शंतनू खुजे
- तब्बल १९ वर्षांनंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन पुन्हा एकदा कोलकात्यात आल्या आणि त्यांच्याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली. एकेकाळी स्वतःचं दुसरं घर मानलेल्या या शहरातून त्यांना २००७ मध्ये निघून जावं लागलं होतं.
- लज्जा या कादंबरीने त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली; पण त्याच पुस्तकामुळे त्यांना स्वतःचा देश सोडावा लागला.
- गेली तीन दशके लेखन, वाद, धमक्या आणि देशापासून दूरचं आयुष्य जगणाऱ्या तस्लिमा नसरीन यांची कहाणी ही केवळ एका लेखिकेची नाही, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि धार्मिक कट्टरतेशी सुरू असलेल्या संघर्षाचीही आहे.
हद्दपार बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
तब्बल १९ वर्षांनंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन पुन्हा कोलकात्यात आल्या आणि त्यांच्याविषयीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. तस्लिमा नसरीन यांच्या 'द्विखंडितो' या पुस्तकाने मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून २००३मध्ये पश्चिम बंगाल सरकारने त्या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, तो वाद थांबला नाही आणि त्यांना २००७मध्ये कोलकाता शहर सोडावे लागले होते. त्यानंतर त्या प्रथमच शहरातील एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. कोलकात्याच्या रवींद्र सदन सांस्कृतिक केंद्र येथे 'सेक्युलर मिशन', 'पश्चिमबोंगेर जोनो' आणि 'ह्युमन राइट्स बियाँड फ्रंटियर्स' या संघटनांनी १ ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
तस्लिमा नसरीन या दक्षिण आशियातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लेखिकांपैकी एक आहेत. त्यांना काहीजण स्त्रीवादी विचारवंत मानतात, काहीजण निर्भीड मानवतावादी लेखक म्हणतात, तर काहींसाठी त्या वादग्रस्त लेखिका आहेत. मात्र या सगळ्या मतांमध्ये एक गोष्ट समान आहे, तस्लिमा नसरीन यांच्याकडे दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य झालं नाही.

एकेकाळी ज्या कोलकाता शहराला त्यांनी आपलं दुसरं घर मानलं, त्याच शहरातून त्यांना २००७ मध्ये निघून जावं लागलं होते. आजही त्यांना आपल्या जन्मभूमी बांगलादेशात परतता येत नाही आणि भारतातही कायमस्वरूपी नागरिक म्हणून राहण्याची परवानगी मिळालेली नाही. गेली तीन दशके त्यांचं आयुष्य देशोदेशी फिरण्यातच गेलं आहे. त्याचं मुख्य कारण एकच ते म्हणजे त्यांचं लेखन…त्यांच्या लज्जा या कादंबरीने त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली खरी, पण त्याच पुस्तकामुळे त्यांना स्वतःचा देश सोडावा लागला. एका पुस्तकाने एखाद्या लेखकाच संपूर्ण आयुष्य बदलून टाकावे, असे उदाहरण जगात फार कमी आहेत. तस्लिमा नसरीन त्यापैकी एक आहेत.
डॉक्टर ते लेखिका
तस्लिमा नसरीन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ रोजी तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील (आताचा बांगलादेश) मयमनसिंह येथे झाला. त्यांचे वडील डॉ. रजब अली हे डॉक्टर होते, तर आई इदुल आरा पारंपरिक धार्मिक विचारांच्या होत्या. घरात विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न प्रवाहांचा प्रभाव होता. पुढे त्यांच्या लेखनातही या दोन विचारधारांमधील संघर्ष वारंवार दिसून येतो.
लहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. किशोरवयात त्यांच्या कविता स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. मात्र लेखन हा त्यांचा व्यवसाय नव्हता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टर म्हणून काम सुरू केले. स्त्रीरोग विभागात काम करताना त्यांना महिलांवरील अत्याचार, लैंगिक भेदभाव, बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि धार्मिक रूढींमुळे महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना जवळून पाहायला मिळाल्या.
याच अनुभवांनी त्यांच्या लेखनाला दिशा दिली. सुरुवातीला त्यांनी कविता लिहिल्या, नंतर वर्तमानपत्रांत स्तंभलेखन सुरू केले. या लेखांमध्ये त्यांनी धर्म, स्त्रियांचे हक्क, पुरुषसत्ताक व्यवस्था आणि सामाजिक दुटप्पीपणावर थेट टीका केली. त्यामुळे त्यांचे समर्थक वाढले, पण विरोधकही तयार झाले.
तस्लिमा यांनी इस्लामपुरतेच नव्हे तर कोणत्याही धर्मातील अंधश्रद्धा, कट्टरता आणि स्त्रियांवरील अन्यायावर टीका केली. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट धर्माच्या विरोधात उभे राहिलेल्या लेखिका म्हणून पाहणे पूर्णपणे योग्य ठरत नाही. त्यांचा मुख्य आग्रह धर्मनिरपेक्षता, समानता आणि मानवी स्वातंत्र्यावर होता.
'लज्जा' : एका कादंबरीने घडवलेला इतिहास
१९९२ मध्ये भारतातील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर भारतात आणि बांगलादेशात धार्मिक तणाव निर्माण झाला. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदू समाजावर हल्ले झाले, मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि अनेक कुटुंबांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी १९९३ मध्ये 'लज्जा' ही कादंबरी लिहिली.
ही कादंबरी काल्पनिक असली तरी तिचा आधार वास्तव घटनांवर होता. कथेच्या केंद्रस्थानी दत्ता नावाचं एक हिंदू कुटुंब आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या या कुटुंबाला स्वतःच्या देशातच परके असल्याची जाणीव होऊ लागते. त्यांच्या घरावर हल्ले होतात, मुलीवर संकट येतं आणि अखेरीस देश सोडण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.

या कादंबरीचा मुख्य मुद्दा हिंदू किंवा मुस्लिम असा नव्हता. तस्लिमा यांचा प्रश्न असा होता की, कोणत्याही देशात धर्माच्या आधारावर एखाद्या अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य केले जात असेल, तर तो देश लोकशाही आणि मानवतेच्या मूल्यांवर कसा उभा राहू शकतो?
लज्जा प्रकाशित झाल्यानंतर काही महिन्यांतच हजारो प्रती विकल्या गेल्या. पुस्तकाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं स्वागत झालं. मात्र बांगलादेशात परिस्थिती वेगळी होती. कट्टर इस्लामी संघटनांनी या पुस्तकाला इस्लामविरोधी ठरवलं. पुस्तकावर बंदी घालण्यात आली. तस्लिमा यांच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली. जो कोणी तस्लिमाचे कापलेले शिर आणून देईल त्याला बक्षीस मिळेल असा फतवा काढण्यात आला. त्यांना सार्वजनिकरीत्या ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.
तस्लिमा यांनी नंतर अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की, त्यांनी 'लज्जा' लिहिताना कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांना धार्मिक हिंसेकडे समाजाचं लक्ष वेधायचं होतं. मात्र त्या काळातील राजकीय आणि धार्मिक वातावरणात हा संदेश मागे पडला आणि वाद पुढे आला.
जो कोणी तस्लिमाचे शिर कापून आणेल त्याला…
'लज्जा' प्रकाशित झाल्यानंतर तस्लिमा नसरीन यांच्याविरोधात सुरू झालेला विरोध काही दिवसांतच तीव्र झाला. कट्टर इस्लामी संघटनांनी त्यांच्यावर धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यांच्या सभांमध्ये तस्लिमांविरोधात घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले. काही धर्मगुरूंनी त्यांच्याविरोधात फतवे काढले. या सगळ्या घडामोडींच्या काळात तस्लिमा यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यांनी आपण जे लिहिले आहे त्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. सरकारवरही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव वाढू लागला.

अखेर १९९४ मध्ये त्यांना बांगलादेश सोडावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत त्या आपल्या जन्मभूमीत परत जाऊ शकलेल्या नाहीत. बांगलादेश सोडल्यानंतर त्यांनी स्वीडनसह युरोपमधील अनेक देशांत वास्तव केले. त्यांना अनेक देशांनी आश्रय दिला, साहित्यिक पुरस्कार दिले, व्याख्यानांसाठी आमंत्रित केले. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहिली, त्यांना स्वतःच्या देशात जाण्याची परवानगी नव्हती.
तस्लिमा अनेकदा म्हणतात, "माझ्याकडे पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, पण माझं घर नाही." त्यांच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे.
भारताशी जुळलेले नाते
तस्लिमा नसरीन यांचे भारताशी नाते केवळ राजकीय नाही, तर भावनिकही आहे. त्यांची मातृभाषा बंगाली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील साहित्यविश्व त्यांना आपलं वाटत होतं. २००४ मध्ये त्या भारतात आल्या आणि कोलकात्यात राहू लागल्या. कोलकात्यातील साहित्यिक, कलाकार आणि वाचकांनी त्यांचं स्वागत केलं. बंगाली भाषेत लिहिणाऱ्या एका महत्त्वाच्या लेखिकेला येथे घर मिळाल्यासारखं वाटलं. तस्लिमांनी अनेकदा सांगितलं आहे की, ढाका सोडल्यानंतर कोलकाताच त्यांना सर्वांत जवळचा वाटला.
याच काळात त्यांनी आत्मचरित्राच्या अनेक खंडांचे लेखन केले. आमार मेयेबेला, उत्तल हवा, द्विखंडितो, का अशा पुस्तकांमध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य, नाती, समाज आणि धर्म यांवर अत्यंत स्पष्टपणे लिहिलं. विशेषतः द्विखंडितो आणि का या पुस्तकांमध्ये त्यांनी अनेक प्रसिद्ध साहित्यिक आणि वैयक्तिक संबंधांबद्दल केलेल्या उल्लेखांमुळेही वाद निर्माण झाले. काही पुस्तकांवर पश्चिम बंगाल सरकारने बंदी घातली होती.
२००७ : कोलकाता सोडण्याची वेळ
२००७ हे वर्ष तस्लिमा नसरीन यांच्या आयुष्यातील आणखी एक मोठा धक्का घेऊन आलं. हैदराबादमध्ये त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. काही राजकीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला. त्यानंतर काही महिन्यांतच कोलकात्यात त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभं राहिलं. शहरातील काही भागांत हिंसाचार झाला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने तस्लिमांना कोलकाता सोडण्यास सांगितले. त्यांना प्रथम जयपूर, नंतर दिल्ली येथे हलवण्यात आलं. काही काळ त्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत, जवळजवळ घरातच राहिल्या. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की, त्या दिवसांत त्यांना कैदेत असल्यासारखं वाटत होतं.

त्यांना सर्वांत जास्त वेदना कोलकाता सोडताना झाली. कारण त्यांनी त्या शहराला स्वतःचे घर मानले होते. मात्र राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा स्थलांतर करावं लागलं. यामुळे तस्लिमा यांच्या आयुष्यात एक विचित्र विरोधाभास निर्माण झाला. जन्मभूमीने त्यांना नाकारलं आणि ज्या शहराला त्यांनी दुसरं घर मानलं, तिथूनही त्यांना निघून जावं लागलं.
लेखिका, वाद आणि हरवलेला देश
कोणत्याही सार्वजनिक व्यक्तीप्रमाणे तस्लिमा नसरीन यांच्याबाबतही मतमतांतरे आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी त्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आवाज आहेत; तर विरोधकांच्या मते त्या धर्माबद्दल अपमानास्पद भाषा वापरतात आणि जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात. या दोन टोकांच्या मतांमध्ये तस्लिमा नसरीन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर चित्र थोडं वेगळं दिसतं.
तस्लिमा स्वतःला नास्तिक आणि मानवतावादी मानतात. त्यांच्या लेखनात धर्मापेक्षा धार्मिक कट्टरतेवर अधिक टीका दिसते. त्यांचा दावा असा आहे की, कोणताही धर्म जेव्हा स्त्रियांवर बंधने घालतो, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणतो किंवा विज्ञान आणि विवेकाला दुय्यम मानतो, तेव्हा त्यावर प्रश्न विचारलेच पाहिजेत. म्हणूनच त्यांनी इस्लामबरोबरच हिंदू धर्मातील जातिव्यवस्था, ख्रिश्चन धर्मातील काही रूढी आणि इतर धार्मिक परंपरांतील स्त्रीविरोधी प्रथांवरही भाष्य केले आहे. मात्र त्यांची भाषा अनेकदा अत्यंत थेट आणि आक्रमक असते. त्यामुळे त्यांच्या लिखाणामुळे विचारांची चर्चा कमी आणि वाद अधिक निर्माण झाले. काही समीक्षकांचे मत आहे की, त्यांच्या भूमिकेत अनेकदा आवश्यक त्या सूक्ष्मतेचा अभाव दिसतो. दुसरीकडे, त्यांचे समर्थक म्हणतात की, सौम्य भाषेत बोलणाऱ्यांकडे समाज लक्ष देत नाही; त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक कठोर भाषा स्वीकारली.
आत्मचरित्रामुळेही वाद
'लज्जा'नंतर तस्लिमा नसरीन यांनी आत्मचरित्राच्या अनेक खंडांचे लेखन केले. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच अनेक साहित्यिक, पत्रकार, राजकीय व्यक्ती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांबद्दलही स्पष्टपणे लिहिले. त्यामुळे नव्या वादांना सुरुवात झाली. काहींनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी खासगी आयुष्य सार्वजनिक केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. काही पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. न्यायालयात खटलेही दाखल झाले. मात्र या सर्व वादांमध्ये तस्लिमा यांनी एकच भूमिका कायम ठेवली, लेखकाला सत्य वाटते ते लिहिण्याचा अधिकार असला पाहिजे.
आजची तस्लिमा…
आज तस्लिमा नसरीन यांनी साठी ओलांडली आहे. त्या पूर्वीइतक्या सक्रिय सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नसल्या, तरी लेखन थांबलेले नाही. त्या नियमितपणे लेख, कविता आणि सामाजिक-राजकीय विषयांवरील प्रतिक्रिया लिहितात. सोशल मीडियावरही त्या सक्रिय आहेत. दक्षिण आशियातील राजकारण, महिलांचे हक्क, धार्मिक कट्टरता, निर्वासितांचे प्रश्न आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयांवर त्या सातत्याने भूमिका मांडतात.

त्यांना आजही बांगलादेशात परत जाता आलेले नाही. भारतात त्या दीर्घकालीन व्हिसावर वास्तव करतात. कायमस्वरूपी नागरिकत्व किंवा स्थिर आयुष्य यापैकी कोणतीच गोष्ट त्यांना लाभलेली नाही. जगभर अनेक पुरस्कार मिळूनही "घर" हा शब्द त्यांच्या आयुष्यात आजही अपुरा आहे.
तस्लिमा आणि त्यांची वादग्रस्त विधानं…
- ''मुस्लिम महिला पृथ्वीवर 72 अविवाहित पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवू शकते. कारण स्वर्गात तिला हे सुख मिळणार नाही.''
- ''बांगलादेशमधील मशिदींमध्ये इमाम आणि शिक्षक मुलांवर बलात्कार करतात.''
- "सरोगसीद्वारे 'रेडिमेड मुलं' मिळतात तेव्हा या मातांना नेमकं कसं वाटतं? प्रत्यक्ष बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या जशा भावना असतात तशाच त्यांच्याही भावना असतात का? गरीब महिलांमुळंच सरोगसी शक्य आहे. जर तुम्हाला खरंच एखादं मूल हवं असेल तर अनाथांना दत्तक घ्या. पण हे केवळ स्वार्थीपणा आणि अहंकाराचं लक्षण आहे.''
- ''मला ए. आऱ् रेहमानचे संगीत आवडते. पण जेव्हा केव्हा मी त्याच्या मुलीला बुरख्यात बघते, तेव्हा माझा श्वास गुदमरतो.''

