Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाघिणीच्या हल्ल्यातील सर्वात मोठी घटना; चंद्रपूरमध्ये चार महिलांचा मृत्यू

वाघिणीच्या हल्ल्यातील सर्वात मोठी घटना; चंद्रपूरमध्ये चार महिलांचा मृत्यू

टीम बाईमाणूस

  • चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या सात महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केल्याने चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
  • मृतांमध्ये एका घरातील दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून, एका महिलेवर दोन लहान मुलींची जबाबदारी होती, तर दुसरी महिला अपंग पतीमुळे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
  • पोटासाठी जंगलात गेलेल्या या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सिंदेवाही तालुक्यात भीती, हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही भागात पहाट अजून पूर्ण उजाडलीही नव्हती. अश्यातच सिंदेवाही मधल्या सात महिला जंगलाच्या वाटेला निघाल्या होत्या. पोटासाठी, दोन वेळच्या भाकरीसाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी या महिला रोजप्रमाणे तेंदूपत्ता वेचायला गुंजेवाहीच्या जंगलात गेल्या, पण त्या परतल्याच नाहीत. काही क्षणांतच जंगलात किंचाळ्या घुमल्या, धावपळ उडाली आणि वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलांपैकी एक महिला विधवा होती आणि तिच्या दोन लहान मुलींची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. दुसऱ्या एका महिलेचा नवरा अपंग असल्याने घर चालवण्याचा सगळा भार ती एकटीच पेलत होती. तर मृतांमध्ये एका घरातील दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश होता. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी ग्रामीण जीवनाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय.


नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात ही घटना घडली. सात महिलांचा गट तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेला होता. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असतानाच वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरून सैरावैरा पळू लागल्या. काही महिलांनी आरडाओरडा करत जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघिणीने चार महिलांवर झडप घातली. या हल्ल्यात कवडूबाई मोहुर्ले (४५), अनुबाई मोहुर्ले (४६), संगीता चौधरी (३६) आणि सुनीता मोहुर्ले (३३) यांचा जागीच मृत्यू झाला.

वाघिणीचा हल्ला इतका भयंकर आणि वेगवान होता की, एकापाठोपाठ एक अशा चारही महिलांवर झडप घातली. कुणाच्या मानेचा लचका तोडला तर कुणाच्या गळ्यावर थेट हल्ला केला. या भीषण हल्ल्यात कवडूबाई मोहुर्ले (४५), अनुबाई मोहुर्ले (४६), संगीता चौधरी (३६) आणि सुनीता मोहुर्ले (३३) या चारही जणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं गावकऱ्यांना दिसलं. घटना कळल्यानंतर गावकऱ्यांनी दांडके, काठ्या आणि कोयते घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाले खरे मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाने चार महिलांचा जीव घेतला होता. एकीच्या मानेवर खोलवर त्याचा पंजा लागल्याने ती रक्तबंबाळ होऊन पडलेली होती. रक्तस्राव जास्त झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. बाकीच्या तीन महिला देखील रक्ताच्या थारोळ्यात होत्या. त्यांच्या अंगावर वाघाच्या नखांचे दातांचे ओरखडे खोलवर उठलेले स्पष्टपणे दिसत होते.

"काम केल्याशिवाय पोट भरत नाही" : गुंजेवाहीतील वाघ हल्ल्यानंतर मनोज गोवर्धन यांची व्यथा

४ महिलांवर वाघिणीने हल्ला केला ही माहिती आल्यानंतर १३ महिला जंगलात गेल्या होत्या अश्या प्रकारचे वृत्त आले होते मात्र गुंजेवाही मधील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी मनोज गोवर्धन यांनी सांगितले की सात महिला जंगलात गेल्या होत्या.

बाईमाणूसशी बोलतांना त्यांनी सांगितले, "सात महिलांचा गट जंगलात गेला होता. त्यापैकी ४ महिलांना वाघिणीचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि बाकी तिघी जणी मागे फिरल्या. मात्र उरलेल्या चार महिलांवर वाघिणीने हल्ला चढवला. या घटनेत महिलांचा मृत्यू झाला असून पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण झाली. यापूर्वीही एप्रिल महिन्यात अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. एक महिला शेतात काम करत असताना, तर दुसरी मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेली असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती. वनविभागाकडून सूचना दिल्या जातात मात्र रोजगाराच्या अभावामुळे आणि तेंदूपत्ता हंगामामुळे लोकांना जंगलात जाणे गरजेचे ठरते. मृत महिलांपैकी एक विधवा होती, तिला दोन मुली आहेत. एका महिलेचा नवरा अपंग असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार महिलेवर होता. लोकांना माहिती आहे की, जंगलात वन्यप्राणी आपल्यावर कधी ही हल्ला करू शकतात. पण काम केल्याशिवाय पोट भरत नाही ना. रोजगार हमीचे कामही गावातील सगळ्याच लोकांना थोडी भेटतं, त्यामुळे जीवाची पर्वा न करता गावातली लोक जंगलात तेंदू पत्ता वेचायला जातात.


घटनेनंतर या महिलांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून गावकऱ्यांनी काही काळ मृतदेह उचलू दिले नव्हते, मात्र पोलिसांकडून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे गावकऱ्यांना अखेर मृतदेह उचलावेच लागले."

चार महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांचा संताप; वन विभागाला जाब

वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्या. सोबत असलेल्या इतर तीन महिलांनी प्रचंड प्रसंगावधान राखून तिथून जीवाच्या आकांताने पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या. चार महिलांचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. "रोज आमची माणसं मरतायत, वन विभाग फक्त पंचनामे करणार का?" असा आक्रमक सवाल करत गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना विचारला. सध्या गावकऱ्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष गंभीर स्वरूपात वाढला असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत सुमारे ४१ ते ४७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश मृत्यू वाघांच्या हल्ल्यांमुळे झाले आहेत. शेतात काम करणारे शेतकरी, जनावरे चारणारे नागरिक तसेच जंगलालगत राहणारे लोक हे सर्वाधिक बळी ठरत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसर आणि सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी यांसारख्या भागांत अशा घटना सातत्याने घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणआहे. वन विभागाकडून गस्त वाढवणे, नुकसानभरपाई देणे आणि जनजागृती मोहीम राबवली जात असली तरी वाढती वाघसंख्या आणि मानवी वसाहती जंगलाजवळ वाढल्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी गेला होता 3 महिलांचा बळी

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात गेल्या वर्षी घडलेल्या अशाच एका भयंकर घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. गतवर्षी ठीक १० मे रोजी याच तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाने असाच हल्ला केला होता, ज्यामध्ये ३ महिलांचा बळी गेला होता. त्या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही तोच, आता थेट ४ महिलांचा एकाच वेळी बळी गेला आहे.

दुसरीकडे, वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी 4 महिलांचा बळी गेल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित भागातील गस्तही वाढवण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातात. सुरक्षेसाठी काही महिला घोळका करून जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जातात. मात्र तरीही त्यांच्यावर वाघांच्या हल्ल्यांची भीती कायम असते. अशा वेळी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चंद्रपूरच्या गुंजेवाही जंगलातील या घटनेने पुन्हा एकदा विकास, रोजगार आणि वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नाकडे राज्याचं लक्ष वेधलं आहे. चार महिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात शोककळा पसरली असून भीतीचं वातावरण कायम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus