राजश्री कुटे
- चकचकीत मॉलमधल्या झगमगत्या दिव्यांच्या रांगा, सुगंधी हवा, लखलखीत फरशी आणि आरशासारखी स्वच्छ स्वच्छतागृहं, पण त्या आरशात कधीच दिसत नाहीत अशा स्त्रिया, ज्यांच्या हातांवर या सगळ्या स्वच्छतेची जबाबदारी असते.
- या झगमगाटाच्या पडद्यामागे काही हात अखंड काम करत असतात. असे हात, जे कुणाच्या नजरेत भरत नाहीत, पण त्यांच्याशिवाय हा सारा देखावा एका दिवसासाठीही टिकू शकत नाही.
- छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित मॉलमध्ये काम करणाऱ्या अंकिता ताई (नाव बदलले आहे) यांच्या अनुभवातून हा ग्राउंड रिपोर्ट महिला स्वच्छताकर्मचाऱ्यांच्या श्रमाचं, कमी पगाराचं, प्रदीर्घ कामाच्या तासांचं, बसण्यासाठी साधी जागाही नसलेल्या कामाच्या परिस्थितीचं आणि नोकरीसोबतच घराची जबाबदारी पेलणाऱ्या त्यांच्या दुहेरी संघर्षाचं वास्तव उलगडतो.
प्रत्येक शहरात एखादा तरी चकचकीत मॉल असतो. दररोज शेकडो नव्हे, हजारो कहाण्या या मॉलमध्ये कळत-नकळत घडत असतात. काचेच्या चकचकीत दरवाजातून एक आई आपल्या मुलीचा हात धरून चित्रपट पाहण्यासाठी आत शिरते. एक तरुण आपल्या प्रेयसीच्या खरेदीच्या पिशव्या हसतहसत सांभाळत तिच्या मागेमागे फिरत असतो. लहान मुलांचा वेळ 'कीड्स झोन'मध्ये कसा निघून जातो ते त्यांनाच कळत नाही. कॉलेजमधले मित्रमैत्रिणी 'फूड कोर्ट'मध्ये आवडत्या पदार्थांवर गप्पांचा फड रंगवतात. नामांकित ब्रँडची दुकाने, आकर्षक सजावट, लखलखीत फरशी, स्वच्छ परिसर, आरामदायी बसण्याच्या जागा आणि सेल्फी पॉइंट्स… या सगळ्यामुळे मॉल हा केवळ खरेदीचा नाही, तर आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनला आहे.
झगमगत्या दिव्यांच्या रांगा, सुगंधी हवा, चकचकीत फरशी आणि आरशासारखी स्वच्छ स्वच्छतागृहं, पण त्या आरशात कधीच दिसत नाहीत अशा स्त्रिया, ज्यांच्या हातांवर या सगळ्या स्वच्छतेची जबाबदारी असते. या झगमगाटाच्या पडद्यामागे काही हात अखंड काम करत असतात. असे हात, जे कुणाच्या नजरेत भरत नाहीत, पण त्यांच्याशिवाय हा सारा देखावा एका दिवसासाठीही टिकू शकत नाही.
पार्किंगपासून ते मॉलच्या लांबलचक कॉरिडॉरपर्यंत आणि तिथून स्वच्छतागृहांपर्यंत हजारो पावलांचे ठसे, सांडलेले डाग आणि लोकांनी मागे सोडलेला प्रत्येक कचरा शांतपणे साफ करणारी माणसं तिथे असतात. त्यात काही महिला अशाही आहेत, ज्यांचा संपूर्ण दिवस याच मॉलमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जातो. इतरांनी मागे सोडलेली घाण साफ करणं, स्वच्छता टिकवून ठेवणं आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करून देणं, हेच त्यांचं रोजचं काम…
छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित मॉलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अंकिता ताईंच्या (नाव बदलले आहे) अनुभवातून अशा अनेक महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या जगण्याचा हा मागोवा आहे.

पहाटेपासून सुरू होणारी धावपळ
अंकिता ताईंच्या कुटुंबात शाळेत शिकणारा मुलगा, लग्न झालेली मुलगी आणि वेगळे राहणारे पती आहेत. घराचा आर्थिक भार जवळपास त्यांच्याच खांद्यावर आहे. "घर चालवायचं असेल तर काम करणं भाग आहे," त्या शांतपणे सांगतात.
त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता होते. उठल्यावर स्वतःची आवराआवर, घराची साफसफाई, स्वतःसाठी आणि मुलासाठी डबा बनवणं, घरातील इतर कामं उरकणं... ही सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडता येत नाही. स्वतःचं वाहन नसल्याने दररोज जवळपास चार किलोमीटरचा प्रवास त्या रिक्षाने करून मॉलपर्यंत पोहोचतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर त्या गणवेश चढवतात आणि कामाला सुरुवात होते.
"कधी दुपारी एक ते रात्री दहा, तर कधी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच अशी शिफ्ट असते. ज्या दिवशी जी शिफ्ट मिळेल, त्यानुसार घर आणि नोकरी यांचा मेळ घालावा लागतो," त्या सांगतात.
अंकिता ताईंना आठवड्याची सुट्टी शुक्रवारी मिळते. इतर महिला स्वच्छताकर्मचाऱ्यांनाही वेगवेगळ्या आठवड्याच्या दिवशी सुट्टी दिली जाते. मात्र शनिवार आणि रविवार हा पर्याय त्यांच्या आयुष्यात नसतो. कारण हेच दिवस मॉलमध्ये सर्वाधिक गर्दीचे असतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, खरेदीसाठी, चित्रपट पाहण्यासाठी किंवा विरंगुळ्यासाठी हजारो लोक मॉलमध्ये येतात. पण ज्या दिवशी इतरांसाठी सुट्टी आणि आनंदाचा दिवस असतो, त्याच दिवशी या महिलांसाठी कामाचा सर्वाधिक ताण असतो. इतरांचे विकेंड हसण्यात आणि आरामात जातात; त्यांचे विकेंड मात्र सततच्या साफसफाईत, धावपळीत आणि न संपणाऱ्या कामाच्या ओझ्यात जातात.
दुपारची किंवा संध्याकाळची शिफ्ट असली की अंकिता ताईंसाठी स्वतःचा असा वेळ उरतच नाही. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास त्या घरी पोहोचतात. पण घरी पोहोचलं म्हणजे दिवस संपतो, असं त्यांच्या बाबतीत कधीच घडत नाही.
"माझा मुलगा माझी वाट पाहत असतो. घरी गेल्यावर आधी आमच्या दोघांसाठी स्वयंपाक करते. मग जेवण होतं. सगळी आवराआवर करून अंथरुणावर पडते, तेव्हा रात्रीचा एक वाजलेला असतो," त्या सांगतात.
डोळे मिटून काही तासही उलटत नाहीत, तोच पुन्हा सकाळचे सहा वाजतात... आणि त्याच धावपळीला पुन्हा सुरुवात होते. घर आणि नोकरी या दोन टोकांमध्ये स्वतःसाठी क्षणभरही उसंत न मिळणारे हे चक्र दिवसागणिक अविरत सुरूच राहते.
स्वच्छतागृहाच्या आत, कधीही न थांबणारं काम…
मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छतागृह म्हणजे काही मिनिटांचा थांबा. गरज संपली की ते पुन्हा खरेदी, चित्रपट किंवा खाद्यपदार्थांच्या दुनियेत रमून जातात. पण अंकिता ताईंसाठी हेच स्वच्छतागृह म्हणजे संपूर्ण दिवसाचं कार्यक्षेत्र आहे.
"आम्ही आत गेल्यावर सर्वप्रथम प्रत्येक 'कमोड' केमिकल्सचा वापर करून स्वच्छ करतो. त्यानंतर वॉश बेसिन, लॉबी आणि मग एक-एक करून प्रत्येक टॉयलेट साफ करावं लागतं," त्या सांगतात.
'बाईमाणूस'च्या प्रतिनिधीने मॉलला जेव्हा भेट दिली तेव्हा पहिल्या मजल्यावरील महिलांच्या स्वच्छतागृहात तब्बल ३२ ते ३५ टॉयलेट क्युबिकल्स असल्याचे दिसून आले. तळमजल्यावरही जवळपास तितकीच संख्या होती. ही प्रत्येक क्युबिकल दिवसातून अनेक वेळा स्वच्छ करावी लागते. गर्दी वाढेल तसं साफसफाईचं चक्रही अधिक वेगाने फिरत राहतं.
दिवसभर पाण्याने भरलेल्या जड बादल्या, मॉप आणि स्वच्छतेचं साहित्य हातात घेऊन या महिला एका स्वच्छतागृहातून दुसऱ्यात सतत फिरत असतात. कचरापेट्या वेळोवेळी रिकाम्या कराव्या लागतात. सकाळच्या शिफ्टमध्ये असणाऱ्या महिलांवर स्वच्छतागृहांपुरतंच नव्हे, तर बाहेरील लॉबी आणि इतर भागातील हाऊसकीपिंगची जबाबदारीही असते.
या कामात क्षणभरही निवांतपणा नसतो. एखादं स्वच्छतागृह साफ करून बाहेर पडायचं, तोपर्यंत दुसरं वापरलं गेलेलं असतं. त्यामुळे दिवस संपेपर्यंत स्वच्छता राखण्याची ही अखंड धावपळ सुरूच असते.
दहा मिनिटांची उसंत... आणि पुन्हा कामाला सुरुवात
दिवसभराच्या या धावपळीत त्यांना फक्त दहा मिनिटांचा चहाचा ब्रेक आणि जेवणासाठी थोडा वेळ मिळतो.
"डबा आम्ही घरूनच आणतो. जेवण्यासाठी कँटीनमध्ये खाली जावं लागतं. चहाही एजन्सीकडून दिला जात नाही," अंकिता ताई सांगतात.
या दोन छोट्या विश्रांतीच्या वेळा वगळता त्यांना त्यांच्या कामाच्या जागेबाहेर जाण्याची परवानगी नसते. दिवसाचा बहुतांश वेळ स्वच्छतागृहाच्या परिसरातच उभं राहून काम करण्यात जातो. पण त्यांचं काम केवळ फरशी पुसणं किंवा 'कमोड' स्वच्छ करणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही.
दररोज शेकडो लोक ही स्वच्छतागृहं वापरतात. लहान मुलांना घेऊन आलेल्या काही पालकांच्या मुलांकडून 'कमोड'ऐवजी बाहेरच लघवी किंवा शौच होतं. काही महिला वापरलेले सॅनिटरी पॅड त्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत न टाकता कमोडजवळच टाकून जातात. काही वेळा उलटी किंवा इतर प्रकारची घाणही तशीच पडून राहते. अशा प्रत्येक वेळी पुन्हा या महिलाच हातात मॉप, निर्जंतुकीकरणाची द्रव्यं आणि हातमोजे घेऊन पुढे सरसावतात. कुणीही पुढचा ग्राहक आत येण्यापूर्वी स्वच्छतागृह पुन्हा पूर्ववत स्वच्छ आणि वापरण्यायोग्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते.
मॉलमध्ये आलेल्या बहुतेकांना ही स्वच्छता गृहीत वाटते. मात्र त्या स्वच्छतेच्या प्रत्येक थराखाली या महिलांचे न दिसणारे श्रम, संयम आणि रोजच्या रोज स्वतःला विसरून केलेलं काम दडलेलं असतं.
स्वच्छतागृहात बसायला परवानगी नाही...
या सगळ्या कामादरम्यान एक प्रश्न सतत मनात येत राहतो तो म्हणजे दिवसभर उभं राहून काम करणाऱ्या या महिलांना बसण्यासाठी साधी खुर्ची तरी आहे का?
अंकिता ताईंचं उत्तर नकारार्थी असतं.
"स्वच्छतागृहात आमच्यासाठी खुर्ची किंवा स्टूल काहीच नाही. मॅनेजर सतत फेऱ्या मारत असतात. आम्ही काम करतोय की नाही, यावर त्यांची नजर असते. त्यामुळे खूप थकलो तर दोन मिनिटं खालीच जमिनीवर बसतो. पण कुणी येताना दिसलं की लगेच उठावं लागतं," त्या सांगतात.
अंकिता ताईंच्या मते, कामगारांनी कामाच्या वेळेत बसू नये, यासाठीच जाणीवपूर्वक खुर्च्या किंवा स्टूल ठेवले जात नाहीत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, मॉलमधील बहुतांश भागांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते.
"दोन मिनिटांसाठी बाहेर उभं राहायलाही भीती वाटते. मॅनेजरने पाहिलं की लगेच तक्रार होते," त्या म्हणतात.
आठ-नऊ तास सतत उभं राहणं, वारंवार वाकून 'कमोड' आणि फरशी घासणं, जड पाण्याच्या बादल्या उचलणं, एका स्वच्छतागृहातून दुसऱ्यात सतत धावपळ करणं... या सगळ्याचा परिणाम दिवसअखेरीस त्यांच्या शरीरावर स्पष्ट दिसून येतो. शिफ्ट संपेपर्यंत अनेक महिलांचे पाय, पाठ आणि कंबर अक्षरशः थकून गेलेली असते. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी काही मिनिटांचा आराम सहज उपलब्ध असतो, पण दिवसभर त्यांच्यासाठी स्वच्छता राखणाऱ्या या महिलांना थोडावेळ बसण्यासाठीही जागा नसणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीबद्दल अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करते.
आरोग्य, पगार आणि जगण्याची किंमत
दिवसभराच्या या कष्टाच्या मोबदल्यात अंकिता ताईंना महिन्याला १२,५०० रुपये पगार मिळतो. त्यांच्या मते, एखाद्या दिवशी रजा घेतली तर जवळपास ५०० रुपये पगारातून कापले जातात.
"दिवसभर उभं राहून काम केल्यावर हात, पाय आणि कंबर इतकी दुखते की नीट बसवतही नाही. पण घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करावाच लागतो," त्या सांगतात.
क्षणभर थांबत त्या पुढे म्हणतात, "माझं आयुष्य खूप कठीण आहे... खूप कठीण. मी फक्त वरून हसतमुख दिसते, एवढंच."
हे वाक्य उच्चारताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यांमधला थकवा यांच्यातला विरोधाभास सहज जाणवून जातो.
अंकिता ताई सांगतात की, एजन्सीकडून हातमोजे दिले जातात आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदतीचीही व्यवस्था आहे. मात्र 'बाईमाणूस'च्या प्रतिनिधीने मॉलला भेट दिली तेव्हा स्वच्छतागृह साफ करताना एकाही महिला कर्मचाऱ्याच्या हातात हातमोजे किंवा चेहऱ्यावर मास्क दिसला नाही.
दिवसभर स्वच्छतागृहात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा वास, निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाणारी द्रव्ये आणि सतत बंदिस्त जागेत राहण्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत असल्याचं त्या सांगतात.
"आतमध्ये कधी कधी इतकं गुदमरल्यासारखं होतं की श्वास घ्यायलाही त्रास होतो. उन्हाळ्यात तर परिस्थिती अजूनच वाईट असते. पावसाळ्यातसुद्धा काम करताना अंगातून सतत घाम वाहत असतो," त्या सांगतात.
स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या महिलांना रोज केवळ घाणच नाही, तर रसायनांचा तीव्र वास, शारीरिक थकवा आणि अपुऱ्या सुरक्षासाधनांचाही सामना करावा लागतो. मॉलमध्ये येणाऱ्या लोकांना या श्रमांची जाणीवही नसते; पण त्या मात्र आपल्या आरोग्याची किंमत मोजत ही स्वच्छता टिकवून ठेवत असतात.

"माझं स्वप्न पोलीस अधिकारी होण्याचं होतं..."
संवाद पुढे सरकत असताना अंकिता ताई अचानक त्यांच्या भूतकाळात हरवून जातात. आयुष्याने त्यांच्यासाठी एक वेगळंच स्वप्न पाहिलं होतं, पण वास्तवाने त्याची दिशा बदलून टाकली.
"माझं स्वप्न पोलीस अधिकारी होण्याचं होतं. पण आई लवकर गेली... आणि त्यानंतर शिक्षणच पुढे सुरू ठेवता आलं नाही," त्या सांगतात.
हे बोलताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. क्षणभर शांत राहून त्या पुढे म्हणतात, "इतरांची घाण, शौचालय साफ करताना कधी कधी स्वतःचाच तिटकारा येतो. पण काय करणार? ही माझी मजबुरी आहे."
त्यांच्या या एका वाक्यात आर्थिक गरज, अपूर्ण राहिलेली स्वप्नं आणि परिस्थितीपुढे केलेली तडजोड सगळंच सामावलेलं आहे. कामाच्या अडचणींबद्दल व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही फारसा फरक पडत नसल्याचं त्या सांगतात.
"आम्ही काही सांगितलं तर सरळ उत्तर मिळतं, 'काम करायचं नसेल तर घरी बसा.'"
म्हणूनच या महिला आपल्या कामात शक्य तितकी चूक होऊ नये, याची सतत काळजी घेतात.
"एखादा छोटासा डाग जरी राहिला, तरी ग्राहक वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करतात. त्यामुळे कुणालाही तक्रार करायची संधी मिळू नये, यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो."
त्यांच्या कामाचं कौतुक क्वचितच होतं; पण एखादी छोटीशी उणीव मात्र लगेच नजरेत भरते. म्हणूनच दिवसाचा प्रत्येक क्षण त्या सावधपणे, जबाबदारीने आणि न दिसणाऱ्या ताणाखाली घालवत असतात.
अदृश्य श्रमांचा चेहरा
अंकिता ताईंची ही कहाणी केवळ एका महिलेची नाही. मॉलमधील स्वच्छतागृहांमध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांचं आयुष्य याच धाग्यांनी विणलेलं आहे. यांच्यापैकी अनेक जणी आपल्या कुटुंबाच्या एकमेव कमावत्या आहेत. दिवसाचा मोठा भाग शारीरिकदृष्ट्या अत्यंत कष्टाच्या कामात जातो. शिफ्ट संपल्यानंतरही त्यांची जबाबदारी संपत नाही. घरी परतल्यावर स्वयंपाक, घराची कामं, मुलांची काळजी आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांची वाट पाहत असते. शरीर थकून भागलं असलं, वेदना असह्य होत असल्या, तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच कामासाठी उभं राहणं त्यांच्या आयुष्याचा भाग बनून जातं.
प्रत्येक शनिवार-रविवारी हजारो कुटुंबं काही तास विरंगुळा मिळावा, आठवड्याचा ताण हलका व्हावा म्हणून मॉलमध्ये येतात. पण या महिलांसाठी विकेंडचा अर्थ अगदी वेगळा असतो. त्यांच्यासाठी तो असतो अधिक गर्दी, अधिक स्वच्छतागृहं, अधिक घाण, अधिक जड बादल्या, अधिक धावपळ आणि दिवसअखेर अधिक दुखणारं शरीर. मॉलमध्ये आलेल्या लोकांच्या नजरेत चकचकीत फरशी, डागरहित आरसे, सुगंधी आणि स्वच्छ स्वच्छतागृहं भरतात. पण ती स्वच्छता शक्य करून देणाऱ्या महिला क्वचितच कुणाच्या नजरेत भरतात.
त्यांचं काम दिसतं; पण त्या दिसत नाहीत.
कदाचित म्हणूनच या महिलांच्या कहाण्या केवळ स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कथा नाहीत. त्या आपल्या समाजातील अशा अदृश्य श्रमांच्या कथा आहेत, ज्यांच्या बळावर आपलं दैनंदिन आयुष्य अधिक स्वच्छ, अधिक सुसह्य आणि अधिक आरामदायी बनतं. मात्र त्या श्रमांना मिळणारा सन्मान, सुरक्षितता आणि मानवी प्रतिष्ठा यांविषयीचे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या मॉलमधील स्वच्छ, सुगंधी स्वच्छतागृहातून बाहेर पडाल, तेव्हा क्षणभर थांबून आजूबाजूला पाहा. कदाचित हातात मॉप, पाण्याची बादली आणि थकलेलं हसू घेऊन एखादी महिला तुमच्या नजरेसमोरून जाईल. त्या दिवशी तिच्याकडे फक्त एकदा पाहा. कारण त्या स्वच्छतागृहात तिच्या श्रमांचा वास नसतो, पण तिचं आयुष्य मात्र तिथेच अडकलेलं असतं.

