- सुशिल गव्हाणे
- महिलांच्या हाती राज्यकारभाराची संपूर्ण सूत्रं असतील, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच असेल आणि पुरुषांची भूमिका केवळ त्यांच्या आयुष्यातील काही वैयक्तिक संबंधांपुरती मर्यादित असेल, तर असं राज्य कसं असेल?
- ही कल्पना आजच्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत कदाचित अवास्तव वाटेल. मात्र, नेटफ्लिक्सवरील 'अक्का' ही वेबसिरीज अशाच एका काल्पनिक मातृसत्ताक राज्याची गोष्ट सांगते.
- विशेष म्हणजे, या राज्यात सत्ता महिलांच्या हाती असली तरी जातीय उतरंड, वंचितांचं शोषण आणि प्रस्थापित घराण्यांचं वर्चस्व कायम आहे. त्यामुळे ही केवळ महिलांच्या सत्तेची गोष्ट राहत नाही, तर सत्ता कोणाच्या हातात आहे यापेक्षा ती कशी राबवली जाते, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते.
आजच्या समाजामध्ये आपण कल्पना करूया की राज्यकारभाराची सूत्रं पूर्णपणे महिलांच्या हाती आहेत. त्यामुळे राज्यामध्ये कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा महिलांनाच आहे. राज्याच्या कारभाराची तसेच वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातली जी नियमावली आहे, ती सुद्धा महिलांनी स्वतः तयार केलेली आहे.
राज्याची सूत्रं सक्षमपणे महिला सांभाळत आहे आणि वेळप्रसंगी राज्यावर जर काही संकट आलं तर त्या संकटासोबत महिला आपल्या क्षमतेनं लढत आहे. राज्यात कोणत्याही निर्णयासाठी महिला पुरुषांवर अवलंबून नाही. राज्यामध्ये महिला लग्न करत नाहीत, त्यांना वाटलं तर त्या फक्त प्रेम करतात आणि त्यांना हव्या त्या व्यक्तीकडून त्या मूल जन्माला घालतात.
असा आपण दोन मिनिटांसाठी काल्पनिक विचार करून पाहूया. अशा पद्धतीचा काल्पनिक विचार देखील आजच्या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत आपल्या डोक्यातही येऊ शकत नाही. अशी ही एकंदरीत सध्याची आपली सामाजिक व्यवस्था आहे. आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये निवडणुकीत राखीव जागी महिला निवडून आल्यानंतर देखील कारभार हा त्या महिलेचा नवराच बघतो.
ती फक्त त्या पदावर नामधारी आणि सही करण्यापूर्ती असते. अशी एकंदरीत सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती असताना अशा पद्धतीची कल्पना करणं म्हणजे हा मूर्खपणा वाटू शकतो. आणि वास्तवात तर दूर अशा विचाराची कल्पनाही आजच्या समाजातील लोकांना पचन अवघड आहे.
पण अशीच एक भन्नाट आणि वेगळ्या कल्पनेची कहानी असलेली 'अक्का' ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. धर्मराज शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित ही सिरीज एका नाविन्यपूर्ण विषयाला काल्पनिक स्वरूपातून आपल्यासमोर मांडते. या सिरीजची कथा 1980 च्या दशकातील पेरनुरु या काल्पनिक राज्यात घडते. या राज्याची परंपरा मागील 800 वर्षांपासून मातृसत्ताक पद्धतीची आहे.
ही कहाणी तशी काल्पनिकच आहे. पण काही समाजांमध्ये पूर्वीपासून मातृवंशीय आणि मातृसत्ताक परंपरा अस्तित्वात होत्या, पण नंतरच्या काळामध्ये अनेक समाजांमध्ये पितृसत्ताक व्यवस्थेचं वर्चस्व वाढत गेलं. आजही काही आदिवासी समाजाबरोबरच इतर काही समाजामध्ये मातृसत्ताक व्यवस्था बघायला मिळते.

तीन प्रदेश, तीन घराणी आणि सत्तेची परंपरा…
या राज्याचा संपूर्ण कारभार महिलाच चालवत असतात. विशेष म्हणजे पेरनुरू या राज्याची मालमेर, पेरप्लाडी आणि हेरकाडा अशा तीन प्रदेशात विभागणी केलेली आहे. मालमेर हा शेतजमिनींचा, पेरप्लाडी हा समुद्रकिनाऱ्याचा तर हेरकाडा हा डोंगराळ भाग आहे.
या तिन्ही भागांचा कारभार वेगवेगळ्या मातृसत्ताक घराण्यांकडे असतो. आधीच्या पिढीमध्ये मुत्थक्का (तन्वी आझमी), दुग्गम्मा (बी. जयश्री) आणि सुब्बम्मा (निवेदिता भार्गव) या तीन महिलांकडं या राज्याच्या कारभाराची सत्ता होती. पुढच्या पिढीमध्येही अशाच पद्धतीची मातृसत्ताक व्यवस्था पुढं चालू राहते.
या राज्यात सोनं आणि दारूच्या व्यापारावरसुद्धा पूर्णपणे महिलांचंच नियंत्रण असतं. त्याचबरोबर परिस्थितीनुसार युद्ध करण्याची शैलीसुद्धा त्यांनी शिकलेली असते आणि राज्यावर कधी संकट आलंच तर या राज्यातील महिलाच युद्ध करून राज्याचं संरक्षण करत असतात.
म्हणजेच एकंदरीत पूर्णपणे त्या राज्याचा कारभार आणि त्या राज्याचं नियंत्रण आणि त्या राज्याच्या कारभाराची सूत्रं ही पूर्णपणे महिलांच्या हातात असतात. राज्यामध्ये पुरुषांच तसं काही विशेष योगदान नाही फक्त जर त्या महिलांना वाटले एखाद्यावर प्रेम करावे तर त्या प्रेम करायच्या आणि त्यांना वाटले एखाद्याकडून मूल जन्माला घालून घ्यायचं तर त्यांनी मूल जन्माला घालून घ्यायचं एवढंच काय ते ह्या राज्यामध्ये पुरुषांचं काम.
या राज्याचे काही परंपरागत नियम ठरलेले असतात. त्या नियमांमध्ये महिलांनी लग्न करायचं नाही, पुरुषांशी संबंध ठेवायचे, प्रेम करायचं, पण लग्न करायचं नाही, अशा पद्धतीचे काही विसंगत नियमही या कहाणीत आपल्याला बघायला मिळतात. याच पद्धतीनं आणखी काही वंश परंपरागत त्यांच्या राज्यकारभाराची नियमावली आहे जी परंपरागत चालत आलेली असते.
या राज्याची व्यवस्था ही पुढं मुलींकडेच जाते. त्यामुळं पुढची राज्याची वारसदार महिला असणं ही देखील या व्यवस्थेची महत्त्वाची अट असते.
800 वर्षांची महिलांची सत्ता; पुरुषांची भूमिका मर्यादित
1985 मध्ये भवानी (कीर्ती सुरेश) ही पेरनुरूच्या सत्तेतील एक महत्त्वाची महिला म्हणून पदावर येते. तिच्या राज्याचा दारूच्या व्यापारावर असलेला अधिकार टिकवण्यासाठी ती मुंबईपर्यंत जाते. त्याचवेळी मुंबईच्या गँगस्टरशी संबंधित असलेली रुद्रा (राधिका आपटे) या पात्राची कहाणीत एन्ट्री होते.
रुद्रा ही काही साधीसरळ कुणी बाहेरची व्यक्ती नसते. तर तिचा पेरनुरूच्या जुन्या राजकीय व्यवस्थेशी आणि घराण्याशी संबंध असतो. या दोघींच्या संघर्षातून राज्याच्या सत्तेची आणि जुन्या परंपरांशी असलेल्या एका वेगळ्याच कहाणीच्या संघर्षाला सुरुवात होते.
यामध्ये मुत्थक्का, दुग्गम्मा आणि सुब्बम्मा या आधीच्या पिढीतील महिलांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या निर्णयांतुनच पुढच्या पिढीतील सत्तेची रचना तयार झालेली असते. त्यामुळे भवानी आणि रुद्रा यांच्यातील संघर्ष हा फक्त दोन महिलांमधील संघर्ष राहत नाही, तर कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या व्यवस्थेचा आणि त्या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या वादांचा संघर्ष बनतो. आधी राजकीय स्वरूपाचा वाटत असलेल्या संघर्ष नंतर सामाजिक स्वरूपाचा वाटायला लागतो.

या सगळ्या सत्तासंघर्षामध्ये भवानी आणि नंदा (विशाक नायर) यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीचं महत्त्वाची आहे. महिलांच्या हाती सत्ता असलेल्या या राज्यामध्ये लग्नाला मान्यता नसते, पण प्रेमसंबंधांना विरोध नसतो, शारीरिक संबंधालाही मान्यता असते.
भवानी आणि नंदा यांचं एकमेकांवर प्रेम असतं. भवानीला आपल्या सत्तेचा वारसा पुढं चालवण्यासाठी मुलगी हवी असते, भवानी सत्ता टिकवण्यासाठी आणि सत्ता चालवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यामुळे तिला नंदाकडून सत्तेच्या वारसासाठी मुलगी हवी असते. पण नंदाला लग्न आणि एक साधंसोपं कौटुंबिक आयुष्य हवं असतं. लग्नाच्या आधी भवानीला मूल द्यायला नंदा तयार नसतो. त्यामुळं त्यांच्यातील प्रेमसंबंधांमध्येही या घराण्याच्या व्यवस्थेचे नियम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातला संघर्ष दिसून येतो.
महिलांच्या राज्यातही जातीय उतरंडीचं वास्तव
या सिरीजमधून एक गोष्ट विशेष लक्षात येते, ती म्हणजे महिलांच्या हाती सत्ता असताना देखील त्यामध्ये जातीय उतरंडीनुसार शोषण झालेलं बघायला मिळतं. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये शोषण होतं, हे एक वेळ लक्षात येऊ शकतं, पण महिलांच्या हाती सत्ता असूनदेखील आदिवासी आणि वंचित महिलांना ही प्रस्थापित घराण्याची व्यवस्था दूरच ठेवते, त्यांच्यावर अन्याय करते, त्यांचं शोषण करते.
हे देखील सिरीज बघताना आपल्या लक्षात येतं.. म्हणजे महिलांच्या हाती सत्ता असताना देखील पुरुषी एक प्रकारे पद्धतीनेचं राज्यकारभार चालतो शोषणाच्या पद्धती त्याच असतात हे लक्षात येतं. नंतर मात्र या वंचित समाजातील महिलांना भवानी सन्मानानं आपल्यात सामावून घेते, त्यांचा सन्मान करते ही गोष्ट आहे. पण ती ते का करते त्याच्या मागं देखील एक गोष्ट बघितल्यानंतर लक्षात येते.
रुद्राच्या आईचा, कुसुमाचा संबंध येरुमा या आदिवासी जमातीशी असतो. तिचं आणि पेनुरूच्या घराण्यातील पद्मण्णा यांचं प्रेमसंबंध असणं हे या घराण्याच्या व्यवस्थेला मान्य नसतं. त्यामुळे या नात्यातून निर्माण झालेला संघर्ष पुढं रुद्राच्या आयुष्यावरही परिणाम करतो.

एका बाजूला राज्याच्या सत्तेवर असलेल्या महिलांची वंशपरंपरा आणि दुसऱ्या बाजूला त्याच व्यवस्थेमुळे दूर लोटल्या गेलेल्या आदिवासी महिलांचं जगणं, त्यांच्यावर झालेला अन्याय हा विरोधाभास इथं बघायला मिळतो. सर्वांगीण बाजूनं संकट जेव्हा या घराण्याच्या राज्यावर येतं आणि भवानीला आपली सत्ता वाचवण्यासाठी मदतीची गरज लागते तेव्हा तिला अशाच वंचित आणि आदिवासी महिलांची मदत घ्यावी लागते. काठावा जमातीतील महिलांना ती मदत मागते.
ज्या महिलांना पूर्वी या राज्याच्या व्यवस्थेनं दूर ठेवलं होतं, त्याच महिला पुढं येऊन या राज्याच्या रक्षणासाठी लढतात. म्हणजेच ज्यांना सत्तेपासून दूर ठेवलं, त्यांचे हक्क,अधिकार नाकारले गेले, प्रस्थापित व्यवस्थेकडून त्यांचा वापर फक्त लढण्यासाठी केला गेला, त्यांच्याच ताकदीची गरज संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांना भासते. हा या सिरीजमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
सत्ताधारी बदलले, पण शोषणाची व्यवस्था कायम
या सगळ्या गोष्टींकडं बघितलं तर एक प्रश्न उपस्थित होतो की सत्ता पूर्णपणे महिलांच्या हाती आली म्हणजे समाजातील शोषण संपुष्टात येऊ शकतं का? असा जर आपण विचार करून बघितला तर.... पण या राज्यात महिलाच सत्ता चालवत असल्या तरी राज्याच्या कारभाराची पद्धत ही पुरुषसत्ताक व्यवस्थेप्रमाणेच दिसते.
सत्ता कोणाच्या हातात आहे यापेक्षा ती सत्ता कशा पद्धतीनं चालवली जाते, कोणाला अधिकार दिले जातात आणि कोणाला व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं जातं, हे जास्त महत्त्वाचं असतं. महिलांच्या हातात सत्ता असताना देखील प्रस्थापित घराण्यांमधील आणि प्रस्थापित समाजातील महिलांचंच वर्चस्व टिकून राहतं. त्यामुळे फक्त सत्ताधारी बदलले म्हणून शोषणाची व्यवस्था बदलतेच असं नाही.
या सिरीजमध्ये आपल्याला भव्यदिव्य मांडणी बघायला मिळते. काही प्रेक्षकांनी तर या सिरीजची तुलना 'हिरामंडी'शी केली आहे. पण दोन्ही सिरीजचा विषय आणि कथानक वेगळं आहे. पारंपरिक वेशभूषा, मोठे सेट आणि ऐतिहासिक वातावरणनिर्मिती अशा गोष्टी अनेकदा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये बघायला मिळतात.
त्यामुळे प्रत्येक वेळी अशाच पारंपरिक पद्धतीनं कथा का दाखवली जाते, असा प्रश्न या सिरीजनंतर सोशल मीडियावर काही प्रेक्षकांनी उपस्थित केला. त्यांचं हे वैयक्तिक मत आहे. पण 'अक्का'चं वेगळेपण फक्त तिच्या भव्य सेटमध्ये किंवा वेशभूषेमध्ये नाही, तर महिलांच्या सत्तेभोवती उभ्या केलेल्या या काल्पनिक जगात आणि त्यामध्ये दाखवलेल्या सत्तासंघर्षात आहे. एका वेगळ्याच प्रकारची समाजव्यवस्था आणि त्यामध्ये चालणारा गँगस्टर संघर्ष ही या सिरीजची जमेची बाजू आहे.
भव्य मांडणी, दमदार अभिनय; मात्र कथानकात गोंधळ
कथानकाची कल्पना खूपच भारी आहे. पण काही ठिकाणी गोष्ट भूतकाळात जाते आणि परत वर्तमानात येते. त्यामुळं प्रेक्षकांचा काही घटना समजून घेताना गोंधळ होतो. तर काही पात्रांची एकमेकांसोबतची नाती नेमकी काय आहेत, हे समजून घेतांना सुद्धा गोंधळ होतो.
काही प्रसंग अधिक स्पष्टपणे मांडता आले असते. सिरीजची भव्यता आणि विषय चांगला असला तरी कथानकाची मांडणी काही ठिकाणी विस्कळीत झालेली जाणवते. बाकी सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे. राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश या दोघींनी तर आपल्या अभिनयाची वेगळीच छाप या सिरीजमधून सोडली आहे.
तन्वी आझमी यांचं पात्रसुद्धा कहानीमध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. पाच एपिसोडमध्ये पहिला सीझन आलेल्या या सिरीजमध्ये काही ठिकाणी कहाणी विस्कळीत वाटत असली तरी तिचा विषय आणि मांडणी मात्र वेगळी आहे हे नक्की.

एकंदरीतच, या सिरीजच्या निमित्तानं बऱ्याच समीक्षणांमध्ये एक मुद्दा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे महिलांच्या हाती सत्ता असतानादेखील जातीय उतरंडीनुसार अन्याय आणि अत्याचार हे शोषित गटांवरती होतच राहतात. महिला सत्तेवर असल्या तरी त्या सत्तेचं नेतृत्व प्रस्थापित घराण्यातील आणि प्रस्थापित समाजघटकांमधील महिलांकडेच राहतं.
वर्षानुवर्षे तीच व्यवस्था पुढं चालत राहते. म्हणजेच पुरुषसत्ता जाऊन महिलांची सत्ता आली तरी सत्तेची मानसिकता बदलतं नसते, तर शोषणाची व्यवस्था कायम तशीच राहते. आणि वंचित आदिवासी घटकांवर शोषण हे होतच राहते. हाच या सिरीजमधला वैयक्तिकरित्या मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो.
कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे यांच्या अभिनयासाठी तर सिरीज बघितलीच पाहिजे पण महिलेच्या साम्राज्याभोवती काय-काय गोष्टी होऊ शकतात, कशा होऊ शकतात हे सगळं काल्पनिक कहाणीच्या आधारे समजून घ्यायचं असेल तर, नक्कीच ही सिरीज बघितली पाहिजे.
सिरीज - अक्का (Akka)
लेखक/दिग्दर्शक - धर्मराज शेट्टी
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
निर्मिती - YRF Entertainment
मुख्य कलाकार - कीर्ती सुरेश, राधिका आपटे, तन्वी आझमी, बी. जयश्री, निवेदिता भार्गव, महेश मांजरेकर, अंशुमान पुष्कर, विशाक नायर आणि मोनिका पनवार.

