चमोली आणि गोपेश्वर, उत्तराखंड: "आम्ही त्या भूमीचे आहोत जिथे देव-देवता वास करतात. ही देवभूमी आहे. पण आता हवामान बदलत आहे. हिमनद्या मागे सरकत आहेत. निती, माना आणि मलारी या आमच्या उंच हिमालयीन गावांमध्ये आता बर्फवृष्टी पूर्वीसारखी होत नाही.
गेल्या 8 डिसेंबरला मी माझ्या माना गावाला गेलो होतो, पण तिथे बर्फच पडलेला नव्हता," असं उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माना गावाचे मुखिया, 63 वर्षीय पीतांबरसिंह मोल्फा सांगतात.
दरवर्षी हिवाळ्यात या गावांतील लोक कमी उंचीच्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला परत येतात. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या पत्रकाराची मोल्फांशी भेट झाली, तेव्हा ते घिंघ्रान येथील आपले हिवाळ्यातले घर आवरत होते, माना येथे परत जाण्यासाठी तयार होत होते. भोटिया जमातीचे हे वस्तीस्थान, एकेकाळी "भारताचे शेवटचे गाव" म्हणून ओळखले जायचे, पण आता "पहिले गाव" म्हणून प्रसिद्ध आहे, कारण त्यापुढे फक्त हिमाच्छादित शिखरेच आहेत. जोशीमठ ब्लॉक, जिथे माना वसलेले आहे, तो भूस्खलनासाठी कुप्रसिद्ध आहे - म्हणजेच जमिन हळूहळू खाली बसणे, जे नैसर्गिक साधनसंपत्तीचे उत्खनन, भूकंप, मातीचा दाब, धूप, खड्डे किंवा बारीक मातीत पाण्याच्या शिरण्यामुळे घडते. त्यामुळे सुमारे 10,000 रहिवाशांच्या पायाखालचं जग डळमळीत झालं आहे, 600 हून अधिक घरांत भेगा पडल्या आहेत आणि काही भागात जमिनीत मोठे खड्डे तयार झाले आहेत.
भोटिया समुदायासाठी, जो हिमालयातील शिखरांना देव म्हणून पूजतो, बर्फवृष्टी म्हणजेच उपजीविका, सण-उत्सव आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. पण तो बर्फ आता नाहीसा होत आहे. "पूर्वी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 72 तास सलग बर्फवृष्टी आणि पाऊस होत असे. आम्ही त्या बर्फाला स्यून म्हणतो. रिंगालटोन्या, खार्कधोन्या - म्हणजे बर्फ इतका पडायचा की बांबूसारख्या रिंगाल वनस्पती मोडायच्या आणि हिमनद्यांमधील विश्रांतीची ठिकाणं नाहीशी व्हायची.
आता तसा बर्फ पडतच नाही," मोल्फा यांनी '101 रिपोर्टर्स 'शी बोलताना सांगितलं. त्यांच्या निरीक्षणाला सरकारी आकडेवारीतून दुजोरा मिळतो. हिंदू कुश हिमालयीन प्रदेशात सलग तीन वर्षांपासून बर्फवृष्टी सरासरीपेक्षा कमी झाली आहे. 2025 मध्ये बर्फवृष्टी सामान्यपेक्षा 24% कमी, म्हणजेच गेल्या २३ वर्षांतील सर्वात कमी होती. गंगाघाटी क्षेत्रात, 2015 मध्ये 30% अधिक असलेली बर्फवृष्टी आता जवळपास २४% कमी झाली आहे.
बर्फ वितळतोय, धोका वाढतोय
"हिमनद्या आमचे देव आहेत; आम्ही त्यांची पूजा करतो," असं उत्तराखंडच्या निती खोरीतील द्रोणागिरी गावाचे रहिवासी, उदयसिंह रावत (48) सांगतात. त्यांचे गाव द्रोणागिरी हिमनदीपासून फक्त अर्धा किलोमीटरवर आहे. पूर्वी वडीलधाऱ्यांनी या पवित्र भागांसाठी कडक नियम ठरवले होतेः उंच गवताळ प्रदेशात मोठ्या आवाजात बोलायचं नाही, झगमगते भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत, फुलं पूर्ण उमलण्याआधी तोडायची नाहीत. "आम्ही निसर्गाकडून फक्त आवश्यक तितकंच घेत होतो," ते सांगतात. "हिमनद्या नाहीशा झाल्या तर आपलं पाणी कुठून येईल?" ब्रह्मकमळ, नीलकमळ आणि फेनकमळ यांसारखी पवित्र फुलं फक्त नंदा अष्टमीच्या दिवशीच तोडली जातात, जेव्हा ती पूर्ण विकसित झालेली असतात, आणि नंदादेवीला अर्पण केली जातात.
संबंधित लेख वाचा: |
"द्रोणागिरी पर्वत तिचा मामा मानला जातो," रावत हसत म्हणाले. "आमचा विश्वास, आमचे नियम सगळेच निसर्गसंरक्षणासाठी उपयुक्त होते." आता, बर्फही मागे सरकतोय आणि देवही, असं ते सांगतात. "जेव्हा आपण निसर्गाशी सुसंवादात राहत नाही, तेव्हा तो आपला कोप दाखवतो." तो कोप आता स्पष्ट दिसतो आहे. वाढते तापमान आणि अनियमित बर्फवृष्टीमुळे जगभरातील हिमनद्या आक्रसत आहेत, ज्यामुळे हिमसरोवर फुटून आलेले पूर, भूस्खलन, आणि ढिगारेस्खलन यांचा धोका वाढला आहे.
फक्त उत्तराखंडमध्येच 1,400 हिमनद्या आहेत, ज्या गंगा, यमुना आणि त्यांच्या उपनद्यांना पोसतात, आणि 1,350 पेक्षा जास्त हिमसरोवरे आहेत. त्यापैकी सर्वाधिक 713 सरोवरे चमोली जिल्ह्यात आहेत. त्यापैकी एक, वसुधारा ताल, एकेकाळी रैकाना आणि ईस्ट कामेत हिमनद्यांच्या संगमावर असलेले छोटे सरोवर होते. पण रैकाना हिमनदी झपाट्याने मागे गेल्याने हे सरोवर वाढले - 1968 मध्ये 0.14 चौ.कि.मी. वरून 2021मध्ये 0.59 चौ.कि.मी. इतके झाले - म्हणजे आता नैनी तलापेक्षा मोठे. ते आता 4,680 मीटर उंचीवर, रस्त्यापासून १४ किमी. अंतरावर आहे, आणि मध्ये केवळ मोरैन (ढिगाऱ्याचा नैसर्गिक बांध) आहे. जर वाढत्या वितळत्या पाण्याने तो बांध फोडला, तर अचानक आलेला पूर धौलीगंगा खोऱ्याचा आणि तिथल्या जलविद्युत प्रकल्पांचा विध्वंस करू शकतो. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी आणि उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राज्यभरातील 13 अतिजोखमीच्या हिमनदी सरोवरांचे निरीक्षण करत आहेत.
वसुधारा तळावर वैज्ञानिकांनी सरोवराच्या तळाचा नकाशा तयार करून, बांध फुटल्यास किती पाणी खालील गावांकडे वाहू शकते, याचा अंदाज घेतला आहे. त्यांनी गोतिंग, निती, गमसाली, कैलाशपूर, आणि मलारी या गावांमध्ये नदीकाठापासून 200 मीटरपर्यंत बांधकामास बंदी आणि लवकर इशारा देणारी यंत्रणा उभारण्याची शिफारस केली आहे. अलिकडच्या इतिहासात याविषयीचे गंभीर इशारे बघायला मिळतात. 2021 मध्ये, चमोलीतील नंदादेवी रांगेत हिमस्खलन झाले आणि आलेल्या पुराने दोन जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले. ऑक्टोबर 2023 मध्ये, सिक्कीमच्या दक्षिण ल्होनाक सरोवराचा बांध फुटल्याने किमान 55 लोक मृत्युमुखी पडले, तीस्ता-III धरण वाहून गेले, पूल आणि रस्ते नष्ट झाले.
अशाच प्रकारचे हिमसरोवरांचे पूर नेपाळमध्ये, थामे (2024) आणि रसुवा (जुलै 2025) मध्येही आले, आणि त्यांनी मृत्यू व विध्वंसाचा माग सोडला.
परक्या भाषेतले इशारे
घिंग्रान गावात, या पत्रकाराच्या एप्रिल भेटीदरम्यान, गारांसह पाऊस पडत होता आणि जवळपास दररोज आकाश ढगांनी व्यापलेले होते. घरगुती वस्तू आवरताना गायत्री देवी, माना गावप्रमुख मोल्फा यांच्या पत्नी म्हणाल्या, "माना मध्ये जेव्हा अचानक जोरदार पाऊस सुरू होतो, तेव्हा आम्हाला काहीतरी वाईट घडेल असं वाटतं. कधी कधी त्या पावसाने हिमनदीचे तुकडे सुटतात. पण काहीही झालं तरी आम्ही इथून जाणार नाही." मोल्फा सांगतात की पावसाच्या इशाऱ्यांचे एसएमएस इंग्रजीत येतात, आणि ते लोकांना समजत नाहीत. "ते स्थानिक भाषेत असायला हवेत." तसेच दोऱ्या, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार संच आणि पर्वतारोहण साहित्याने सुसज्ज सुरक्षित समुदाय आश्रयस्थानांची गरजही त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की आपत्ती-तयारी जवळच्या सर्व गावांत विस्तारली पाहिजे, आणि प्रशिक्षित स्वयंसेवक सदैव सज्ज असले पाहिजेत. विजय बुटोला (30) हे असेच एक स्वयंसेवक आहेत जे लाटा गावचा रहिवासी आहेत, ज्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग कडून हिमालयीन शोध व बचाव प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी दोरी वापरणे, हिमस्खलन बचाव अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षणही स्वतःच्या खर्चाने घेतले आहे; सरकार किंवा स्थानिक प्रशासनाने त्यांना यासाठी कोणतीही मदत केली नाही.
2021 च्या पूरात, जेव्हा ऋषिगंगा पूल कोसळला आणि रैणी गाव संपर्कविहीन झाले, तेव्हा बुटोला आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने 150 मीटर लांबीची झिपलाइन उभारून बचावकार्य व सामग्री पुरवली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तात्पुरता हेलिपॅड चिन्हांकित करून हवाई बचाव सुलभ केला. जवळपास महिनाभर ते बचाव मोहिमेत कार्यरत होते. बुटोलांचं गाव लाटा, धौलीगंगेच्या वरती वसलेलं आहे, आणि तिथे जाणारा रस्ता इतक्या उंचीवरून जातो की श्वास घ्यायलाही त्रास होतो.
फेब्रुवारी 2021 मध्ये, हीच नदी ऋषिगंगेसोबत उग्र रूपात आली होती. याच स्त्रोतावर - रैकाना हिमनदीतच - वसुधारा तलाव आता शांतपणे वाढत आहे. पण मोल्फा आणि बुटोला यांसारख्या स्थानिकांना या सरोवराबद्दल माहितीच नव्हती; त्यांना फक्त प्रसिद्ध सरोवरे - सतोपंथ, रूपकुंड - यांचीच माहिती होती. या प्रदेशात, जिथे सर्वाधिक धोका असलेले लोक राहतात, तिथेच सर्वात तातडीच्या संकटांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे.
विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा संगम
हिमालयातील हिमनद्या, ज्यांना अनेकदा "तिसरा ध्रुव" असे म्हणतात, आशिया-प्रशांत प्रदेशातील जवळपास दोन अब्ज लोकांना जीवनदान देतात. तरीही जागतिक स्तरावर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अलीकडील युनेस्को अहवालात असे नमूद केले आहे की हिमनद्यांमधील बदल समजून घेण्यासाठी आणि प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी वैज्ञानिक आणि स्थानिक समुदाय यांचे सहकार्य आवश्यक आहे. "उच्च हिमालयात राहणाऱ्या लोकांकडे पर्वत आणि नदीशी संबंधित आपत्तींसाठी पारंपरिक तयारीची स्वतःची पद्धत आहे," असे वाडिया इन्स्टिट्यूटचे डॉ. मनीष मेहता सांगतात, जे वसुधारा ताल सरोवराचे अध्ययन करत आहेत. "पण हवामानबदलामुळे अशा आपत्तींची वारंवारता वाढत आहे. त्यामुळे विज्ञान आणि स्थानिक अनुभव यांचा मिलाफ होणे आवश्यक आहे.
अगदी शाळांमध्येही हिमनद्यांच्या हालचाली, हिमनदी तलावांची निर्मिती आणि अचानक होणाऱ्या पूरांच्या जोखमींबाबत मूलभूत माहिती शिकवली पाहिजे. हा धोका सर्वाधिक प्रमाणात स्थानिक लोकांवरच येतो." भूतान मध्ये अशा सहकार्याचे उदाहरण बघायला मिळते. तेथील रहिवाशांना हिमनदी तलावांचे निरीक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे - पाण्याची पातळी, प्रवाह, आणि खोली मोजणे इत्यादी - ज्यामुळे एखादा तलाव फुटल्यास परिणाम किती दूरपर्यंत पोहोचेल याचा अंदाज बांधता येतो. जोखमीतील गावे आधीच सतर्क केली जातात. हिमनदितज्ञ डॉ. डी. पी. दोभाल, ज्यांनी 2013 च्या केदारनाथ आपत्तीपूर्वी चोराबारी तलाबाबत इशारा दिला होता, सांगतात, "आपण हिमनदी तलावांसाठी निरीक्षण आणि लवकर इशारा देणारी प्रणाली विकसित केली पाहिजे. पण स्थानिक लोकांनी केवळ इशारे मिळवणारे न राहता, त्या प्रणालीचा भाग व्हायला हवे."
केंद्र सरकारचा "मिशन मौसम" (2024-26) हा कार्यक्रम नेमके हेच साध्य करण्यासाठी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमनदी तलाव फुटीमुळे होणाऱ्या आपत्तींसाठी लवकर इशारा देणारी प्रणाली उभारणे. उत्तराखंडमध्ये पाच हिमनदी तलाव, वसुधारा तालासह, संभाव्य धोकादायक तलाव म्हणून ओळखले गेले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन सांगतात की जोखमीच्या तलावांमध्ये सेन्सर बसवले जातील आणि ते जवळच्या गावांमधील सायरनशी जोडले जातील.
"जर आपत्ती आली, तर लोकांना तात्काळ स्थलांतर मार्ग आणि सुरक्षित निवाऱ्यांची माहिती असावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत," ते सांगतात. विशेष म्हणजे, 2021 च्या आपत्तीनंतर ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांवर पाणी मोजणारे मापणयंत्रं बसवली गेलेत, ज्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढेल तेव्हा सायरन वाजतील. अशी एक प्रणाली 2021 मध्ये सर्वाधिक प्रभावित झालेल्या रेणी गावासमोर उभी आहे. "जर हिमस्खलनामुळे नदीची पातळी वाढली, तर सायरन वाजेल," असे रेणी येथील अंगणवाडी कार्यकर्ती रमी देवी (35) सांगतात. तो अद्याप तरी वाजलेला नाही. 
लाटा गावाजवळील अशाच प्रणालीही अद्याप शांत आहेत. वसुधारा तलावाबद्दल अजूनही बरीच माहिती अज्ञात आहे. "रिमोट सेन्सिंगद्वारे तलावाचे पृष्ठफळ मोजता येते, पण खोली नाही," असे भौगोलिक वैज्ञानिक डॉ. नविन जुयाल सांगतात. "खोलीची माहिती नसल्यास आपण पाण्याचे प्रमाण मोजू शकत नाही, आणि पाण्याचे प्रमाण माहित नसल्यास धोका किती गंभीर आहे हे ठरवता येत नाही. हायड्रोडायनामिक (पाण्याचे वर्तन) अभ्यास आवश्यक आहे, ज्यामुळे हे समजेल की जर तलावावर हिमस्खलन झाले तर पाण्याचे वर्तन कसे असेल - प्रवाहाची दिशा आणि वेग काय असेल, तलावावर बर्फ आहे का, मलबा आहे का, पूर किती दूरपर्यंत जाईल, आणि कोणती गावे धोक्यात येतील."
(This story was originally published by 101Reporters)
Link :click here

