Dailyhunt
कमल हसन, रजनीकांतला जे जमलं नाही ते 'थलपती'ने द्रविडांच्या राज्यात कसं करून दाखवलं.?

कमल हसन, रजनीकांतला जे जमलं नाही ते 'थलपती'ने द्रविडांच्या राज्यात कसं करून दाखवलं.?

टीम बाईमाणूस

  • तामिळी जनतेने सुपरस्टार थलपती विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे तामिळनाडू विधानसभेच्या सुरुवातीच्या कलांवर स्पष्ट होत आहे.

  • तामिळनाडूच्या सर्वच विधानसभा जागांवर विजयने आपल्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाचे उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांना हादरे देण्याची रणनीती आखली आहे.
  • त्यांची हीच रणनीती यशस्वी होताना दिसून येत आहे.

  • विजयचा राजकारणात प्रवेश कसा झाला, त्याच्या पक्षाची विचारधारा काय आहे, त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे आणि फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा कशी आहे या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निकालात धक्कादायक कल हाती आले असून तामिळी जनतेने सुपरस्टार थलपती विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे सुरुवातीच्या कलांवर स्पष्ट होत आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत द्रविड मुन्नेत्र कळघम आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यातच प्रामुख्याने राजकीय लढाई होत असे. परंतु यंदा तामिळी अभिनेता थलापती विजय याने निवडणुकीची संपूर्ण गणितं बदलून टाकली आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिलीच निवडणूक असून पेरम्बूर विधानसभा मतदारसंघातून ते लढवत आहेत. तामिळनाडूच्या सर्वच विधानसभा जागांवर त्यांनी आपल्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाचे उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांना हादरे देण्याची रणनीती आखली आहे. त्यांची हीच रणनीती यशस्वी होताना दिसून येत आहे.

फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा

विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर या तमिळनाडूमधल्या सुपरस्टारने दोन वर्षांपूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा एक पाऊल पुढे नेली. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या राजकारणात कमालीच्या यशस्वी झालेल्या अभिनेत्यांची फळी जशी तमिळ राजकारणात आहे, तशीच अपयशी झालेल्या अभिनेत्यांचीही मालिका तिथं आहे. सुपरस्टार कमल हसन हे त्यामधलं अलिकडचं नाव. विजय थलपती यांचा समावेश पहिल्या यादीत होणार की दुसऱ्या यादीत याची यंदाच्या निवडणुकाीमध्ये जोरदार चर्चा होती. परंतू थलपती म्हणजेच कमांडर हे आपलं नाव राजकारणात सार्थ करण्याची संधी आणि जबाबदारी विजय थलपतीने अतिशय समर्थपणे पेलली असल्याचे दिसून येत आहे.


थलपती विजय याने सिनेसृष्टीतून राजकारणात पाऊल टाकण्याचे ठरवले. थलपतीच्या घोषणेला तामिळी जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या काही महिन्यांपासून थलपतीने तामिळी जनतेच्या प्रश्नांवर जोरदार उठवला होता. त्याचमुळे युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्येही त्याची अफाट लोकप्रियता होती. निवडणूक प्रचारातही त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला पक्ष घराघरात पोहोचवला. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला असता सिनेमासृष्टीच्या भोवती तेथील राजकारण फिरते. त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे जयललिता... त्यांच्यानंतर सिनेसृष्टीतून येऊन जनतेच्या पसंतीने विजय महत्त्वाच्या खुर्चीवर बसू शकतो, असे आत्ताच्या कलांनुसार दिसते.

हजारो-लाखोंची गर्दी खेचण्यासाठी दक्षिण भारतात 'सुपरस्टार विजय' हे दोन शब्दच पुरेसे आहेत. इतकी प्रचंड लोकप्रियता आहे अभिनेता विजयची. त्याचे चाहते त्याला 'थलपती' म्हणतात. तामिळनाडूतील करूरमध्ये 'तामिळगा वेत्री कळघम' या विजय यांच्या पक्षाच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. विजय या रॅलीत उपस्थितांशी संवाद साधत होता. या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर विजय यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं. त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

विजयचे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखेच राहिले आहे. अगदी जन्मही एकप्रकारे चित्रपटसृष्टीतच, लहानपणापासून अभिनयाची सुरुवात, संघर्षानंतर मिळवलेले स्टारडम, वडिलांशी मतभेद आणि आता राजकारणात प्रवेश.

थलपती म्हणजेच कमांडर

विजयचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि आई शोभा गायिका होत्या. चित्रपटाच्या वातावरणात वाढलेल्या विजय यांनी अगदी लहानपणापासून अभिनयास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना 'वेत्री' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी दिली. लहान वयातच विजय यांनी आपला भविष्यकाळ चित्रपटसृष्टीतच असेल हे ठरवले होते. कॉलेजमध्ये त्यांनी व्हिज्युअल मीडिया विषयात शिक्षण घेतलं. पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. नंतर त्यांच्या आई शोभा यांनी एक पटकथा लिहिली आणि वडिलांनी त्यावर 'नालैय्या थिरपू' (1992) हा चित्रपट बनवला. याच चित्रपटातून विजय यांनी नायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही, मात्र, त्यातून विजयच्या करिअरची पायाभरणी झाली.


विजयच्या सुरुवातीचे बहुतांश सिनेमे अ‍ॅक्शन आणि रोमँटिक गाण्यांनी भरलेले असायचे. पण कालांतराने त्याने असे काही सिनेमे केले, ज्यातून त्याची प्रतिमा बदलत गेली. कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून त्याने वेगळी छाप पाडली आणि साध्या हिरोपासून हळूहळू तो चाहत्यांसाठी 'थलपती' (सेनापती) बनला. 'गिल्ली'सारख्या सुपरहिट चित्रपटाने विजयला 'मास हिरो'ची ओळख मिळवून दिली. 'कथी' चित्रपटाने त्याच्या अभिनयाला सामाजिक आणि राजकीय विषयाशी जोडले, तर 'थेरी', 'मर्सल' आणि 'बिगिल'ने बॉक्स ऑफिसवर कमाईत विक्रम केले. अभिनयासोबतच विजय उत्तम डान्सर म्हणूनही ओळखला जातो.

राजकारणात प्रवेश कसा झाला?

फेब्रुवारी 2024 मध्ये विजयने औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश केला आणि 'तामिळगा वेत्री कळघम' या नव्या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेवेळी विजयनं स्पष्ट केलं होतं की, 2024 च्या लोकसभा निवडणूक ते लढवणार नाहीत किंवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. त्यांचा भर 2026 च्या विधानसभा निवडणुकीवर असेल. राजकारणात प्रवेश करतानाच विजयने चित्रपटसृष्टी सोडत असल्याचीही घोषणा केली.

'तामिळगा वेत्री कळघम' म्हणजेच टीव्हीकेची पहिली सभा 27 ऑक्टोबर 2024 रोजी तमिळनाडूच्या विलुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेतून विजय यांनी लोकांमध्ये दुफळी माजवणारं राजकारण करणाऱ्या पक्षांवर टीका केली होती. असा भेद निर्माण करणाऱ्या पक्षांच्या विचारसरणीला आपला विरोध असल्याचंही विजयनं त्यावेळी सांगितलं होतं. "द्रविड मॉडेलच्या नावाखाली फसवणूक" आणि "एका कुटुंबाने राज्य लुटल्या"चा आरोपही विजयनं त्यावेळी केला होता.


राजकारणात येण्यापूर्वी विजयच्या कुटुंबातही वाद निर्माण झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम नावाने आधीच पक्ष स्थापन केला होता. यावरून विजय आणि त्याच्या वडिलांमध्ये मतभेद झाले होते. विजयने आई-वडिलांसह 11 जणांविरुद्ध खटला दाखल केला होता आणि आपल्या नावाचा वापर कोणत्याही राजकीय कारणासाठी किंवा लोकांना एकत्र करण्यासाठी करू नये, अशी मागणी केली होती.

विजयच्या पक्षाची विचारधारा काय?

पहिल्या सभेत विजय यांनी टीव्हीकेच्या विचारधारेबाबत सविस्तर भूमिका मांडली होती.त्यात म्हटलं होतं की,

"आम्ही द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवाद यांना वेगळे करणार नाही. हे दोन्ही या मातीतल्या दोन डोळ्यांसारखे आहेत. आपण स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित ठेवू नये."

विजयने स्पष्ट केलं होतं की, त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आधारित असेल. तसंच, विजय पुढे म्हणाला होता की, 'टीव्हीके पेरियार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल, ज्यात महिला सबलीकरण आणि सामाजिक न्यायाचा समावेश आहे. मात्र, पेरियार यांचे नास्तिकतेचे विचार मात्र स्वीकारणार नाहीत.'

विजयचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे?

विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे त्याचा विवाह. लंडनमध्ये वाढलेली संगीता विजयची चाहती बनली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हे नातं पुढे सरकत लग्नापर्यंत पोहोचलं. 25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांच्याही कुटुंबांच्या सहमतीने विजयने संगीताशी विवाह केला. लग्नानंतर संगीता विजयची कॉस्च्युम डिझायनर बनली आणि असं म्हटलं जातं की, आजही संगीताने निवडून दिलेले कपडेच विजय परिधान करतो.


मात्र गेल्या काही महिन्यांपासून साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन आणि विजय यांच्यातील अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. विजयची पत्नी संगीता हिनेच आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचं सांगत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीताने चेंगुलपट्टू फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अर्जात कोणत्याही अभिनेत्रीचे नाव थेट लिहिलेले नसले, तरी सोशल मीडियावरील युजर्सनी आपला मोर्चा त्रिशा कृष्णनकडे वळवला आहे. विजय आणि त्रिशाने अनेक हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता याच केमिस्ट्रीचा धागा पकडून नेटीझन्स असा दावा करत आहेत की, विजयचे त्रिशासोबत अफेअर सुरू आहे आणि त्यामुळेच त्याचे घर मोडण्याच्या मार्गावर आहे.

घटस्फोटाच्या अर्जात संगीताने केवळ अफेअरचाच नाही, तर मानसिक छळाचाही उल्लेख केला आहे. 2021 पासून विजयचे वागणे पूर्णपणे बदलले असून तो तिच्याशी अत्यंत तुच्छतेने वागत असल्याचे तिने म्हटले आहे. विजयने तिला भावनिकदृष्ट्या एकटे पाडले असून एकाच घरात राहूनही तो तिच्याशी परक्यासारखा वागत असल्याचा दावा संगीताने केला आहे. विजयच्या या वागण्यामुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून अखेर तिने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus