शेखर पाटील
- सध्या एआय द्वारे तयार करण्यात आलेल्या कंटेंटमुळे खऱ्या-खोट्यातील सीमारेषा जवळपास पुसली गेली असून यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
- या पार्श्वभूमीवर, गुगलच्या काल रात्री पार पडलेल्या आय/ओ २०२६ या वार्षीक परिषदेत सिंथआयडी या प्रणालीचा विस्तार करण्यात आल्याची घोषणा अतिशय लक्षणीय अशीच मागली जात आहे.
- यामुळे आगामी काळात डीपफेक या प्रकारातील प्रतिमा, व्हिडीओ, ऑडिओ आणि शब्दांवर ठसठशीत पध्दतीत एआय द्वारा निर्मित असा अदृश्य शिक्का मारला जाणार आहे.
आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या अशा एका वळणावर उभे आहोत जिथे डोळ्यांनी पाहिलेले अन् कानांनी ऐकलेले खरे असेलच असे कुणीही म्हणू शकत नाही. जनरेटिव्ह एआय इतके सक्षम झाले आहे की, ते केवळ वास्तववादी प्रतिमाच नव्हे, तर मानवी भावभावनांनी युक्त व्हिडिओ आणि आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे ऑडिओ सहज तयार करू शकते. यामुळेच डिजिटल कंटेंटच्या विश्वासार्हतेमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, त्याचा परिणाम राजकीय निवडणूक प्रक्रियेपासून ते वैयक्तिक सायबर सुरक्षेपर्यंत सर्वच क्षेत्रांत जाणवत आहे.
या प्रकारच्या डीपफेक कंटेंटमुळे अनेकदा दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होत असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूलाच घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुगलने विकसित केलेली 'SynthID' ही प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरते. याचा मूळ उद्देश एआय-जनरेटेड कंटेंटला एक अदृश्य पण कायमस्वरूपी डिजिटल ओळख प्रदान करून पारदर्शकता निर्माण करणे हा आहे.
डीपफेकला लगाम घालण्यासाठीची 'SynthID' ही प्रणाली नेमकी काय आहे?
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या 'आय/ओ २०२६' या वार्षिक परिषदेत सिंथआयडीबाबत घोषणा करतांना एआयच्या बनावटगिरीचे एक समर्पक उदाहरण दिले. त्यांनी पडद्यावर एक फोटो दाखवला, ज्यात ते स्वतः, टेस्लाचे एलन मस्क, एनव्हीडीयाचे जेन्सन हुआंग आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन एका पार्किंग लॉटमध्ये बसून मॅकडोनाल्ड्सचे हॅम्बर्गर खाताना दिसत होते. खरं तर हा अस्तित्वात नसणारा पण अगदी खराखुरा वाटणारा फोटो होता. सर्वसामान्य युजर्सला अशा 'अति-वास्तववादी' बनावट प्रतिमा ओळखणे आता अशक्यप्राय होत चालले आहे. बहुतांश एआय-जनीत कंटेंटवर कोपऱ्यावर वॉटरमार्क असला तरी तो इमेज, ऑडिओ वा व्हिडीओ एडिटरच्या मदतीने सहजपणे काढला जातो. याच समस्येवर उत्तर म्हणून गुगलने 'सिंथआयडी' हे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले असून याचा आता जवळपास दोन वर्षांनी विस्तार केला आहे.

गुगलची उपकंपनी असणाऱ्या डीपमाईंडने सिंथआयडी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे केवळ एक वॉटरमार्क नसून, ती माहिती सुरक्षा क्षेत्रातील एक प्रगत प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान एआय-व्युत्पन्न सामग्रीमध्ये असे 'वॉटरमार्क' जोडते जे मानवी डोळ्यांना किंवा कानांना पूर्णपणे अदृश्य असले तरी, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अचूकपणे ओळखता येतात. याच्या अंतर्गत प्रतिमांचा विचार केला असता, चित्रांच्या मूळ पिक्सेल रचनेत असे सूक्ष्म बदल केले जातात, ज्यामुळे चित्राच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, मात्र त्याचा 'डिजिटल सिग्नेचर' कायम राहतो.
ध्वनीमध्ये आवाजाच्या 'वेव्हफॉर्म' मध्ये हे वॉटरमार्क गुंफले जातात. यामुळे संबंधीत ऑडिओ क्लीप ही कृत्रीम बुध्दीमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. तर, व्हिडिओच्या प्रत्येक फ्रेममध्ये हे अदृश्य क्रिप्टोग्राफिक मार्कर्स जोडले जातात, ज्यामुळे व्हिडिओचा उगम पडताळणे सोपे होते. हे सिग्नल मानवी डोळ्यांना किंवा कानांना जाणवत नाहीत, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते अत्यंत सुदृढ आहेत. पारंपारिक मेटाडेटा हा सहजपणे काढून टाकता येतो, मात्र 'सिंथआयडी' हे इमेज क्रॉपिंग, कॉम्प्रेशन किंवा रोटेशन यांसारख्या बदलांनंतरही टिकून राहते.
सिंथआयडी' म्हणजे 'डिजीटल डीएनए'
अगदी समर्पक शब्दात सांगावयाचे तर 'सिंथआयडी' म्हणजे 'डिजीटल डीएनए' होय. जसा सजीवांचा डीएनए त्यांच्या प्रत्येक पेशीत असतो आणि तो बदलता येत नाही, तसेच 'सिंथआयडी' हा सामग्रीच्या 'आंतरिक ओळखीचा' भाग बनतो. पारंपारिक वॉटरमार्क हे बाह्य लेबल्स असतात जे सहज पुसले जाऊ शकतात, परंतु SynthID डोळ्यांनी दिसत नसून फाईलच्या संरचनेतच गुंफलेले असते. म्हणजेच कितीही प्रयत्न करून ते पुसता येत नसल्याचा गुगलचा दावा आहे.
वास्तविक पाहता सिंथआयडी ही प्रणाली गुगलने कधीपासूनच उपलब्ध केली असली तरी याल सर्व युजर्सपर्यंत सादर केले नव्हते. आयओ परिषदेत या प्रणालीला व्यापक प्रमाणात लागू करण्यात येत असल्याची घोषणा झाली. यात प्रामुख्याने गुगलने हे तंत्रज्ञान थेट युजर्सच्या हातामध्ये दिले आहे. गुगल सर्चमधील लेन्स, सर्कल-टू-सर्च आणि एआय मोड द्वारे कोणताही युजर कोणताही ध्वनी, प्रतिमा वा व्हिडीओ एआयने बनवले आहे का?" असे विचारून पडताळणी करू शकतात. येत्या काही आठवड्यांत हे तंत्रज्ञान 'क्रोम' ब्राउझरमध्ये जेमिनीच्या माध्यमातून समाविष्ट केले जाईल, ज्यामुळे वेबवरील सामग्रीची पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. अर्थात, यातून फॅक्ट चेकींग ही अजून परिपूर्ण होणार आहे.
C2PA : डिजिटल फाईलच्या 'पुराव्यांची साखळी'
दरम्यान, डिजिटल विश्वात केवळ एका तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे असते. म्हणूनच गुगलने C2PA (Coalition for Content Provenance and Authenticity) या जागतिक मानकाचा स्वीकार केला आहे. हे मेटाडेटा आधारित 'क्रिप्टोग्राफिक मार्कर्स' वापरून फाईलच्या निर्मितीचा इतिहास सांगते. हे एक जागतिक मानक असून ते डिजिटल फाईलच्या 'पुराव्यांची साखळी' तयार करते. यामध्ये फाईल कधी तयार झाली, कोणत्या उपकरणाने काढली आणि त्यात नंतर कोणते बदल केले गेले, याची संपूर्ण नोंद असते.
याचे एक सोपे उदाहरण सांगतो. समजा, मी माझ्या कॅमेऱ्यातून जळगावच्या एका चौकाचा फोटो काढला आणि यात एआयच्या मदतीने बदल करून ते सोशल मीडियावर अपलोड केले. तर सी२पीए प्रणालीच्या मदतीने कोणत्या कंपनीच्या मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढण्यात आला ? आणि यात नंतर कोणते आणि कसे-कसे बदल करण्यात आले? याची संपूर्ण माहिती मिळू शकते. परिणामी मी अपलोड केलेली प्रतिमा, व्हिडीओ अथवा ऑडिओ हा एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

C2PA हे एखाद्या फाईलचा जन्मदाखला अर्थात 'बर्थ सर्टफिकेट' सारखे आहे; यातून अचूक माहिती मिळत असली तरी फाईलपासून विलग किंवा नष्ट होऊ शकतो. याउलट, सिंथआयडी हे त्या फाईलच्या डीएनए सारखे असून जे फाईलचाच एक भाग बनून राहून सहजासहजी मिटवता येत नाही. म्हणजेच-सिंथआयडी आणि सी२पीए या दोन्ही प्रणाली एकमेकांना पूरक असून त्यांच्या मदतीने गुगलने एआय जनीत कंटेंट शोधून काढणे अगदी सहजसुलभ केले आहे. ही प्रणाली केवळ गुगलच्या मॉडेल्सचेच नव्हे, तर इतर लोकप्रिय एआय मॉडेल्सद्वारे तयार केलेली सामग्री देखील शोधू शकते.
आता तर ओपनएआय, एनव्हिडीया आणि इलेव्हन लॅब्ज सारख्या दिग्गज कंपन्यांनी सिंथआयडीचा अंगीकार केल्यामुळे याला अजून व्यापकता प्राप्त झाली आहे. तर गुगलच्याच क्रोम आणि जेमीनीसारख्या प्रॉडक्टमध्ये याचा समावेश करण्यात आल्याने ही प्रणाली जगभरातील अब्जावधी युजर्सला उपलब्ध होणार आहे. सिंथआयडी आणि सी२पीए या प्रणालींच्या मदतीने एआय द्वारे तयार करण्यात आलेल्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनीफिती सहज ओळखता येणार असून यात लवकरच शब्दांचाही समावेश करण्यात येणार आहे. यातून पुर्णपणे डीपफेकची ओळख करता येणार नसले तरी गुगलने या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याची बाब लक्षणीय अशीच होय.

