Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हवामान बदलाची सर्वात मोठी किंमत कोण मोजतंय? उत्तर आहे... शेतकरी महिला!

हवामान बदलाची सर्वात मोठी किंमत कोण मोजतंय? उत्तर आहे... शेतकरी महिला!

अप्सरा आगा

  • कधी पावसाची प्रतारणा, कधी उन्हाच्या झळा, तर कधी वाढत चाललेलं कर्ज... हवामान बदलाचा फटका शेतीला बसतो, पण त्याची सर्वात मोठी किंमत शेतकरी महिलांना मोजावी लागते.
  • शेतात दिवसभर राबणं, जनावरांची काळजी घेणं, पाण्यासाठी वणवण करणं आणि घराचा गाडा ओढणं या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांचं आरोग्य, उत्पन्न आणि मानसिक स्थैर्य धोक्यात आलं आहे.
  • धाराशिवमधील महिलांचे अनुभव, तज्ज्ञांची निरीक्षणं आणि विविध अहवालांचा आधार घेत, हवामान बदलाच्या या अदृश्य पण गंभीर संकटाचा वेध घेणारा प्रोजेक्ट धरित्रीचा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट.

कडक उन्हात डोळ्यांदेखत वाळणारं पीक, दारात चाऱ्याविना हंबरणारी जनावरं नि डोक्यावर दिवसेंदिवस वाढणारं कर्जाचं ओझं... निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आज ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी महिला बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. पावसाचा कसलाही नेम राहिलेला नाही. आजही उर्वरित महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस नाही. जूनचा महिना तर सगळीकडे कोरडाच गेला. अशा भयंकर वातावरणातही संसाराचा गाडा हाकताना शेतकरी महिला उष्माघात, थकवा, आजारपण आणि आर्थिक संकटाच्या विळख्यात होरपळून निघाल्यात. याचं वास्तव मांडणारा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

भारतीय शेतीचा खरा कणा असलेल्या कष्टकरी महिलांवर आज हवामान बदल आणि वाढत्या उष्णतेचे सर्वात मोठे संकट कोसळले आहे. अनियमित पाऊस, कडक ऊन आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पन्न घटत आहे, तर दुसरीकडे शेती, घर आणि जनावरांची दुहेरी जबाबदारी सांभाळताना महिला उष्माघात, थकवा आणि मानसिक ताणाला बळी पडत आहेत. निसर्गाच्या या लहरीपणाची आणि आर्थिक घसरणीची सर्वात मोठी किंमत आज शेतात राबणाऱ्या याच शेतकरी महिलांना मोजावी लागत आहे.

शेतकरी म्हटलं की आजही आपल्या डोळ्यांसमोर पुरुषाचा चेहरा उभा राहतो, पण वास्तव हे आहे की भारतातील जवळपास ८० टक्के ग्रामीण महिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडलेल्या आहेत. आज जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा सर्वाधिक आणि थेट फटका याच कष्टकरी शेतकरी महिलांना बसत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे केवळ पिकांचेच नुकसान होत नाही, तर शेतात राबणाऱ्या महिलांच्या आरोग्याची, त्यांच्या कष्टाची आणि घरच्या अर्थकारणाचीही अक्षरशः होरपळ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत कमी प्रमाणात पाऊस पडला. काही ठिकाणी शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या, तर काही ठिकाणी अजूनही पेरण्या बाकी आहेत. ज्या भागात पाऊस झाला, तिथेही तो वेळेवर झाला नाही. त्यानंतर अचानक वाढलेले तापमान, दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंडी अशी बदलेली वातावरणाची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नवीन संकट घेऊन आली आहे. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम शेतकरी महिलांवर होत आहे, कारण शेतीसोबत घर, जनावरं आणि कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर असते.

जागतिक तापमानवाढ म्हणजे पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत जाणे. माणसाच्या विविध कामांमुळे, जसे की कारखान्यांचा धूर, वाहनांमधून होणारे प्रदूषण, जंगलतोड आणि इंधनांचा अतिवापर यामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते. हे वायू पृथ्वीभोवती उष्णतेचे आवरण तयार करतात. त्यामुळे पृथ्वीची उष्णता बाहेर जाऊ शकत नाही आणि वर्षानुवर्षे तापमान वाढत जाते. या प्रक्रियेलाच 'जागतिक तापमानवाढ' असे म्हणतात. याचे परिणाम म्हणून कडक उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पूर अशा समस्या निर्माण होतात. मात्र, आता हा प्रश्न फक्त पर्यावरणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शेती, ग्रामीण समाजजीवन आणि शेतकरी कुटुंबांच्या जगण्यावरही त्याचा थेट परिणाम होत आहे.

शेती व्यवस्थेत महिलांचे योगदान महत्त्वाचे

भारतीय शेती व्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, रोपलावणी, खुरपणी, निंदणी, कापणी, मळणी, बियाण्यांची निवड यांसह पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि इतर शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भारतातील लाखो महिला शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये काम करतात आणि कुटुंबाची देखभाल करत ग्रामीण शेतीची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, प्रत्यक्षात शेतीची जवळपास सर्व कामे करूनही शेतकरी म्हटल्यानंतर शेतकरी महिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत नाही. ग्रामीण भागात अनेक महिलांच्या नावावर जमीन नसते. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे तसेच पुरुषप्रधान मानसिकतेमुळे त्यांना शेतकरी म्हणून गावगाड्यात मान्यता मिळत नाही. समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी मजुरी आणि शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा कमी सहभाग ही आव्हाने आजही ग्रामीण भागात शेतकरी महिलांसाठी कायम आहेत.

हवामानाच्या अस्मानी संकटासोबतच आज शेतीसमोर जमिनीच्या तुकडीकरणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. पिढ्यानपिढ्या जमिनीची विभागणी होत गेल्यामुळे शेतजमिनींचे लहान-लहान तुकडे झाले आहेत. लहान शेतांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान किंवा 'मॉडेल शेती' राबवणे कठीण जाते. यामुळे शेतमालाच्या एकूण उत्पादनात मोठी घसरण झाली आहे आणि शेतीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. या उत्पादनातील घसरणीचा थेट फटका घरच्या बजेटला बसतो आणि त्याची अखेरची झळ घरातल्या स्त्रीलाच सोसावी लागते.

'महिला गट शेती'

या पार्श्वभूमीवर 'महिला गट शेती' ही संकल्पना एक चांगला पर्याय म्हणून समोर येते. एकत्र येऊन शेती केल्यास बियाणे, खते आणि यंत्रसामग्रीचा खर्च कमी होऊ शकतो. मात्र, महिला गट शेतीची अंमलबजावणी करताना जमिनीच्या मालकीचा अभाव, सुरुवातीच्या भांडवलाची टंचाई आणि कौटुंबिक व सामाजिक पाठिंब्याची उणीव यांसारख्या मोठ्या मर्यादा समोर येतात. महिलांच्या नावावर जमीन नसल्याने गट शेतीसाठी बँकांकडून कर्ज किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात प्रशासकीय अडचणी येतात, तसेच गट सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा खेळता पैसाही त्यांच्याकडे उपलब्ध नसतो.

शेतीतील उत्पादनापासून ते शेतमाल विकण्यापर्यंतच्या प्रवासात महिलांना अत्यंत दुय्यम स्थान दिले जाते. आजची शेतमाल विक्री व्यवस्था पूर्णपणे पुरुषांच्या हातात केंद्रित असल्याने महिलांचा मुख्य सहभाग शेतातील काबाडकष्टांपुरता मर्यादित ठेवला जातो. बाजार समित्या, व्यापारी, दलाल यांच्याशी व्यवहार करणे किंवा शेतमालाचा भाव ठरवणे या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे बाजारात काय भाव चालला आहे, कोणत्या मालाला मागणी आहे किंवा ग्रेडिंग आणि पॅकिंग कसे करावे, याचे थेट ज्ञान महिलांपर्यंत पोहोचतच नाही आणि त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला त्यांना मिळत नाही.

जोडव्यवसायांचा विस्तार करण्यात मर्यादा

शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा शेतमाल प्रक्रिया उद्योग यांसारखे जोडव्यवसाय महिला सुरुवातीला उत्साहाने सुरू करतात, परंतु इथेही विक्रीची व्यवस्था, वाहतुकीची साधने आणि मालाचे मार्केटिंग करण्याची जबाबदारी पुरुषांवरच अवलंबून राहावी लागते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण आणि आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव यामुळे अशा जोडव्यवसायांचा विस्तार करण्यात महिलांना मोठ्या मर्यादा येतात.

हवामान बदल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारी गोष्ट असली, तरी ग्रामीण भागातील शेतकरी महिलांपर्यंत या बदलांची शास्त्रीय माहिती किंवा 'हवामान साक्षरता' पोहोचलेली नाही. पाऊस का लांबतोय, कडक ऊन का पडतंय, किंवा या बदलत्या वातावरणात कोणते नवीन वाण वापरावे, याचे अज्ञान महिलांमध्ये दिसून येते. जुन्याच पारंपरिक पद्धतीने शेती करत राहिल्यामुळे पिकांचे वारंवार नुकसान होते.

महिलांमधील वाढता कर्जबाजारीपणा

पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि कौटुंबिक गरजा, आजारपण किंवा मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी महिलांना अखेर कर्जाचा आधार घ्यावा लागतो. आज ग्रामीण भागात स्वयंसहाय्यता गट आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सहज उपलब्ध होणारे कर्ज अनेकदा पिकांच्या संरक्षणाऐवजी किंवा उत्पादक कामांऐवजी घरखर्च, आजारपण किंवा जुने कर्ज भागवण्यासाठी वापरले जाते. आर्थिक साक्षरतेचा अभाव आणि या कंपन्यांचे अवाजवी व्याजदर यांमुळे महिला चक्रवाढ व्याजाच्या आणि कर्जबाजारीपणाच्या भयंकर विळख्यात अडकत चालल्या आहेत. शेतीतून उत्पन्न नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दुहेरी संकटामुळे महिलांमधील मानसिक ताण आणि नैराश्य चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

पिण्याच्या पाण्याच्या अन् चाऱ्याच्या भटकंतीचा मुद्दा

वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका नि तलावांतील पाण्याचे स्रोत वेगाने आटत असल्याने शिवारात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी महिलांना बसत असून, कुटुंबाच्या पिण्याच्या पाण्यासाठी नि जनावरांच्या चाऱ्यासाठी त्यांना उन्हात दररोज २ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. या पाण्यासाठी लागणाऱ्या अधिक वेळामुळे महिलांची शेतातील कामाची वेळ पूर्णपणे बिघडत आहे. दिवसभरात विश्रांतीसाठी वेळच मिळत नसल्याने महिलांमध्ये मानसिक तणावासोबतच मान, पाठीचे आजार आणि तीव्र अशक्तपणा यांसारखे शारीरिक विकार चिंताजनक रीतीने वाढले आहेत.

जागतिक अहवाल अन् वास्तव

जगभरातील शेती, आरोग्य, कामगार आणि हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांच्या अहवालांनुसार, वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त फटका शेतात काम करणाऱ्या महिलांना बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, शरीरातील पाण्याची कमतरता, रक्तदाबातील चढ-उतार, स्नायूंचा थकवा आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी, सावली आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने हा धोका आणखी वाढतो.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, वाढत्या उष्णतेमुळे शेतीतील कष्ट करण्याची क्षमता कमी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ महिलांना पूर्वीपेक्षा अधिक वेळ शेतात काम करावे लागते, मात्र उत्पन्नात त्यानुसार वाढ होत नाही. उलट पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि आर्थिक अस्थिरता यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढतो. अनेक कुटुंबांमध्ये पुरुष रोजगारासाठी शहरात गेल्यानंतर शेती आणि घराची दुहेरी जबाबदारी महिलांवरच येते. गर्भवती शेतकरी महिलांसाठीही वाढते तापमान धोकादायक ठरते, कारण उष्णतेमुळे अकाली प्रसूती, कमी वजनाच्या बाळांचा जन्म आणि गर्भाच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

'राष्ट्रीय नमुना पाहणी संघटने'च्या अहवालानुसार, भारतातील ७३.२ टक्के ग्रामीण महिला शेतीकामात राबतात, परंतु दुर्दैवाने केवळ १२.८ टक्के महिलांच्या नावावर जमिनीची मालकी आहे. त्यामुळे अहोरात्र कष्ट करूनही त्या 'अदृश्य शेतकरी'च राहतात. पुरुष शेतात ८ ते १० तास काम करतात, तर महिला शेतातील काम, घरकाम आणि जनावरांचा सांभाळ असे मिळून दिवसाला १४ ते १६ तास काबाडकष्ट करतात. वाढत्या उष्णतेमुळे या कष्टाची तीव्रता दुप्पट झाली आहे. हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय समितीच्या अहवालानुसार, वाढत्या उन्हाचा आणि पाण्याचा तुटवड्याचा सर्वात मोठा सामाजिक-आर्थिक फटका भारतातील याच कष्टकरी महिलांना बसत आहे.

''पावसाळ्यातही आता कडक ऊन पडतंय''

धाराशिवमधील ज्योती महाजन सांगतात, 'यंदा पावसानं आमचं खूप नुकसान केलं. आम्ही पेरणी केली खरी, पण पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला. त्यात आता ऊनही खूप वाढलंय. दिवसभर कडक ऊन असतं आणि रात्री थंडावा जाणवतो. या बदलत्या वातावरणामुळं घरातल्या माणसांनाही सारखं काही ना काही आजारपण येतंय. पाऊस नसल्यामुळं जनावरांना हिरवा चारा मिळत नाही, त्यामुळं गायी-म्हशीचं दूधही कमी झालंय. दूध कमी झाल्यामुळं उत्पन्न घटलं आणि त्याचा फटका आमच्या घरच्या आर्थिक परिस्थितीला बसला.' ज्योती महाजन यांच्या अनुभवातून हवामान बदलाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पिकांचे नुकसान झाले की जनावरांवर परिणाम होतो, जनावरांचे उत्पादन घटले की घरच्या उत्पन्नावर परिणाम होतो आणि या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना शेतकरी महिलांवर शारीरिक व मानसिक ताण वाढतो हे स्पष्ट होते.'

 ज्योती महाजन

धाराशिवच्या कोमल जाधव सांगतात, 'आमच्या भागात काही ठिकाणी पेरण्या झाल्यात, तर काही ठिकाणी अजूनही पेरण्या बाकीच आहेत. पावसाचा काहीच भरवसा राहिला नाही. त्यामुळं आमच्या भागात दुष्काळासारखी परिस्थिती यंदा निर्माण झालीये. त्यात आता वाढत्या उष्णतेचा फटका पण चांगलाच जाणवायला लागलाय. आधी उन्हाळ्यातच ऊन जास्त असायचं, पण आता पावसाळ्यातही कडक ऊन पडतंय. त्यामुळं थंडी, तापासारखे आजार वाढायला लागलेत. जनावरांना खायला चारा नाही, म्हणून कित्येक जण जनावरं डोंगरात सोडून देतायत. या परिस्थितीत जनावरं सांभाळणंही अवघड झालंय. शेतीतल्या पिकांना सध्या पाण्याची खूप गरज आहे, पण पाणीच उपलब्ध नाही. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यात. या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आमच्या शेतीवर आणि पिकांवर होतोय. उत्पन्न घटलय, खर्च वाढलाय आणि त्याचा मोठा आर्थिक फटका आम्हा शेतकरी कुटुंबांना बसलाय."

कोमल जाधव यांच्या बोलण्यातून हवामानातील बदल किती वेगाने घडत आहेत, याची जाणीव होते. पावसाचा भरवसा राहिलेला नाही, पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि जनावरांसाठी चारा मिळणंही कठीण झालं आहे. शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी होत असताना खर्च मात्र वाढत चालला आहे. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. कारण शेतीतील काम कमी झालेलं नाही, उलट परिस्थितीशी दोन हात करताना त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.'

''शेतात पीक आलं नाही, तर आरोग्यावर परिणाम''

ग्रामीण समाजजीवनाचे अभ्यासक सोमीनाथ घोळवे सांगतात, 'गेल्या दहा वर्षांत दरवर्षी दुष्काळच बघायला मिळतोय. कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ. या दुष्काळाचा सगळ्यात जास्त फटका शेतकरी महिलांना बसतो. कारण शेतीसोबत घराची आणि कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर असते. वातावरण बदललं, पण त्यानुसार बियाण्यांमध्ये बदल झाला नाही. त्यामुळे पिकंही शेतकऱ्यांना साथ देत नाहीत. दिवसभर कडक उन्हात काम करावं लागतं. त्यामुळं अंगात शक्ती राहत नाही, डोकेदुखी, पाय दुखणं, धाप लागणं, चक्कर येणं असे त्रास वाढलेत. अनेकदा तब्येत बरी नसतानाही महिलांना काम थांबवता येत नाही, त्यामुळं त्या पेनकिलर गोळ्या घेतात. त्याचाही परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. सततच्या उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता, थकवा आणि अशक्तपणाचं प्रमाणही वाढलं आहे. त्यात शेतीत उत्पन्न नाही, कर्जाचं ओझं वाढतंय, त्यामुळे मानसिक ताणही खूप वाढलाय. बदलत्या हवामानामुळे शेतात पीक आलं नाही, तर त्याचा थेट परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.'

संशोधन आणि धाराशिवमधील महिलांच्या अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकरी महिलांनाच बसत आहे. तरीही, हवामान बदलाच्या धोरणांमध्ये त्यांच्या आरोग्याचा आणि गरजांचा पुरेसा विचार होत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी उष्णतेच्या काळात महिलांसाठी सुरक्षित कामाच्या वेळा ठरवणे, शेतात सावली आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी करून उष्माघाताबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच हवामान बदलास अनुकूल बियाण्यांचा प्रसार करणे, महिलांना शेती व जोडव्यवसायांचे आधुनिक प्रशिक्षण देणे, मायक्रोफायनान्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक साक्षरता देणे, त्यांना जमिनीवर कायदेशीर हक्क मिळवून देणे आणि हवामान बदलाशी संबंधित सर्व योजनांमध्ये व शेतमाल विक्री व्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे.

ठोस पावलांची गरज...

  • आरोग्य व सुरक्षा उपाय : उष्णतेच्या लाटांच्या काळात महिलांसाठी कामाच्या सुरक्षित वेळा आखणे, शिवारात पिण्याचे स्वच्छ पाणी व सावलीची सोय उपलब्ध करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करून उष्माघाताबाबत जनजागृती करणे.
  • आधुनिक साक्षरता व प्रशिक्षण : हवामान बदलास अनुकूल असणाऱ्या बियाण्यांचा प्रसार करणे, महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि जोडव्यवसायांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे.
  • आर्थिक व कायदेशीर सक्षमीकरण : मायक्रोफायनान्सच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी महिलांना आर्थिक साक्षरता देणे, जमिनीवरील कायदेशीर मालकी हक्क मिळवून देणे आणि शेतमाल विक्री व्यवस्थेत त्यांचा थेट सहभाग निश्चित करणे.

भारतीय शेतीचा खरा कणा असलेल्या या महिला आजही निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आहेत. त्यांच्या कष्टावर शेती उभी आहे, पण बदलत्या वातावरणाची आणि आर्थिक अनिश्चिततेची सर्वात मोठी किंमतही त्यांनाच मोजावी लागत आहे. त्यामुळे हवामान बदलावर चर्चा करताना केवळ जागतिक तापमानवाढ, पाऊस किंवा उत्पादनातील घट यापुरताच विचार न करता, त्या उन्हात दिवसेंदिवस राबणाऱ्या शेतकरी महिलांच्या आरोग्याचा, कष्टाचा आणि जगण्याचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण शेतकरी महिला सक्षम आणि निरोगी राहिल्या, तरच भारतीय शेतीचे भवितव्य सुरक्षित राहील.

Apsara Aga is a mentee at the Climate Change Media Hub of the Asian College of Journalism. The program is supported by Interlink Academy, Germany.)

(This story is produced under Project Dharitri, a joint undertaking by Asar and Baimanus on Climate Change & Gender reporting.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus