही राहिला तरी तो चमकणारच, ही गोष्ट खरी. पण तो हिरा आहे, हे या दुनियेत सातत्याने बिंबवावं लागतं. कारण जमाना मार्केटिंगचा आहे. कचकड्यांनाही कोटींची किंमत मिळते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गादीवर बसतात. ती गादी उबवतात. त्यांचा उदो उदो होतो. पण अजिंक्यसारखा खेळाडू त्या गादीचा पाइक होऊन हातात झेंडा घेऊन उभाच राहतो, हीच गोष्ट मनाला बोचत राहते. अजिंक्यपेक्षा गुणवत्तेने सुमार असलेल्या खेळाडूंनी बरंच कमावलं. फक्त पैसाचं नाही तर गादीही. पण अजिंक्य मात्र अजूनही जिथे होता तिथेच आहे. त्याचा ग्राफ जसा वर जातो, तसा तो पुन्हा पूर्वपदावर येतो, हे आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. कधी तरी अजिंक्य कर्णासारखाही वाटतो. या गादीसाठी तू राजकुलातला नाहीस, असं त्याला नियती सांगत आली आहे. काही क्षणासाठी त्याला गादीवर बसता येतं. तो राज्यही करतो. प्रजेला सुखीही ठेवतो. पण त्याला या गादीचं सुख मात्र मिळत नाही. कर्णासारखीच निराशा पदरी पडत असतेच, पण त्यावर तो चकार शब्द काढत नाही.
कर्णाकडे असलेली गुणवत्ता जशी अर्जुनाच्या तोडीस तोड होती, तशी ती त्याच्याकडेही आहेच. पण त्या गुणवत्तेला कोणी वाली दिसत नाही किंवा ती जाणूनही त्याला तशी संधी मिळत नाही. कर्ण हा कौरवांच्या बाजूने लढला, म्हणून तो खलनायकाच्या रांगेत दिसतो, एवढंच. पण युद्ध संपल्यावर कर्णाबाबतचं सत्य जेव्हा समोर येतं, तेव्हा पांडवही गळितगात्र होतात. तसंच अजिंक्य जेव्हा खेळत नसेल तेव्हा त्याच्या या गुणवत्तेचे गोडवे नक्कीच गायले जातील. पण खेळत असताना मात्र गुणवत्तेच्या जोरावर तो भारतीय संघाचे कर्णधारपद (हंगामी नव्हे) पटकावू शकलेला नाही, हे तेवढंच सत्य आहे.
अजिंक्यचा प्रेरणादायी नेतृत्त्वगुण
आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचं उदाहरण घ्या ना. म्हणजे विराट कोहली नेतृत्व करत असताना भारतीय संघ पराभूत झाला होता. पराभवाच्या छायेत तो संघाला सोडून गेला. तो फक्त पराभव नव्हता, तर लक्तरं वेशीवर टांगलेली होती. अवघ्या ३६ धावांत भारताचा संपूर्ण संघ माघारी परतला होता. तशा ३६ धावा एका षटकातही भारतीय क्रिकेटपटूंनी फटकावल्या आहेत. पण ही गोष्ट म्हणजे भारताच्या क्रिकेट इतिहासाला कलंकित करणारी होती. त्या पराभवाच्या राखेतून भरारी घेणं हे कर्मकठीण काम होतं. ते शिवधनुष्य कोणत्याही येरागबाळ्याला पेलता आलं नसतं.

पण अजिंक्यने ते पेलवून दाखवलं. त्याने पळ काढला नाही. कदाचित मला कर्णधारपद नको, असं तो म्हणू शकला असता. पण पळपुट्या ठरेल तो अजिंक्य कसला? आपला संघ पुढील सामने मोठ्या फरकाने हरणार, असं भाकितही काहींनी केलं होतं. शांत डोकं आणि प्रचंड जिद्दीच्या बळावर तावून सुलाखून अजिंक्यनं मेलबर्नच्या कसोटीत फक्त शतक झळकावलं नव्हतं, तर भारताच्या कामगिरीवर हसणाऱ्यांचे दात त्याने घशात घातले होते. एक कर्णधार बदलला तर किती फरक पडू शकतो, हे त्याने त्यावेळीच थंड डोक्याने दाखवून दिलं होतं. पहिल्या कसोटीत रथी-महारथी एकामागून एक कोसळले. तेच भारताचे क्रिकेटपटू दुसऱ्या कसोटीत ३६० डिग्रीमध्ये बदलतात, हा बदल कर्णधाराच्या नेतृत्वगुणातून संघात दिसत असतो.
अजिंक्यने कर्णधार म्हणून एक आदर्शवत खेळी साकारली आणि संघाला लढण्याची उमेद दिली. धैर्य दिलं, आत्मविश्वास दिला. आणि त्याच्या जोरावरच भारतीय संघ 'बचेंगे तो और भी लढेंगे' अशा वृत्तीने पेटून उठला. अखेरपर्यंत म्हणत लढत राहिला. सिडनी आणि ब्रिस्बेनची कसोटी हे त्याचंच द्योतक आहे. ऑस्ट्रेलियाला नामोहरम करण्याचं काम अजिंक्यच्या नवोदित शिलेदारांनी फत्ते केलं. ज्या खेळाडूला सकाळी आपल्या बुटाची लेस बांधता येत नव्हती, तो दिवसभर मैदानात उभा राहिलेला पाहायला मिळाला. हा चमत्कार अजिंक्यच्या नेतृत्वाने करून दाखवला होता. ऐतिहासिक मालिका विजय झाला होता. भारतात आल्यानंतर प्रचंड कौतुक सोहळे पार पडले. अजिंक्यने कोट्यवधींच्या काळजात गाभाऱ्यासारखं पवित्र स्थान निर्माण केलं. जंगी स्वागत झालं पण त्यानंतर पुढे काय, पुन्हा 'जैसे थे!'
सॉफ्ट टार्गेट
तेव्हा अजिंक्यच्या नेतृत्वाचे गोडवे गाणारे, आता त्याच्या फलंदाजीतल्या त्रुटी काढण्यात गर्क आहेत. हाच फलंदाज काही दिवसांपूर्वी तुम्हाला तारणहार वाटला होता, त्याच्या वीरतेचे पोवाडे तुम्हीच गायलेत आणि आता तो तुमच्या काळ्या यादीत जाऊन बसला. एवढ्या कमी काळात एवढा मोठा बदल होऊ शकतो. पण अजिंक्यच्या बाबतीत होऊ शकतो. कारण तो कोणाला जाब विचारत नाही, प्रतिकार करत नाही. कुणाला अंगावर घेत नाही. कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेत नाही. त्याची बाजू धरून लावणारं कोणी नाही. त्यामुळे सर्वात सॉफ्ट टार्गेट तोच ठरतो. हीच गोष्ट अजिंक्यच्या बाबतीत आतापर्यंत होत आली आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांपासून तो भारतासाठी एकही ट्वेन्टी-२० सामना खेळू शकला नाही किंवा गेल्या तीन वर्षांमध्ये एकही एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. नंतर शिक्का बसला तो फक्त कसोटी क्रिकेटचा. पण हा शिक्काही पुसला गेला.

सलग शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूलाही भारतीय संघात सातत्याने संधी दिली जाते, त्याचं लांगूलचालन केलं जातं पण अजिंक्यला वरदहस्त नाही. लहरी नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. या सर्वातून अजिंक्य आता संपला हे सांगण्याचा उद्देश नक्कीच नाही, उलटपक्षी तो आता अग्निदिव्यातून बाहेर पडलेला आहे. बावनकशी सोनं आहे. पण त्या सोन्याची किंमत मात्र कोणालाच नाही, अशी सध्याची स्थिती आहे.
आपल्यांनी नाकारला, परक्यांनी कौतुकला
भारतामध्ये त्याची किंमत फारशी कोणाला नसली तरी जे कधीही खोटं कौतुक करत नाहीत, त्या ऑस्ट्रेलिच्या आजी-माजी खेळाडूंनी अजिंक्यचं कौतुक केलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं ठरतं ते माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवातही झाली नव्हती. तेव्हा चॅपेल यांनी म्हटलं होतं की, " अजिंक्य हा एक आक्रमक कर्णधार आहे. तो मैदानावर आक्रमक दिसत नसला तरी तो आपल्या कृतीतून आक्रमकपणा दाखवतो. त्यामुळे अजिंक्यचे नेतृत्व हे पाहण्यासारखं असतं." आपण एकेठिकाणी विराट कोहलीचं नेतृत्व पाहतो आणि दुसरीकडे अजिंक्यचं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तर विराट हा पंचांशीच वाद घालत असल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी आयसीसीने त्याच्यावर कारवाईही केली.
पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका होत असताना त्याने ज्यापद्धतीने परिस्थिती हाताळली ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती. त्यावेळी पंचांनीच अजिंक्यला सांगितलं होतं की, तुम्ही मैदान सोडून जाऊ शकता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला होता, आम्ही जर असं केलं तर ही गोष्ट खेळभावनेसाठी चांगली ठरणार नाही. त्यामुळेच अजिंक्य हा किती विचार करुन मैदानात वावरणारा खेळाडू आहे, हे लक्षात येतं.
अमर्याद संयमाचा धनी
एके काळी रणजी करंडकामध्ये धावांचे डोंगर उभारत असतानाही अजिंक्यला संधी मिळत नव्हती. तेव्हा खासगीत तो काही गोष्टी म्हणायचाही. आता आयपीएलमध्ये एका सामन्यात चमक दाखवलेल्या खेळाडूसाठी भारतीय संघाचे दार सताड उघडं करून ठेवलं जातं. पण अजिंक्यला त्यासाठीच काही वर्षं वाट पाहायला लागली, हे कुठेतरी सलतं. संधी मिळाल्यावर अजिंक्यने त्याचं सोनं केलंच. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात (ट्वेन्टी-२०) दमदार अर्धशतक झळकवलं. पण आता ट्वेन्टी-२० संघाचं दार त्याच्यासाठी बंद आहे. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतच्या अखेरच्या सामन्यात अजिंक्य नाबाद राहिलेला आहे. पण तरीही तो संघातून बाहेरच आहे. ही सल नक्कीच एका दर्दी चाहत्याला टोचणारी आहे. फक्त तो मुंबईचा आहे म्हणून नाही, तर गुणवत्ता नसताना जिथे खेळाडूच्या पदरी रत्नं पडतात तिथे अजिंक्यच्या पदरात निखारा का, हा खरा प्रश्न आहे.

जेव्हा दिल्ली कॅपिटल्सला आपला कर्णधार निवडायचा होता. निवड कोणाची झाली, ज्याने कधीही नेतृत्व केलं नाही, पण जो युवा आहे अशा रिषभ पंतची. त्याच्याबद्दल आकस नाही. पण कर्णधार हा संघाची मोट बांधणारा हवा, अनुभवी हवा. संघाला बरोबर घेऊन चालणारा हवा. मैदानात उतावळेपणा, बालिशपणा करणारा नको, एवढं किमान समीकरण तरी कर्णधार निवडताना असायला हवं होतं. अजिंक्यकडे काय नाही. त्याने भारताचं यशस्वीपणे नेतृत्व केलं आहे.
आयपीएलमध्येही त्याने संघाची धुरा वाहिली आहे. अनुभव प्रचंड गाठीशी आहे. संघबांधणी करू शकणारा आहे. संघातील खेळाडूंशी संवाद साधणारा, त्यांना हवं नको ते पाहणारा (मैदानात) तो आहे. पण हे सर्व असूनही वारस म्हणून गादीवर बसण्याचा मान मात्र नाही. एवढं सगळं पचवत तरी कसा असेल अजिंक्य, हा कधी कधी प्रश्न नक्कीच पडतो. एखादी व्यक्ती एवढ्या शांतपणे कसं हे सर्व सहन करू शकते, त्यावर चकारही न बोलता. तेही संयमाचा पुतळा बनून, हेच मनाला कधी कधी रुचत नाही.
अजिंक्यची फलंदाजी हा खरंतर कौतुकाचा विषय आहे. कारण क्रिकेटच्या पुस्तकात असलेले सर्व फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. अचुक टायमिंग आहे. उत्तम पदलालित्य आहे. कणखर बचाव आहे. बॅकफूटवर खेळतानाही त्याचे फटके सरस असतात. चेंडूचा सामना करताना त्याची नजर उत्तम असते, फटका मारताना त्याचं डोकं चेंडूच्या रेषेमध्ये येतं. त्यामुळे तो जेव्हा एखादा कव्हर्सला शॉट मारतो किंवा स्ट्रेट ड्राइव्हचा फटका खेळतो, तेव्हा तुमच्या मनात तो नक्कीच भरतो.
काही दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा, ट्वेन्टी-२० साठी चांगला सलामीवीर कोण, याची चर्चा माजी क्रिकेटपटूंमध्ये सुरु होती. त्यावेळी अजिंक्यचंच नाव आघाडीवर होतं. कारण कमी चेंडूंमध्ये अजिंक्य खेळपट्टीवर स्थिरस्थावर होतो, पण दुसरीकडे रोहितला सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडासा वेळ घेता येतो, पण ट्वेन्टी-२०मध्ये तुम्हाला लवकर स्थिरस्थावर व्हावं लागतं. ते कसबं अजिंक्यकडे नक्कीच आहे.
पण अजिंक्यची एक गोष्ट मात्र खुपते. जेव्हा एखादा चेंडू निर्धाव जातो किंवा तो मिस करतो, तेव्हा तो खेळपट्टी सोडून बाजूला जातो आणि बऱ्याचदा देवाचा धावा करत असल्याचे पाहायला मिळते. देवाचा धावा करणं, काही गैर नक्कीच नाही. यापूर्वी बऱ्याच जणांनी तसं केलं आहे, पण ते निदर्शनास आलं नाही. कारण ते सातत्याने या गोष्टी करत नाहीत. पण अजिंक्यकडून हे बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचा आपल्या फलंदाजीवर किंवा तंत्रावर कमी विश्वास आहे का, अशीही टीका केली जाते. पण सरतेशेवटी तो प्रत्येकाच्या स्वभावाचा, विचारांचा किंवा कृतीचा भाग आहे. त्यामुळे कुणाला नुकसान तर नक्कीच होत नाही, हे महत्वाचं.
अजिंक्यची लव्हस्टोरी
अजिंक्य रहाणेसारखा लाजरा-बुजरा, शांत मुलगा कोणाच्या प्रेमात वगैरे पडू शकतो, असं कुणाला वाटलंही नसेल. कारण लोकांच्या विचारांचे जे परिघ असतात ते फारच छोटे असतात. हे असंच आणि ते तसंच होऊ शकतं, त्यापुढे काहीच होऊ शकत नाही, असे त्यांचे विचार असतात. पण अजिंक्यची लव्हस्टोरी ही रंजक आहे. अजिंक्य आणि राधिका हे लहानपणापासूनचे सच्चे मित्र. कारण त्यांच्यामधला मैत्रीचा धागा अजूनही कायम आहे. लहानपणापासून ते एकत्र वाढले. पण दोघांचे स्वभाव मात्र भिन्न. ती बोल्ड, तर अजिंक्य शांत. ती आग तर अजिंक्य बर्फ, असंच काहीसं म्हणून शकतो. पण ' opposites attract'असं म्हटलं जातं आणि ते त्यांच्याबाबतीत खरं ठरतं. कारण स्वभाव जरी भिन्न असले तरी एका सुवर्णमध्यावर ते येतात आणि तिथूनच त्यांचा प्रवास सुरु होतो.
आपल्यामध्ये जे काही आहे, ते खरंच प्रेम आहे का? याची कल्पनाही त्यांना नव्हती. पण बाकिच्यांना मात्र या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे वाटत होते. अजिंक्यच्या प्रत्येक कठिण प्रसंगात ती त्याच्या पाठिशी ठामपणे उभी असायची. कदाचित त्यांनी एकमेकांना जाणलं होतं, पण हे प्रेम आहे, हे मात्र त्यांच्या गावी नव्हतं. पण जेव्हा अजिंक्य भारतीय संघात दाखल झाला आणि या दोघांचा लग्न करण्याचा निर्णय झाला. या दोघांचा २६ डिसेंबर २०१४ रोजी विवाह झाला. अजिंक्य आणि राधिका यांना आर्या नावाची एक गोंडस मुलगीही आहे.

क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडतच असतात. बिशनसिंग बेदी आहे म्हणून गुणवत्ता असूनही पद्माकर शिवलकर यांना भारतीय संघात स्थान मिळालं नाही. बेदींपेक्षा चांगली कामगिरी शिवलकर यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये केली होती. पण भारतीय संघाची टोपी त्याच्या डोक्यावर बसली नाही. अमोल मुझुमदारचं तेच. पण अजिंक्यच्या बाबतीत हे झालं नाही, हे दिलासादायक आहे. पण एके काळी सचिन तेंडुलकर खेळत असताना त्याच्या प्रकाशापुढे बाकीच्या खेळाडूंची कामगिरी झाकली जायची. सचिन गेला, सेहवाग आला, धोनी आला, कोहली आला, पण राहुल द्रविड मात्र शापितच राहिला. शापित मनसबदारांची येथे कहाणी सांगत नाही.
असंच कुठेतरी अजिंक्यच्या बाबतीतही होताना दिसतं. पण तसं होऊ नये हीच इच्छा! कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचं श्रेय, त्याची जागा मिळायला हवी. ऑफिसमध्ये हुशार असलेली व्यक्ती प्रमाणिकपणे काम करते परंतु उपेक्षितच राहते. त्याला पद, पगार वगैरे त्याच्या गुणवत्तेनुसार मिळत नाही. पण एखादा उपटसुंभ साहेबाच्या मर्जीत राहून हे सर्व मिळवतो, तेव्हा याचा संताप येतो.
कोणत्याही गोष्टीची दोन चाकं असतात, संसारापासून सर्वच गोष्टींची. खेळाडू किंवा कलाकार व्हायचं असेल तर त्याच्या कारकिर्दीला फक्त गुणवत्तेचं चाक असून चालत नाही, त्याला नशिबाचंही चाक लागतंच. काही वेळा गुणवत्ता कमी पण नशीब बलवत्तर असलेला एखादा राजा म्हणून विराजमान होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त गुणवत्ता असलेला पण नशीब साथ देत नाही, म्हणून राज्यात प्रधान बनून राहतो. पण कधी तरी अजिंक्यला राजा म्हणून पाहण्याचं स्वप्न उरात आहे. कधी तरी त्याला फक्त हंगामी कर्णधार नेमण्यापेक्षा त्याच्या हाती पूर्ण सत्ता देण्यात यावी, असं वाटल्यावाचून राहत नाही. कारण असं जेव्हा होईल तेव्हाच त्याच्या प्रतिभासंपन्नतेला न्याय मिळेल. एक अभ्यासू, जिद्दी क्रिकेट कर्णधार म्हणून त्याचं घवघवीत यश प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहील.
------------------
(लेखक क्रीडा पत्रकार आहेत.)

