Dailyhunt
तमाशा फडांवर आणि तमासगिरांवर हल्ले. "लाज धरा पावणं तुम्ही, जनाची मनाची.'' !

तमाशा फडांवर आणि तमासगिरांवर हल्ले. "लाज धरा पावणं तुम्ही, जनाची मनाची.'' !

प्रशांत पवार

  • क्षुल्लक कारणांवरून तमाशासम्राज्ञी आणि राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर हल्ला झाला आणि महिला कलावंतांनाही मारहाण करुन विनयभंग करण्यात आला.
  • तमाशा कलावंतांवर हल्ला होणं ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांच्या फडावर हल्ला झाला होता.

  • एकंदरीत लोकशाहीच्या उत्सवामध्ये राजकारण करणाऱ्यांची मानसिकता पाहता समाजव्यवस्थेचाच "तमाशा' झाला आहे.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर... एकेकाळी तमाशा क्षेत्रात दुमदुमलेले नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी नृत्यांगना. सावळा, परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा कोंदणात चमचमणाऱ्या विठाबाईंच्या जीवनचरित्राची भुरळ जनसामान्य रसिकांना पडणे तसे स्वाभाविकच. पुरुषांच्या जगात वावरलेल्या विठाबाई जिवंतपणीच दंतकथा बनल्या, म्हणूनच मायबाप प्रेक्षकांनी विठाबाईंना 'तमाशासम्राज्ञी' ही पदवी बहाल केली.

तर अशा या महान तमाशासम्राज्ञी आणि राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर बुधवारी नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरुडी पठार शिवारात हल्ला झाला आणि मारहाणही झाली, ज्यात काही तमाशा कलावंत जखमी झाले.

विठाबाई नारायणगावकर तमाशा फडावर हल्ला का झाला?

वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार व त्याच्या साथीदारांनी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर हल्ला करत मारहाण केली. महिला कलावंतांनाही मारहाण करुन विनयभंग करण्यात आला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या फडाचा संगमनेर तालुक्यात पोखरी बाळेश्वर येथे ३१ मार्चला कार्यक्रम होता. तो संपवून बुधवारी हे कलावंत तालुक्यातीलच माळेगाव पठार येथे कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होते.


महामार्गावर वरुडी पठार येथील एका पंपावर तमाशा कलावंतांची वाहने इंधन भरण्यासाठी थांबली होती. त्यानंतर पुढे महामार्गाला वाहने लागल्यानंतर एका दुचाकीस्वाराने तमाशा कलावंतांच्या वाहनाला कट मारला. त्यानंतर दुचाकीस्वाराने पुढे जाऊन दुचाकी आडवी लावत तमाशा कलावंतांच्या वाहनाच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा मिनिटात त्याने तेथे ५० ते ६० जणांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी मिळून संपूर्ण तमाशा कलावंतांना बेदम मारहाण केली. महिलांनाही मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. त्यांचा विनयभंग केला. तसेच मारहाण करणाऱ्यांनी काही रक्कम चोरून नेली, अशी माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी दिली.

"आताच आमच्यापुढे नाचा, नाहीतर फडच पेटवून देताे''

तमाशा कलावंतांवर हल्ला होणं ही काही पहिलीच घटना नाही. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय असा तमाशाचा फड... पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांचे जे दोन तमाशा फड आहेत त्यापैकी हा एक. आदर्श ग्रामपंचायत म्हणून बिरुद मिरवणाऱ्या साकूर या नाशिकजवळच्या गावात काही वर्षांपूर्वी घडलेली रात्रीच्या अंधारातली ही राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना... तमाशा नियोजित वेळेनुसार संपला होता.

कलावंत मेकअप उतरवत होते, नर्तकी कपडे बदलत होत्या तेवढ्यात काही मद्यधुंद गावगुंड राहुटीत शिरले आणि जोरजबरदस्ती करत "आताच आमच्यापुढे नाचा' असे दरडावायला त्यांनी सुरुवात केली. कलावंतिणींचा हात खेचत या गावगुंडांनी त्यांच्या कपड्यांना हात घातला... राहुटीतील पुरुष कलावंत मध्ये पडले तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत जोरदार मारहाण केली. एवढ्यावरही हे गावगुंड न थांबता ते महिलांचे हात, पाय, कपडे ओढत त्यांना बाहेर खेचतच हाेते. महिलांनी मदतीच्या याचनेसाठी आरडाओरड केली असता त्यांनी "आताच नाचा, नाहीतर फडच पेटवून देताे, एकेकाचा मुडदाच पाडताे' अशा धमक्या देत लाठ्याकाठ्या, राॅड दाखवले आणि पाेलिस येत असल्याची चाहूल लागताच तेथून पळ काढला.


अशीच घटना टाकळी, लोणार येथे हरिभाऊ बडेसह शिवकन्या कचरे यांच्या तमाशा फडातही घडली होती आणि त्या वेळी तर गावगुंडांच्या हल्ल्यात जवळपास १२ तमाशा कलावंत गंभीर जखमी झाले होते. अलीकडच्या काळात सातत्याने तमाशा कलावंतांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे याचीच ही काही उदाहरणे…

तमाशा फडांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी रघुवीर खेडकर यांनी अत्यंत उद्विग्नेपोटी ""रसिक मायबाप'... "सरकार मायबाप'... "पोटावर लाथ मारू नका'... तुम्हीच असं केलंत तर आम्ही कुठं जायचं... आम्ही पोटाने मारलेली माणसं, आम्ही तुमच्या गावात येऊन दांडगाई करू शकतो का, तुम्हीच असं केलंत तर मग आम्ही तमासगिरांनी जगायचं कसं?' अशी कळकळीची विनंती करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.

घटनेची ना कुठे चर्चा ना कुठे निषेधाचा सूर…

महाराष्ट्रातील नामांकित तमाशा फडांवर आणि तमासगिरांवर हल्ला होतो ही किती गंभीर घटना आहे... मात्र ठराविक वर्तुळ सोडले तर या घटनेची ना कुठे चर्चा ना कुठे निषेधाचा सूर. राज्याच्या प्रत्येक जत्रेत ज्यांच्या तमाशाला आजही हजारो रसिकांची गर्दी होते, कुठे आहेत ते शिट्या-टाळ्या वाजवणारे हजारो हात…? कुठे आहेत ते सिनेदिग्दर्शक-निर्माते ज्यांनी तमासगिरांच्या आयुष्यावर तमाशाप्रधान चित्रपट बनवून लाखो रुपये कमवले..? कुठे आहेत त्या पार्श्वगायिका ज्यांनी शेकडो लावण्या गाऊन लोकप्रियतेचे रेकॉर्ड ब्रेक केले…? कुठे आहेत ते संगीतकार ज्यांनी लावण्या रचून राष्ट्रीय पुरस्कार मिळवले…? कुठे आहेत ते इव्हेंट मॅनेजमेंटवाले ज्यांनी सातासमुद्रापार अभिजनांना घेऊन "सुंदरा मनामध्ये भरली'सारखे लावणीचे "शो' केले…? कुठे आहेत ते लोककलांचे अभ्यासक ज्यांनी तमाशा-लावणीवर पीएचडी करून, प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली…? कुठे आहेत ते कवी/कवयित्री ज्यांनी तमाशासम्राज्ञी विठाबाईच्या आयुष्यावर दीर्घ कविता लिहिल्या आणि कुठे आहेत ते राजकीय पुढारी जे चौफुल्यावर नित्यनियमाने "बैठकी'ला जायचे…?

विठाबाई नारायणगावकर आणि रघुवीर खेडकर यांच्या फडावर झालेला हल्ला आणि या फडात लोककलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा विनयभंग या घटना कोणत्या मानसिकतेतून घडतात याचा विचार केल्यास हा हल्ला कलाकारांच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला ठरत नाही का? फक्त लेखक-कवी-सिनेकलाकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाल्यानंतरच निषेधाची पत्रके आणि मोर्चा काढणार का? शासनावरचा दबाव वाढवण्यासाठी, हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जे जे काही सध्याच्या वातावरणात केले जात आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येत हे उपेक्षित लोककलावंत का बसत नाहीत? एकंदरीत लोकशाहीच्या उत्सवामध्ये राजकारण करणाऱ्यांची मानसिकता पाहता समाजव्यवस्थेचाच "तमाशा' झाला आहे.

आपल्याकडे "तथाकथित' उच्च जातींनी ज्या दुय्यम दर्जाच्या कला आहेत त्या समाजातल्या "तथाकथित' खालच्या जातींमध्ये वाटून आपल्या सांस्कृतिक आचरणात जातवर्चस्वाची झूल शाबूत राहील याची सतत दक्षता घेतली आहे. भारतीय जातिव्यवस्थेने सांस्कृतिक क्षेत्राला दिलेल्या वळणांकडे पाहिले असता कला क्षेत्रातले जातवास्तव अधिक ठळकपणे दिसते. साहित्य, चित्रपट, नाटक, चित्र, शिल्प अशा अनेक कलाप्रकारांवर काही ठराविक जातींचेच नेहमीच वर्चस्व राहिले आहे. ज्या कलेला प्रतिष्ठा आणि पैसा दोन्हीही आहेत त्या इथल्या उच्चभ्रू वर्गाने त्यांच्याच हातात ठेवल्या आणि ज्याला प्रतिष्ठाही नाही आणि पैसाही नाही त्या कलांना धर्म आणि जातीय व्यवस्थेशी जोडून सांस्कृतिक राजकारण करण्याचे उद्योग वर्षानुवर्षे कायम ठेवले. भारताच्या कोणत्याही भागात जा तिथले लोककलावंत हे खालच्या वर्गातलेच आढळतील.

लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद्गात्या असतील तर मग या लोककलांची सतत उपेक्षा का होत राहिली? लोककलांच्या अधोगतीचा दोष हे सरळसरळ इथल्या जातीय मानसिकतेला जातो. यूपी-बिहारमध्ये नौटंकी आणि बिरहा सादर करणाऱ्या कनिष्ठ जातीच्या नर्तकींना स्टेजवरच बाहुबलींकडून गोळ्या घालण्याचे जे काही प्रकार अलीकडच्या काळात घडले ते कशाचे लक्षण आहे. फक्त आणि फक्त जातीय मानसिकतेमधून घडत असलेल्या अशा घटनांमुळे आज अनेक "अनारकली ऑफ आरा'चे आयुष्य बरबाद झाले आहे.

तमाशाचाच विचार करायचा झाला तर तिथेही जातीची उतरंड आहेच. लावणी सादर करणाऱ्या नर्तकी, कलाकार, वादक हे सगळे लोककलावंत दलित किवा भटके विमुक्त परंतु त्यांचे फडमालक, कलावंतांना कर्जाच्या विळख्यात अडकवणारे सावकार, तमाशाची सुपारी फोडणारे सरपंच, गावजत्रेचे राजकीय पुढारी आणि तमाशात फेटा उडवणारे रसिक मायबाप हे सगळेच उच्चजातीय... तमाशा फडांवर हल्ले करणारे, राहुटी जाळून टाकणारे, लावणी नर्तकींचे विनयभंग करणारे कोण आहेत हे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येईल की ही तीच पुरुषवादी, सामंती वर्चस्ववादी, जातवर्चस्ववादी मंडळी आहेत ज्यांनी "दलित आणि स्त्री' असे दुहेरी शोषणाचे प्रतीक बनवून टाकले आहे.


आज महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या पन्नासएक तमाशा फडांपैकी एकही तमाशा फड फायद्यात नाही. बहुतांशी फड सावकारी कर्जापोटी सावकाराकडे गहाण आहेत किंवा कर्ज देणाऱ्या पतसंस्थांकडे थकीत म्हणून तगाद्यात आहेत. शासनाकडून मिळालेल्या अनुदानात सीझनपुरतेच लहान-लहान फड उभे राहतात. शेवटी शंभर-दीडशे लोकांचा संसार घेऊन फिरणे सोपे नाही. त्यांचे खाणे, राहणे, बिदागी, गाड्या, डिझेल, मजूर अशा अनेक गोष्टींपायी हा व्यवसाय मालकांच्या आणि कलावंतांच्या दृष्टीनेही अडचणीचा झाला आहे...

ही इतकी परवड असली तरीही लोकाश्रयाशिवाय तमाशा उभाच राहू शकणार नाही. रघुवीर खेडकर म्हणतात, "तमाशा बिघडलेला वा बदललेला नाही तर तुम्ही बदललाय, तुमची अभिरुची, नजर व नियत बदलली आहे.

''ज्या छत्रपती शिवरायांच्या काळात लोककलावंतांना राजाश्रय मिळत होता, ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत इथल्या लोकशाहिरांचा खूप मोठा वाटा होता, ज्या शाहिरांनी महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचे काम केले, त्यांच्यावर हल्ले होणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. तमाशाच्या कलाकारांना पूर्वी धन कमी होते पण मान जास्त होता. तमाशाच्या माध्यमातून लोक मनोरंजनातून प्रबोधन, संस्कृती, समाजपरिवर्तन, लोकशिक्षण, लोकशाही, समता, समानता अनेकदा प्राप्त झाली आहे.

परिवर्तनाच्या आणि जागतिकीकरणाच्या आजच्या काळात तमाशा रसिकांची मानसिकता बदलली. गण,गौळण, बतावणी, वगाऐवजी आता फक्त चित्रपटातील गाणी, गीते, नृत्य सादर झाली पाहिजे याकडे कल असतो. आता गावातील कार्यकर्ता तरुण आहे. त्याला राजकीय वरदहस्त आहे. किंबहुना तो आता यूपी-बिहारप्रमाणे इथला बाहुबली झालाय. तो जे सांगेल तेच झाले पाहिजे, तसे न झाल्यास तमाशा बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल असते. तमाशा कलावंत एकवेळ आर्थिक संकट सहन करू शकेल परंतु तमाशावर होणारे हल्ले तो कधीच सहन करू शकणार नाही.


आपली पुरुषसत्ताक सरंजामी आणि तेवढीच रूढींच्या गुलामी बेड्यांमधील धार्मिक व्यवस्था इथल्या लोककलावंतांना जळवेसारखी पिळणारी आहे. इथे फक्त कलावंतिणीचे दु:ख नसतं, तर एका स्त्रीचे दु:ख, व्यवस्थने लादलेले दु:ख, असे दु:खाचे अनेक पदर आहेत. एखादी फडावर नाचणारी तमासगिरीण आणि आजच्या उच्चभ्रू वर्गजातीमधील नृत्यांगना यात फरक करताना विठाबाई म्हणायची, 'तुम्ही सगळ्याच जणी म्हटलं तर माझ्यासारखेच वागता, पण तुम्ही तमासगिरीण नाही.' आणि ते खरे आहे. तमासगिरिणीला कशी मिळणार इज्जत, प्रतिष्ठा अन् सामाजिक सन्मान. कारण लोककलावंत असतात जन्मतःच अपमानित जातींचे. नाचणे हा त्यांचा शौक स्वांत आनंद नसतो तर पर्याय नसलेली एक मजबुरी असते. रूढीने लादलेली एक बळजबरी असते.

कवी महादेव गोरख कांबळे यांनी "वेदनांकित घुंगरांचे संदर्भ' हा त्यांचा कवितासंग्रह विठाबाईला केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे. त्यांच्याच ओळीत सांगायचे झाले तर,

संस्कृतीचे पारंपरिक शल्य गोल गोल फिरले

आणि भाजून घेतले स्वत:ला भाकरीचे रूप देऊन'

हेच तमाशाचे कटू वास्तव आहे आणि जेव्हा तमाशाचा "रसिक मायबाप' घुंगराच्या या वेदनेशी एकरूप होईल तेव्हाच त्यांना "आयुष्याचा तमाशा' बनवून इतरांचे मनोरंजन करणाऱ्या या लोककलावंतांचा एकमेव धर्म समजून घेता येईल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus