Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की.!

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की.!

द्वारकानाथ संझगिरी

हा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.

'चहातरी घेऊन जा' असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या 'रात्री सातनंतर चहा घेत नाही' असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या 'आंतरराष्ट्रीय चहा दिना'निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

प्रिय चहाच्या कपास,

पत्र लिहिण्यास कारण की,

रोज सकाळी तुझी भेट झाल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही. तुझा घोट पोटात गेल्यावर पूर्णपणे डोळे उघडतात. एरवी ब्रश करणं, तोंड धुणं वगैरे प्रकार मी पेंगतच करत असतो. तुझा घोट पोटात गेल्याशिवाय वर्तमानपत्रातील अक्षरंही मला नीट दिसत नाहीत. त्यानंतर दिवसभरात तुझी भेट बऱ्याचदा तरी नक्की होते. तुझी भेट झाल्याशिवाय ऑफिसात कामाला सुरुवात होत नाही. दुपारी तुझ्या आगमनाची मी चातकासारखी वात पाहत असतो. घरी गेल्यावर बायकोच्या हातचा तुझा घोट तरतरी आणून साहेबाची बोलणी विसरायला लावतो. अलीकडे सातनंतर तुझा आस्वाद घेणं शिष्टसंमत नाही, असं म्हणतात. शेवटी इतर पेयांनाही वाव हवाच ना? पण मला रात्री बारा वाजताही तुझी कंपनी नकोशी वाटत नाही. रात्री, 'चला स्टेशनवर जाऊन चहा मारायचा का?' अशी साद दोस्तांना घातली तर नाही म्हणणारे अल्पसंख्याक असतात आणि एरवी 'हा आला म्हणून घेतला', 'तो म्हणाला म्हणून घेतला' असं घेणं सुरूच असतं. 'तुला भेटायला चाललोय' या सबबीखाली ऑफिसातून तास-दोन तास गुल होता येतं. आमच्या रिकाम्या खुर्चीकडे आलेल्या माणसाला 'चहाला गेलेत' ही थाप सहज पचते.

दिवसभरात तुझी वारंवार भेट होते, कारण तू आमच्या आदरतिथ्याचा एक भाग आहेस. भेटायला आलेल्या माणसाला, 'अर्धा कप चहातरी घेऊन जा', हे सांगायची आमची पद्धत आहे किंवा कुणी आदरतिथ्य केलंच नाही की आम्ही चिडून म्हणतो, "इतक्या लांबून गेलो त्याच्याकडे, पण साधा चहा घेतो का, विचारलं नाही." 'कुणी तोंडदेखली अशी तुझी ऑर्डर देऊन तू आला नाही की आम्ही पुटपुटतो, "नानाचा चहा मागवलेला दिसतोय." आमच्या 'अमृतातेही पैजा' जिंकणाऱ्या भाषेतही तू भर घातलीयेस. तू नसलास तर 'चहाच्या पेल्यातले वादळ' हा वाक्‌प्रचार का झाला असता? लाच घेतानाही 'चहापाणी' या नावाखाली तुझा वापर सर्रास केला जातो. हुरळून जाऊ नकोस. त्यात तुझा काहीही संबंध नसतो. तुझं नाव वापरून केलेलं ते डील असतं. तू घरचाच ना, म्हणून तुझं नाव बिनधास्त वापरलं जातं.

भेट तुझी-माझी

तुझी माझी पहिली भेट कधी झाली ते मला आठवत नाही. पण नंतर आजतागायत कधी ताटातूट झाली नाही. अॅसिडिटी झाली तर गोळी घेतो, पण तुझी संगत मुळीच सोडत नाही. सुदैवाने लहानपणापासून 'चहानिषिद्ध' या संस्कृतीत मी वाढलो नाही. माझ्या वडिलांचा दिवसाकाठी १०-१५ कप चहा व्हायचा. घरी माणसांची वर्दळ प्रचंड असायची. त्यामुळे तुझं आधण कधी स्टोव्ह आणि नंतर गॅसवरून उतरलंच नाही. तू आलास की पाठोपाठ बिस्किटं येतात. बिस्किटाला काय किंवा पावाला काय, तुझ्यात न्हाऊ घातल्याशिवाय मला खाणं जमतच नाही. पाव तर अंघोळ घालून पिळूनच मग घशात उतरतो. मला एक मित्र नेहमी सांगतो, "अरे वेड्या, बिस्किट कुरकुरीत करण्यासाठी फार मोठा खर्च केला जातो आणि तू ते चहात बुडवून एका क्षणात लिबलिबीत करतोस?" आधी बिस्किट तोंडात टाकायचं आणि मग तुझा घोट घ्यायचा ही स्टाइल माझी नव्हे. तू बिस्किटाच्या अणुरेणूत शिरलास की बिस्किटाला वेगळीच चव येते.

तुझी सवय झाली की तू हळूहळू आमच्या रक्तात शिरतोस. मग तिथून तुला हुसकावणं कठीण असतं. हे जास्त तुझ्या कृष्णवर्णीय बहिणीबद्दल म्हणजे कॉफीबद्दल म्हटलं जातं. पण का कुणास ठाऊक ती आमच्या घरात कधी नांदलीच नाही. इंग्लड-अमेरिकेला गेल्यावर तिच्या वेगवेगळ्या रुपाची चव मी घेतो, नाही असं नाही. ती मनात रुतून राहणारी प्रेयसी नाही. ती कॅज्युअली भेटणारी मैत्रीण आहे. तुझी सवय सोडणं कठीण असतं. तुझी ओढ ठायीठायी वाटते. विचार करताना तू हवास. काही लिहित बसायचं? तू हवाच. हे पत्र लिहितानाही तू बाजूच्या पेल्यात वाफाळतोयस. थकून आलो. मनाला तरतरी आणायलाही तूच आणि पोटावर 'प्रेशर' आणायलाही तूच.

तूच खरा समाजवादी

आणि तुला हुसकवायचा प्रश्नच कुठे येतो? लहानपणी आम्हाला शिकवलं गेलं की तुझ्यात 'टॅनिन' नावाचं विष असतं म्हणून चहा जास्त पिऊ नये. शुद्ध वेडेपणा! अरे, विष कशात नाही? श्रीखंडात साखर असते. ती वाईट. मधुमेह होऊ शकतो. पापड तर तेलकट आणि खारट, थेट ब्लडप्रेशरचं हात पसरून स्वागत! मद्याचा लिव्हरवर प्रचंड राग. अरे, असा विचार केला ना, तर फक्त तुळशीचा रस आणि अळशीचा काढा घ्यावा लागेल. पण तुला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अलीकडे असा शोध लागलाय की तुझ्यात असा एक गुण आहे ज्यामुळे हृदयविकार सहसा जवळ येत नाही. किती बरं वाटलं मला. वाइन आणि तू या माझ्या सर्वात आवडत्या पेयांच्या कपाळावरचा डाग पुसला गेला.

तू खरा समाजवादी आहेस. मोठ्या बिझनेसमनपासून उघड्या अंगाच्या मेहनतकश कामगारापर्यंत कुणीही तुझा आस्वाद घेऊ शकतं. फक्त तुझा पोशाख बदलतो. पंचतारांकित हॉटेलात तुझं आगमन मौल्यवान नक्षीदार किटली आणि कपातून होतं.

कामगार, टपरीवरचा चहा तुटलेल्या कानाच्या कपातूनही पितो. तुला सांगतो, आम्हा मुंबईकरांच्या दुपारच्या सवयी उडप्याने आणि रात्रीच्या सवयी 'क्वार्टर सिस्टिम' आणि डान्सबारवाल्या शेट्टींनी बदलल्या. पण तुला आमच्यापासून कुणीही दूर घेऊन जाऊ शकलं नाही. अगदी उडप्याच्या दुकानातून येणारा कॉफीचा वाससुद्धा! आम्ही मुंबईकर चहा कधीही पितो. तो एकवेळ तीर्थप्रसाद नाकारेल. पण तुला नाकारणार नाही. मुंबईत माणसाला काहीही करायला जमलं नाही, तर तुझी टपरी टाकावी कुठल्याही नाक्यावर! ती चाललीच पाहिजे. धंदा नाही म्हणून टपरी बंद झाली, असं कधी घडलेलं नाही. अस्सल मुंबईकर तुझा आस्वाद घेताना 'कप कसे आहेत?', 'तुला काळकुट्ट फडक्यातून गाळलंय की गाळण्यातून?', 'भांड्यांना किती वर्ष कल्हई केलेली नाही?', 'कप नीट धुतले जातात की एका पाणी भरलेल्या बादलीत बुचकळले जाताहेत?' अशा क्षुद्र प्रश्नांचा विचार करीत नाही. त्याला दूधही कुठलंही चालतं. म्हशीचं, पावडरचं किंवा हायकिंगसाठी डोंगरमाथ्यावर गेल्यावर शेळींसुद्धा. त्याचा मतलब असतो, तो तुझ्या उकळत्या पावडरशी!

तुझे वेगवेगळे अवतार मी पाहिले आहेत. तुझा तो साहेबी, चिनी किंवा 'हिरवा' अवतार मला तितकासा आवडत नाही. तुझा साहेबी अवतार तर अतिनेमस्त. साहेबांच्या देशात तुला थंड करूनही पितात. ते काय कोंबडीसुद्धा थंड करून खातात. आपल्याला भाजी काय, वडे काय, भात-चपातीसुद्धा गरम लागते. आणि बऱ्याच गोष्टी गरम लागतात. पण अधिकची गरमागरमी न वाढवता इथेच थांबतो. तुला बर्फाळलेल्या अवस्थेत तर मी स्वीकारुच शकत नाही. तुझं खरं व्यक्तिमत्व घडवलं आम्ही मुंबईकरांनी. तुझ्यात तिघांनी क्रांती केली. पहिल्या म्हणजे, स्टेशनबाहेरच्या टपऱ्या, दुसरी सगळीकडे दिसणारी 'लक्ष्मी विलास हॉटेल्स; आणि तिसरी इराणी हॉटेल्स.

कोको टी, चॉकलेट टीपासून कुठलाही स्वाद असलेला 'टी' रेल्वे स्टेशनबाहेरच्या टपऱ्यात पहाटे तीनलाही मिळतो. अजून 'बियर टी' किंवा 'व्हिस्की टी' आलेला नाही. पण येईलही. अशक्य हा शब्द तुझ्या बाबतीत वापरता येत नाही. 'हॉटेल' हे तुझ्यावर आणि फार तर खारी- बिस्किटावर चालू शकतं, हे लक्ष्मी विलास हॉटेलांनी दाखवलं. आजही 'विलास' करण्याएवढी लक्ष्मी त्यांच्या खिशात पडत असावी. तुझी वेगवेगळी रूपं मी तिथे पाहिली आहेत. पण केशरी, उकाळा या भानगडीच वेगळ्या. तुझ्या एखाद्या रुपाला 'बासुंदी चहा' नाव का देत नाही ते कळत नाही. काही वेळी तो इतका दुधाळलेला आणि गोड असतो की बासुंदीत तुझी पावडर टाकल्यासारखी वाटते.

इराण्याकडचा पानी-कम

पण माझ्या तारुण्यात, भावविश्वाचा एक भाग बनलं होते ते इराण्याचं हॉटेल. बन मस्का किंवा ब्रून मस्का आणि तू त्या संगमरवरी चेहऱ्याच्या लाकडी टेबलावर आलास की 'पूर्णब्रह्म' म्हणजे काय ते कळायचे. तुझ्या सानिध्यात तिथे बसून तासनतास गप्पा व्हायच्या. कधी राजकारणावर, कधी नाटक सिनेमांवर, कधी क्रिकेटवर आणि पोरीबाळी हा तर हक्काचा विषय. भैरवीशिवाय मैफल संपत नाही तशी, त्या चहाशिवाय आमची मैफल संपायची नाही. 'सेनाभवना'समोरच्या इराण्यात बसून मी किती तरी लेख लिहिले आहेत. तो इराणी जाऊन 'चंद्रगुप्त' हे हायफाय हॉटेल आलं, तेव्हा माझ्या आठवणींच्या पुस्तकातील पानं कुणा धनदांडग्याने क्रूरपणे टरकावल्यासारखी वाटली. पण तुझ्यातला प्रामाणिक समाजवादी मी इराण्याकडेच अनुभवला. दोन कपात आम्ही चारजण सहज तास दोन तास बसायचो.

'पाचपानी' किंवा 'बारापानी' असं तुला कितीवेळा उकळलं गेलेय, हे सांगायचा प्रामाणिकपणाही मला इथेच पाहायला मिळाला. 'पाणी कम चहा' ही इथलीच आवृत्ती. त्यातून टपरीवर 'कटिंग'ची कल्पना फुलली असावी. पण तुला कपभर प्यायची गरज नाही इथे जाणवलं. तुझी 'कटिंग' किंवा 'पानी कम'ची किंमत ही पैशाची शेवटची किंमत दाखवते. त्याखाली एखादं चॉकलेट किंवा बडीशेपशिवाय काही मिळत नाही. इराण्यातलं 'पानी कम' हे तुझं मला सर्वात आवडणारं रूप. त्यात अंड्याचा बलक घालतात असं म्हटलं जायचं. ते कावळ्याचं अंडं असलं तरी चालेल मला, पण चव तीच हवी.

माझ्या समाजवादी मित्रा, हे कशाय पेया, तुझे कौतुक करायला माझी प्रतिभा करिश्माच्या ( ९०च्या दशकातली फटाकडी समजली जाणारी नटी) कपड्यांपेक्षाही तोकडी पडली. पण मध्यंतरी माझ्या एका मित्राने एका गावात भिंतीवर तुझ्याबद्दल लिहिलेल्या चार ओळी वाचल्या आणि मला सांगितल्या. तो कवी अनामिक असेल, पण जे मी लांबलचक पत्रातून सांगू शकलो नाही, ते त्याने चार ओळीत सांगितलं. तर एक तुझं कौतुक,

"चाय चतुर्भज कप नारायणा, वशी प्रभू की माया

फुक मारकर जो पिया वो, अडसठ तीर्थ नहाया"

तुझा,

द्वारकानाथ संझगिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus