Dailyhunt
Dalit History Month : 'परई' वादन, दलितांच्या परंपरेपासून प्रतिकारापर्यंतचा एक अनोखा प्रवास

Dalit History Month : 'परई' वादन, दलितांच्या परंपरेपासून प्रतिकारापर्यंतचा एक अनोखा प्रवास

संजना खंडारे

  • एकेकाळी अस्पृश्य मानलं गेलेलं आणि केवळ विशिष्ट दलित समुदायापुरतं मर्यादित ठेवलेलं परई हे वाद्य आज नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थाने पुन्हा समोर येतंय.
  • उपेक्षा, भेदभाव आणि अन्यायाचा दीर्घ इतिहास आपल्या ठेक्यात साठवून ठेवत परई आता नव्या पिढीसाठी अभिव्यक्ती, प्रतिकार आणि स्वाभिमानाचं प्रभावी माध्यम बनतंय.
  • 'दलित हिस्ट्री मंथ'च्या निमित्ताने याच परई वाद्याच्या इतिहासावर, नव्याने या परईला समोर आणणाऱ्या लोकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'बाईमाणूस'ने केलाय.

बामणा घरी लिहिणं, कुणब्या घरी दाणं आणि मांगा-महारा घरी गाणं… ही एक जुनी म्हण आहे. ही फक्त एक म्हण नाही तर हे एकेकाळचं वास्तव होतं. जातीनुसार वाटून दिलेली कामे होती. यामध्ये नेहमीच अस्पृश्य मानलं गेलं ते दलित समुदायाला. फक्त त्या समुदायाच्या लोकांनाच नाही तर त्यांची कला-संस्कृती-खानपान या सगळ्याच घटकांना इथल्या व्यवसथेने गावकुसाबाहेर ठेवलं होतं. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे दलितांची वाद्ये. अनेक वर्षे ही वाद्ये केवळ खालच्या समजल्या जाणाऱ्या लोकांपुरती मर्यादित ठेवली गेली. त्यांना सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळाली नाही, उलट त्यांना हीन लेखलं गेलं. अनेक चित्रपट, गाणी आणि मुख्य प्रवाहातील संगीतामध्ये या वाद्यांना स्थान दिलं गेलं नाही.

सबंध देशभरात दलित समुदायाशी जोडलेली अनेक पारंपरिक वाद्ये आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ढोलकी, हलगी, संबळ, डफ, घांगळी, ताशा अशा कितीतरी वाद्यांची नावं घेता येतील. ही वाद्ये केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसंगांमध्ये विशिष्ट भूमिका बजावत होती. पण, या वाद्यांना आणि ती वाजवणाऱ्या लोकांना पांढरपेशा समाजात मान-सन्मान काही मिळाला नाही.

अशा दलित वाद्यांपैकीच एक वाद्य म्हणजे परई… दक्षिण भारताच्या दलित समाजाचे एक पारंपारिक आणि लोकप्रिय वाद्य. या 'परई'ला घेऊन आता दक्षिण भारतात नव्याने इतिहास मांडला जातोय. जे परई वादन कायम दुलक्षित ठेवलं गेलं होतं ते आता मुख्य प्रवाहात आलं आहे.

परई वाद्य सामाजिक भेदभावाचं प्रतीक कसं बनलं?

परई हे दक्षिण भारतातील, विशेषतः तामिळनाडूमधील, अत्यंत प्राचीन तालवाद्य म्हणून ओळखलं जातं. परई या शब्दाचा अर्थच सांगणे किंवा जाहीर करणे असा होतो. ज्यातून या वाद्याची मूळ भूमिका स्पष्ट होते. गोलाकार लाकडी चौकटीवर चामडं ताणून तयार केलं जाणारं हे वाद्य काठ्यांच्या साहाय्याने वाजवलं जातं आणि त्याचा आवाज दूरवर पोहोचतो. या वाद्याचा उगम मानवाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत मागे जातो. जेव्हा माणूस शिकार करायचा तेव्हा परईचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, धोका कळवण्यासाठी किंवा महत्त्वाची माहिती देण्यासाठी केला जात असे.

परईचा उल्लेख संगम साहित्यात, विशेषतः थोकाप्पियम सारख्या ग्रंथांमध्ये आढळतो, तसेच सहाव्या शतकातील देवारम या भक्तिगीतांमध्येही मंदिरातील विधींमध्ये आणि शुभ प्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या वाद्य म्हणून तिचा उल्लेख आहे. इतिहासात परईचा वापर केवळ संगीतासाठी नव्हता, तर ते संवादाचं प्रभावी माध्यम होतं. राजाज्ञा जाहीर करणे, युद्धाच्या वेळी संदेश पोहोचवणे, तसेच गावातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देणे यासाठी तिचा उपयोग केला जात असे. विशेषतः मृत्यूची बातमी देणे आणि त्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी परई वाजवण्याची परंपरा होती.

परई वादक श्रीनिवास या संदर्भात सांगतात की,

"सुरुवातीला 'परई' हा शब्द सर्व तालवाद्यांसाठी वापरला जात असे. परई हे सर्व चामड्याच्या वाद्यांची जननी आहे, आणि ती राजदरबारात, विवाहसमारंभात तसेच इतर शुभ प्रसंगी वाजवली जात होती. मात्र, १४व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात या परंपरेला कलंक लागला आणि या वाद्याला अपमानास्पदपणे "थप्पू" असे नाव देण्यात आले, ज्याचा संबंध अशुभतेशी जोडला गेला. कालांतराने जातव्यवस्थेमुळे परईचा वापर विशिष्ट दलित समुदायांपुरता मर्यादित झाला आणि तिला अस्पृश्यता व अशुभतेशी जोडण्यात आलं. ''

एकेकाळी समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक असलेलं हे वाद्य हळूहळू सामाजिक भेदभावाचं प्रतीक बनलं. त्याच्या ठेक्यांमध्ये जातीय अन्यायाचं ओझं ऐकू येऊ लागलं, असं सांगून श्रीनिवास पुढे म्हणतात, "तबला आणि मृदंगसारख्या चामड्याच्या वाद्यांना जिथे मंच आणि प्रतिष्ठा मिळाली, तिथे परई मात्र दडपलेल्या समाजाचं वाद्य बनून राहिली. तरीही, परईची परंपरा पूर्णपणे लोप पावली नाही. ती आजही लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या संस्कृतीशी आणि त्यांच्या भावनांशी जोडलेली असून तिच्या ठेक्यात इतिहासाचा आवाज आणि एका समुदायाच्या आठवणी दडलेल्या आहे."

"परई माझ्यासाठी एक प्रतिकाराचं शस्त्र आहे"

आघाडीचे दिग्दर्शक पा.रंजिथ यांच्या 'निलम कल्चरल सेंटर' मध्ये परई कलाकार एम. थारागई सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे. तिच्याशी 'बाईमाणूस'ने संवाद साधल्यावर ती सांगते, "माझ्यासाठी परई हे केवळ एक वाद्य नाही, तर एक प्रकारचं शस्त्र आहे. मी गेल्या ७-८ वर्षांपासून परई वाजवतेय, आणि या प्रवासात मला जाणवलं की हे वाद्य माझ्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे. समाजाशी संवाद साधण्यासाठी, माझे विचार, भावना आणि अनुभव मांडण्यासाठी मी परईचा वापर करते. त्यामुळे परई माझ्यासाठी फक्त संगीत नाही, तर एक आवाज आहे जो मला बोलायला शिकवतो."

थारागई पुढे म्हणते, "परई मला स्वातंत्र्याची जाणीव करून देते. ती एका मोठ्या सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये लोकांच्या भावना, त्यांचा इतिहास आणि त्यांची वेदना साठलेली आहे. परईचा ठेका असा आहे की तो लोकांना आपोआप जोडतो. त्या ठेक्यात एक ऊर्जा आहे, एक वेदना आहे आणि त्याचवेळी एक आनंदही आहे, जो शब्दांत व्यक्त करता येत नाही.

 एम. थारागई

राजकीय स्तरावर पाहिलं, तर परईला अजूनही पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. अनेकदा तिला 'दडपलेलं' किंवा 'अस्पृश्य' वाद्य म्हणून पाहिलं जातं. पण माझ्यासाठी परई ही प्रतिकाराची भाषा आहे. सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नसतात. त्यासाठी सांस्कृतिक माध्यमांची गरज असते. परई त्या अर्थाने एक प्रभावी साधन आहे, ज्याच्या माध्यमातून आपण समाजाशी थेट संवाद साधू शकतो. आज परई दलित समाजासाठी एक सशक्तीकरणाचं माध्यम बनत आहे. ती लोकांना एकत्र आणते, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची ताकद देते. माझ्यासाठी परई म्हणजे मुक्ती. एक असं वाद्य, जे केवळ आवाज निर्माण करत नाही, तर लोकांच्या आयुष्याला, त्यांच्या ओळखीला आणि त्यांच्या संघर्षाला आवाज देतं." असे थारागई सांगते.

अस्पृश्य' ठरवलेल्या वाद्यापासून दलित ओळखीच्या आवाजापर्यंत...

जातव्यवस्थेच्या रचनेत काम आणि ओळख यांचा घट्ट संबंध होता आणि याच चौकटीत परईचं स्थान हळूहळू बदलत गेलं. पूर्वी संवादाचं प्रभावी माध्यम असलेलं हे वाद्य विशिष्ट दलित समुदायांपुरतं मर्यादित करण्यात आलं. मृत्यूची बातमी देणं, अंत्यसंस्कारात वाजवणं किंवा गावातील कमी दर्जाची मानली जाणारी कामं या समुदायांवर लादली गेली. त्यासोबतच परईलाही अशुभ आणि अस्पृश्य अशी ओळख दिली गेली. त्यामुळे परई वाजवणं हे केवळ एक काम न राहता सामाजिक दर्जाशी जोडलेलं ठरलं जे वाजवत होते, त्यांनाही तितक्याच उपेक्षेचा सामना करावा लागला.

काळाच्या ओघात, हा भेदभाव केवळ सामाजिक नव्हता, तर सांस्कृतिक पातळीवरही घट्ट बसला. हळूहळू, परईचा आवाज हा केवळ एक वाद्याचा ठेका न राहता दलित समुदायाच्या आयुष्याशी, त्यांच्या वेदनांशी आणि त्यांच्या दैनंदिन वास्तवाशी जोडला गेला. हा आवाज त्यांच्या अस्तित्वाचा भाग बनला. जिथे परंपरा, भेदभाव आणि ओळख या सगळ्यांचा संगम दिसतो. यामुळेच, कालांतराने परई ही केवळ एक सांस्कृतिक गोष्ट न राहता दलित ओळखीचं एक ठळक प्रतीक बनली… एक असा आवाज, जो केवळ ऐकू येत नाही, तर इतिहास, अन्याय आणि अस्तित्वाची कहाणी सांगतो.

अदावी आर्ट्स कलेक्टिव्ह : परईला नव्या अर्थाने जिवंत करणारा प्रवास

बेंगळुरूमध्ये कार्यरत अदावी आर्ट्स कलेक्टिव्ह हा समूह परई या पारंपरिक वाद्याला नव्या दृष्टीने लोकांसमोर आणण्याचं महत्त्वाचं काम करतोय. अदावी आर्ट्सचे संस्थापक के. नरेन यांच्याशी 'बाईमाणूस'ने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितलं, "पूर्वी परई फक्त रस्त्यावर वाजवलं जाणारं लोककला वाद्य मानलं जात असे आणि त्याची ओळख समाजात खूपच मर्यादित होती. मी स्वतः सुरुवातीला एकट्याने शहरात प्रवास करत, लोकांना भेटत गेलो आणि परई वाजवत, लोकांना पटवलं की परई इतर कोणत्याही कलाप्रकाराप्रमाणेच एक समृद्ध कला आहे.

पूर्वी महिलांसाठी घराबाहेर पडणं कठीण होतं आणि रस्त्यावर किंवा स्टेजवर परई वाजवणं समाजासाठी कलंक मानला जात होता. मात्र आज अदावी आर्ट्स आणि अनेकजण कार्यशाळा आणि सामूहिक सादरीकरणांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देत आहे. आम्ही यामध्ये एलजीबीटीक्यू समुदायातील कलाकारांना देखील परईचे प्रशिक्षण दिलं. ज्यामुळे परई समावेशी, विविधतेचं प्रतीक आणि सामाजिक बदलाचं साधन बनलीये."

नरेन सांगतात की, परईचा वापर फक्त सांस्कृतिक किंवा विधींसाठी नव्हता, तर त्यामागे एक मानवी आणि व्यवहारिक कारणही होतं. "पूर्वी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं मानलं जायचं, तेव्हा परई वाजवली जात असे. त्या जोरदार ठेक्यांमुळे जर तो माणूस हलला, उठला, किंवा काही प्रतिसाद दिला. तर तो जिवंत असल्याचं समजायचं. आणि जर कोणतीच प्रतिक्रिया आली नाही, तरच त्याला मृत मानलं जायचं. त्यामुळे परई ही फक्त शोकप्रसंगी वाजवली जाणारी गोष्ट नव्हती, तर ती जणू जीवन आणि मृत्यू यामधली एक खात्री करण्याची पद्धत होती."

ते पुढे म्हणतात, "पूर्वी परईच्या ठेक्यावरून माणूस जिवंत आहे की नाही हे पाहिलं जायचं. पण आजच्या संदर्भात बघितलं, तर जो माणूस या ठेक्यावर ताल धरत नाही, अन्यायाविरोधात आवाज उठवत नाही, आंदोलनात सहभागी होत नाही. तोही एका अर्थाने जिवंत असूनही 'मृत'च आहे."

के. नरेन सांगतात की, "आम्ही परईमध्ये हिप-हॉप, रॅप यांसारख्या आधुनिक अभिव्यक्तींचा आणि पारंपरिक गायनाचा समावेश करून परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसाठी परई ही केवळ एक पारंपरिक वाद्य न राहता, सांस्कृतिक शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम बनली आहे."

सिनेमातील परई: पडद्यावर घुमणारा प्रतिकाराचा आवाज

दक्षिण भारतीय सिनेमात विशेषतः पा. रंजिथ यांच्या 'काला' आणि 'कबाली' या चित्रपटांमध्ये परईचा ठेका दलित ओळख, एकजूट आणि आत्मसन्मान दाखवण्यासाठी वापरलाय. काला या चित्रपटामध्ये झोपडपट्टीतील लोकांची जमीन आणि अस्तित्व वाचवण्यासाठीची लढाई दाखवताना, परईचा ठेका हा केवळ ध्वनी नसून एकजुटीचा आणि प्रतिकाराचा आवाज बनतो. या चित्रपटांमध्ये संगीतकार संतोष नारायणन यांनी परईसारख्या लोकवाद्यांचा वापर करून असं संगीत तयार केलं जे दडपलेल्या समाजाच्या भावना थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. पा. रंजिथ यांनी अनेक मुलाखतींमध्ये नमूद केलंय की, "त्यांच्या सिनेमात कला, संगीत आणि लोकपरंपरा या फक्त मनोरंजनासाठी नसून, त्या समाजातील दडपलेल्या लोकांची कथा आणि वास्तव सांगण्यासाठी वापरल्या जातात."

दिग्दर्शक मारी सेल्वराज यांच्या 'पेरियरम पेरुमल' आणि 'कर्णन' या चित्रपटांमध्ये परईचा वापर अधिक तीव्र आणि भावनिक पातळीवर दिसतो. कर्णनमध्ये परई हा बंडाचा, वेदनेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आवाज बनतो. चित्रपटात अनेक ठिकाणी परईचा आवाज फक्त पार्श्वसंगीत राहत नाही, तर तो पात्रांच्या आतल्या रागाचा, वेदनेचा आणि उभं राहण्याच्या जिद्दीचा आवाज बनतो.

मराठी सिनेमात नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटांमध्ये परई थेट वापरलेली नाही. मात्र, हलगीचा प्रभावी वापर दिसतो. या वाद्यांमधून ग्रामीण वास्तव, जातव्यवस्था आणि सामाजिक स्तर यांचं चित्रण केलं जातं. नागराज मंजुळे यांनी देखील अनेकदा बोलतांना सांगितलं आहे की, त्यांच्यासाठी सिनेमा हा समाजातील सत्यता मांडण्याचं माध्यम आहे. जिथे संगीतही पात्रांच्या भावना आणि सामाजिक वास्तव व्यक्त करतात.

या तिन्ही दिग्दर्शकांच्या सिनेमात एक गोष्ट सारखी दिसते. हलगी ते परईसारख्या वाद्यांना फक्त सांस्कृतिक गोष्ट म्हणून ते दाखवत नाहीत, तर त्यातून एक प्रकारची राजकीय भाषा तयार करतात. ही भाषा तथाकथित वरच्या जातीतील लोकांना प्रश्न विचारते आणि जे लोक कायम बाजूला ठेवले गेले त्यांच्या आयुष्याला एक नवीन व्यासपीठ बनवून देते. म्हणूनच सिनेमा इथे फक्त गोष्ट सांगण्यापुरता राहत नाही, तर तो समाजात बदल घडवणारा माध्यम बनतो. परईचा प्रत्येक ठेका मग फक्त आवाज राहत नाही, तो बनतो प्रतिकाराचा, स्वतःच्या ओळखीचा आणि नव्याने उभं राहण्याचा.

हलगी ते परई: विद्रोह आणि सांस्कृतिक राजकारण

मुंबईतील टाटा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स मध्ये मीडिया अँड कल्चर स्टडीज मध्ये उच्च शिक्षण घेणारा आणि तमिळ सिनेमावर रिसर्च करणारा अशोक बनकर म्हणतो, "महाराष्ट्रात हलगी हे एक जातिव्यवस्थेने आपल्यावर लादलेलं वाद्य होतं, परंतु नंतर ते विद्रोहाचं प्रतीक बनलं. वामनदादा कर्डकांचे गाणं डफ आणि हलगीवर वाजवले गेले. त्याचप्रमाणे, परई हे पारंपारिक तामिळ वाद्य असून मृत्यूच्या कार्यक्रमांमध्ये वापरला जात असे, परंतु नंतर तो प्रतिकार आणि सांस्कृतिक जागरूकतेचे माध्यम बनलं."

तो पुढे म्हणतो, "पा.रंजित, मारी सेल्वाराज, नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांनी या वाद्यांचा अर्थ जगासमोर आणला. परईने एक अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र प्रस्थापित केलं आहे. ज्यामध्ये लय, ऊर्जा, नृत्य आणि पारंपारिक गाणी यांचा संगम आहे. परई आणि हलगीने वंचित आणि शोषित समुदायांचे वाद्य म्हणून स्थान मिळवले असून, मुख्य प्रवाहात आता त्यांना मान्यता मिळू लागलीये. या वाद्यांमुळे विद्रोहाची भाषा, बहुजनांचा सूर, आणि पारंपारिक वाद्य पुढील पिढीकडे पोहचतायेत. नागराज मंजुळे आणि पा. रंजिथचे चित्रपट, या वाद्यांना एक हक्काचे घर देत आहेत आणि कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करतायेत. अशा प्रकारे परई आणि हलगी ही फक्त संगीत वाद्य नसून, सांस्कृतिक प्रतिकार, सामाजिक जागरूकता आणि पारंपारिक कला टिकवण्याचं माध्यम ठरतायेत. "

चेन्नईमधील लेखक आणि सिलंबम आर्टिस्ट ए.आर. निकेश 'बाईमाणूस'शी बोलतांना सांगतो, "२०२० मध्ये सिडनीमधील Black Lives Matter प्रोटेस्टमध्ये एका मुलीने परई वाजवली, ज्या माध्यमातून ती ऊर्जा आणि प्रोत्साहन निर्माण करत होती. तिच्यासाठी परई हे फक्त एक वाद्य नव्हतं, तर आंदोलनात ऊर्जा निर्माण करण्याचं आणि लोकांना एकत्र आणण्याचं माध्यम होतं. परईचा जोरदार ठेका हा आंदोलनातील लोकांना एकत्रित लय देत होता. त्यांच्या भावनांना आवाज देत होता आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद देत होता. अशा आंदोलनांमध्ये परईचा वापर करण्यामागचं कारण म्हणजे तिचा इतिहासच प्रतिकाराशी जोडलेला आहे. जसं भारतात ती सामाजिक अन्यायाविरोधात वापरली जाते, तसंच त्या मुलीनेही परईच्या माध्यमातून वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परईचा आवाज हा फक्त संगीत राहात नाही, तर तो जगभरातील अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या लोकांचा एक सामूहिक आवाज बनतो."

आज परईचा ठेका फक्त ताल नाही, तो इतिहासाची साक्ष देतो. तो त्या हातांचा आवाज आहे, ज्यांना कधी वाजवण्यापुरतंच मर्यादित ठेवलं गेलं होतं, पण बोलण्याचा अधिकार नाकारला गेला होता. हा ठेका त्या पिढ्यांचा आहे, ज्यांनी अपमान, उपेक्षा आणि अन्याय सहन करतही परंपरा जिवंत ठेवली आणि आज तोच ठेका नव्या पिढीच्या हातात येऊन बदलाचा, स्वाभिमानाचा आणि समानतेचा घोष करतोय. परई आता केवळ एक वाद्य राहिलेली नाही. ती एक जिवंत आठवण आहे, एक जखम आहे, आणि त्याच वेळी एक उपचारही आहे. जेव्हा परई वाजते, तेव्हा फक्त आवाज घुमत नाही. तर एक समाज स्वतःला पुन्हा ओळखतो, आपला इतिहास पुन्हा लिहितो, आणि जगाला सांगतो, "आम्ही इथे आहोत… आणि आता आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus