Dailyhunt
"ये अदालत 'अब्दुल वाहिद शेख' को बा इज्जत बरी करती है."  मग त्या 9 वर्षांच्या तुरुंगवासाचा हिशोब कोण देणार, अब्दुलचा सवाल!

"ये अदालत 'अब्दुल वाहिद शेख' को बा इज्जत बरी करती है." मग त्या 9 वर्षांच्या तुरुंगवासाचा हिशोब कोण देणार, अब्दुलचा सवाल!

  • संजना खंडारे
  • २००६ साली झालेल्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील आरोपींची गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता २००६ मध्येच मालेगावमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.
  • दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
  • या निमित्ताने 'बाईमाणूस' एक अशी कहाणी घेऊन येत आहे, ज्याच्यावर मोका, पोटा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, ९ वर्ष त्याला तुरुंगात सडावं लागतं आणि अखेर न्यायालय त्याची निर्दोष मुक्तता करते.
  • अब्दुल वाहिद शेख हा आता त्या नऊ वर्षांचा हिशोब मागतोय, एकाबाजूला त्याने आपली PhD पूर्ण केलीये तर दुसऱ्या बाजूला निर्दोष असलेल्या पण तुरुंगात अडकलेल्या लोकांसाठी "Innocent Network" ही मोहीम सुरू केलीये…

मेरी प्यारी तब्बू,

अस्सलामु अलैकुम।

मैं आर्थर रोड जेल में 9 साल से क़ैदी हूँ और अब 2015 के एंड में अपने केस के जजमेंट का वेट कर रहा हूं ... न जाने कब फ़ैसला आएगा...

जजमेंट रिज़र्व करके एक साल बीत गया हैं...

जो भी हो, जब भी फ़ैसला आएगा, मुझे अल्लाह की ज़ात से पूरी उम्मीद है कि हमारे हक़ में आएगा और हम सब रिहा हो जाएंगे...

तुम दुआ करते रहो...

तुम्हारा,

वाहिद

13 ऑगस्ट 2015 या दिवशी आर्थर रोडच्या अंधार कोठडीतून अब्दुल वाहिद शेखने हे शेवटचं पत्र त्याच्या पत्नीला लिहिलं होतं. न्यायव्यवस्थेवर त्याचा विश्वास होता आणि झालंही अगदी तसचं. पुढच्याच महिन्यात म्हणजे 11 सप्टेंबर 2015 रोजी मुंबई लोकल बॉम्बस्फोटाच्या गंभीर आरोपातून नऊ वर्षानंतर अब्दुल वाहिद शेखची निर्दोष मुक्तता झाली.

7 लोकल ट्रेन, 7 स्फोट आणि अनेक वर्षे चाललेला खटला, ही आहे मुंबईतील 7/11 बॉम्बस्फोट प्रकरणाची कहाणी. हल्ल्याला 19 वर्षे आणि सत्र न्यायालयातील निकालाला 10 वर्षे झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने 21 जुलै 2025 रोजी 12 आरोपींची शिक्षा रद्द केली.

या 12 आरोपींमध्ये अब्दुल वाहिद शेख नव्हता. तो तर 10 वर्षांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडला होता. मात्र तरीही तो अस्वस्थ होता. आपण निर्दोष मुक्त झालो याबद्दल आनंद साजरा करावा की, आपल्यासोबत ज्यांना पकडलं गेलं होतं ते अजूनही सुटलेले नाही याबद्दल दुःख व्यक्त करावं या द्विधा मनःस्थितीत अब्दुल होता… २१ जुलै २०२५. मुंबई उच्च न्यायालयात ११ जुलै २००६ च्या मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट या घटनेवर सुनावणी सुरु होती.

ही सुनावणी सुरु असताना न्यायालयात बसलेल्या अब्दुल वाहिद शेखच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं... न्यायव्यवस्थेवर ठेवलेला विश्वास, तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने दिलेला नऊ वर्षांचा लढा या सगळ्या गोष्टींचं आज चीज झालं होतं... त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे समाधानाचे होते...समाधान या गोष्टीचं की, ११ जुलै २००६ च्या मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याप्रकरणी ज्यांना पकडण्यात आलं होतं ते १२ जण निर्दोष असूनही त्यांना गुन्हेगार ठरवून आयुष्याची १९ वर्ष तुरुंगात राहावं लागलं... त्यांची आज निर्दोष मुक्तता होणार होती...

न्यायालयात सुनावणी सुरु होती.. अब्दुलच्या मनात मात्र वेगळंच काही सुरु होतं...त्याला १० वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला... जेव्हा अब्दुल वाहिद स्वतः न्यायालयातील कटघर्‍यात उभा होता. त्यादिवशीची सुनावणी ही अब्दुल वाहिद शेख वर सुरु असलेल्या खटल्यावर चालू होती.. निर्दोष असूनही आयुष्याची तब्ब्ल नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यावर अखेर ११ सप्टेंबर २०१५ ला अब्दुलची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती… हे सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरून जात होतं...

कौटुंबिक, सामाजिक सगळी इज्जत मातीत मिसळून गेल्यावर बाइज्जत बरी?

सर्वसामान्य भारतीय नागरिकांसारखाच रोजीरोटीच्या रोजच्याच जद्दोजहद मध्ये अडकलेल्या एका प्राथमिक शिक्षकाची ही कहाणी आहे. त्याचा कुटुंबातील एकुलता एक कमवता म्हणून म्हातारे आई वडील, भाऊ, बायको आणि चिमुकली मुलं अशा सर्वांना कष्टाने पोसून आनंदी राहण्याच्या वाटेवर व्यवस्थेचे सैतानी काटे आहेत.

त्याची चूक एकच आहे, तो मुसलमान आहे. जुलै 2006 च्या मुंबई लोकलच्या बॉम्बस्फोटाच्या पाच महिन्यांच्या तपासणीनंतर मोका, पोटा आणि अनलॉक फुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट, म्हणजे देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अब्दुल वाहिदला अटक केली जाते आणि समोर येतो अन्यायकारक दमनकारी यंत्रणेचा बेसूर चेहरा.

वाहिदवर चार पाकिस्तानी दहशतवाद्याना आसरा दिल्याचा आरोप ठेवला जातो. वाहिदसोबत अजून बारा मुस्लिम तरुणांना आरोपी केले जाते. पुढील नऊ वर्षे अब्दुल वाहिद शेखने प्रचंड अन्याय होत असताना, कायद्यावर विश्वास ठेवून केलेला संविधानिक संघर्ष केला.

 (अब्दुल वाहिद आपल्या परिवारासोबत )

नऊ वर्षाच्या प्रचंड शारीरिक, मानसिक, कौटुंबिक उद्धवस्तीकरणानंतर सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाचा निकाल अब्दुल वाहिदच्या कानावर पडतो. "तमाम सबूतो और गवाह को मद्देनजर रखते हुए, ये अदालत आरोपी अब्दुल वाहिद शेख को बा इज्जत बरी करती है…"

नऊ वर्षाची जवानी, कौटुंबिक, सामाजिक सगळी इज्जत मातीत मिसळून गेल्यावर बाइज्जत बरी? या 'बाइज्जत बरी' नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.

बळजबरीने कबुलीजबाबावर पोलिसांनी घेतलेली स्वाक्षरी...तुरुंगात असताना आपल्यावर झालेला अमानुष छळ, अंधार कोढतीली त्या नऊ वर्षात घरी बायका-लेकरांची झालेली आबाळ, तुरुंगात असतांना वाचलेली आणि लिहिलेली पुस्तकं, तुरुंगातून बाहेर पडल्यावरही इतर १२ आरोपी निर्दोष सुटावेत यासाठी सुरू केलेली मोहीम... हे सगळं काही क्षणात अब्दुलच्या डोळ्यासमोरून गेलं... आणि न्यायालयात अखेर ते शब्द अब्दुलच्या कानावर पडले... "पुराव्यांअभावी त्यांनी हा गुन्हा केला आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे." अब्दुल क्षणात भूतकाळातून वर्तमानात परत आला.... न्यायालयाच्या बाहेर, तो १२ निर्दोषांना कडकडून मिठी मारत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण त्या अश्रूंमध्ये एक प्रकारची मुक्तीही होती...

२४ जुलै २०२५. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अब्दुल वाहिदला गेल्या दहा वर्षात जितक्या मुलाखती द्याव्या लागल्या नाहीत तितक्या हा निकाल लागल्यानंतर तो देत सुटलाय. देशातील अनेक न्यूज चॅनेल, युट्यूब चॅनेल, आणि देशातील नामंकित माध्यम समूह त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वेळ घेत आहेत, मिळेल त्या वेळेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायेत… या सर्व गडबडीत अब्दुल वाहिद शेख यांनी 'बाईमाणूस'शी बोलण्यासाठीही वेळ दिलाय. रात्रीचे ११.३० वाजलेत अब्दुल त्यांचे दिवसभराचे काम उरकून तीन ठिकाणी मुलाखत देऊन नुकतेच घरी आले आहेत.

"दुपारी १ ते रात्री १२ पर्यंत माझा वेळ हा अनेक चॅनेलच्या पत्रकारांशी बोलण्यातच जातोय... या सर्व गडबडीत मला घर ही सांभाळायचं आहे... मुलं बायको तक्रार करतायेत की, तुम्हाला आमच्यासोबत बसून दोन घास खायला पण वेळ नाहीये... माझी मोजून चार तासच झोप होतीये..पण तुम्हा सगळ्या लोकांना वेळ देणं आणि तुमच्याशी बोलणं ही गरजेचं आहे.."

अब्दुल वाहिद सांगत असतो.

तुरुंगातून सुटल्यानंतर अब्दुल वाहिद त्याच्या आगामी दोन पुस्तकांचं काम पूर्ण करत आहे. यामध्ये एक स्वत:ची आत्मकथा आहे आणि दुसरं 'लव्ह लेटर्स फ्रॉम द जेल' आहे. हाच धागा पकडून गप्पांची सुरूवात झाली.

तुरुंगातून बायकोला किमान एक हजार प्रेमपत्र लिहिली असतील…

'अशी किती प्रेमपत्र तुम्ही एकमेकांना लिहिली आहेत'?

''एक हजार तरी असतील… मी तब्बूला तुरुंगामध्ये असताना अनेक प्रेमपत्र लिहिली होती आणि त्या पत्रांना तिनेही पत्रांद्वारेच उत्तरं दिली आहेत. फैज अहमद फैजचा एक शेर आहे, "कर रहा था गमों का हिसाब, आज तुम याद बेहिसाब आये.." त्यामुळे आमच्या प्रेमपत्रांवर आधारित जे पुस्तक येणार आहे त्याचं नावदेखील "आज तुम याद बेहिसाब आये... " हे असणार आहे. हेच पुस्तक इंग्रजीमध्ये 'Love Letters From The Jail' या नावाने असेल. या पुस्तकामध्ये किमान हजार पत्र तरी असतील पण ती सगळी उर्दू मध्ये असल्यामुले मला हिंदीत अनुवाद करायला गेल्या वर्षभरापासून वेळच मिळत नाहीये आणि इतर कोणाला हे काम दिलं तर त्यासाठी माझ्याकडे पैसेच नाहीयेत.'' अब्दुल वाहिद सांगत असतात.

"मी तब्बल नऊ वर्ष तुरुंगात खितपत पडलो होतो त्यामुळे मला लिहायला वाचायला वेळच वेळ होता. तुरुंगात असतानाच माझी दोन पुस्तकं लिहून पूर्ण झाली. 'बेगुनाह कैदी' आणि 'इशरत जहाँ एनकॉउंटर'... तसं बघायला गेलं तर मला नाही वाटत की, मी तुरुंगात गेलो नसतो तर मी लेखक झालो असतो. कारण लेखक घडायलाही काही कारणं असतात. ज्या गुन्ह्यांमध्ये मला आणि माझ्या सोबत इतर १२ जणांना फसवण्यात आलं होतं, त्या सगळ्यांच म्हणणं ना पोलीस ऐकत होते, ना SIT चे अधिकारी, ना न्यायालय… तुरुंगात आमच्यासोबत जे घडत होतं ते बाहेरच्या जगाला सांगणं खूपच गरजेचं होतं, असं मला नेहमी वाटायचं. आणि मग त्यातून 'बेगुनाह कैदी' या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकात अशा काही घटनांचा उल्लख आहे ज्या कधी समोर आल्याच नसत्या आणि येऊही दिल्या नसत्या."

अब्दुल वाहिद यांच्या 'बेगुनाह कैदी' या पुस्तकात कशाप्रकारे अब्दुल वाहिदसह मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील इतर १२ जणांना फसवून गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलं याचा उल्लेख आहे. हे पुस्तक त्यांनी तुरुंगात लिहिलं आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर ते प्रकशित केलं.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो सध्या काय करतो…?

सध्या अब्दुल वाहिद शेख आणि त्याचं कुटुंब मुंबईतील विक्रोळी पार्क साईटच्या चाळीमध्ये राहतं. 'वन बीएचके' असलेल्या या घरात अब्दुल वाहिद, पत्नी तबस्सूम शेख, त्याचा पाचवीत शिकणारा मुलगा खिझर, चौथीत असलेला अशर आणि अब्दुलची आई राहते. त्याचा सर्वात मोठा मुलगा उमर हा कर्नाटक मध्ये उच्चशिक्षण घेतोय तर उमरा ही त्याची मुलगी हैद्राबादमध्ये उच्चशिक्षण घेतेय. अब्दुल वाहिदला अटक झाल्यानंतर एक वर्षाने त्याच्या वडिलांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला.

'बेगुनाह कैदी' या पुस्तकात स्वत:बद्दलची ओळख सांगताना अब्दुल वाहिद लिहितात, "में बचपन से घाटकोपर, मुंबई में रहता हूँ। पढ़ाई पूरी करके मैं अंजुमन इस्लाम अब्दुस्सत्तार शुऐब स्कूल, मुंबई में बतौर अध्यापक रोज़गार से जुड़ गया। 2003 में मेरा निकाह हुआ। चूँकि घाटकोपर का घर छोटा था, इसलिए में शादी के बाद मुंब्रा में किराये के फ़्लैट में रहने लगा। मेरे घर में मेरे माँ-बाप, मेरी बीवी, दो बच्चे, मेरे दो छोटे भाई और उनका परिवार रहता है."

अब्दुल तुरुंगात गेल्यावर मुलांच्या शिक्षणाची आणि घराची जबाबदारी त्याच्या बायकोवर पडली. तबस्सूम शेख यांनी ती व्यवस्थितपणे पारही पाडली. तबस्सूम सांगतात, "आयुष्याची नऊ वर्ष माझ्या नवऱ्याने तुरुंगात घालवली. त्या नऊ वर्षात माझ्या कुटुंबाला बऱ्याच त्रासातून जावं लागलं. मुलं मोठी होत होती परंतू आपल्या बापाला बघू शकत नव्हती. मला ठाम विश्वास होता माझे पती तुरुंगातून सुटतीलच.''

''मी बऱ्याच घटना अशा बघितल्या आहेत की नवरा तुरुंगात गेल्यावर बायको त्याची साथ सोडून देते, पण माझ्या तबस्सूमने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला धीर दिला... मी तुरुंगातून स्वतःसाठी आणि ती तुरूंगाबाहेर कुटुंबासाठी लढा देत होती.." अब्दुल सांगत असतो.

 (मुंबईतील नागपाडा येथील 'अंजुमन इस्लाम' शाळेतील विद्यार्थ्यांसोबत )

अटक होण्यापूर्वी अब्दुल वाहिदचं आयुष्य सामान्य व्यक्तीप्रमाणेच होतं. तो मुंबईतील नागपाडा येथील 'अंजुमन इस्लाम' या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान हे विषय शिकवायचा. अब्दुल वाहिदला प्राध्यापक व्हायचं होतं म्हणून सकाळी ७ ते दुपारी १ शाळेत मुलांना शिकवायचा. त्यानंतर नेट-सेट या परीक्षेच्या अभ्यासाला तो वेळ द्यायचा. उरलेला वेळ त्यांच्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत घालवायचा.

मात्र ११ जुलै २००६ ला मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला आणि अब्दुलचं आयुष्य उध्वस्त झालं… त्या दिवशी 11 मिनिटांच्या अंतराने लोकल ट्रेनमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते. हे स्फोट माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकांवर झाले होते. १८७ जणांचा त्यात जीव गेला, ८२४ लोकं जखमी झाले.. मुंबईसह सबंध देश हादरला होता. या घटनेच्या बातम्या अब्दुल वाहिद शेख कुटुंबासोबत टीव्हीवर बघत होता.

११ जुलै २००६… मुंबई लोकल बॉम्बस्फोटानंतरची सकाळ

बॉम्बस्फोटानंतरची दुसऱ्या दिवशीची सकाळ अब्दुल वाहिदला आजही आठवते. तो सांगायला सुरूवात करोत. "१२ जुलैला सकाळी मला दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. माझ्यासोबत आणखी १२ जणांनाही त्याठिकाणी बोलावलं होतं. सिमी (SIMI - Students' Islamic Movement of India) या भारत सरकारने बंदी घातलेल्या संघटनेशी आमचे काही संबंध आहेत का हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. पोलिसांनी आमची जुजबी चौकशी केली आणि सोडून दिलं''

सिमी ही संघटना १९७७ साली अलीगढ येथे स्थापन झाली होती. सुरुवातीला तिचा उद्देश मुस्लिम विद्यार्थ्यांना इस्लामी तत्त्वांनुसार मार्गदर्शन करणे व समाजकार्यात सक्रिय करणे असा होता. पण पुढे सिमीने धर्मनिरपेक्षता, लोकशाही व भारतीय संविधानाचा विरोध करत इस्लामी कायद्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याची भूमिका घेतली असा आरोप या संघटनेवर ठेवण्यात आला. त्यावेळच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या मते सिमीचे दहशतवादी संघटनांशी संबंध होते, त्यामुळे २००१ साली भारत सरकारने सिमीवर बंदी घातली आणि आजही ती बंदी कायम आहे.

सिमीशी खरोखर संबंध होता का असं विचारल्यानंतर अब्दुल वाहिद सांगतो की, काही वर्षांपूर्वी म्हणजे २००१ साली विक्रोळीतील पार्कसाईट येथील रस्त्यावर उभा असताना पोलिसांनी मला उचललं आणि तुरुंगात डांबलं. मी कधीही सिमीचा कार्यकर्ता किंवा सभासद नव्हतो. मात्र तरीही मला या प्रकरणात गोवण्यात आलं आणि कोर्टाने मला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. दोन महिन्यांनी मी जामिनावर बाहेर आलो

मुंबईत साखळी स्फोट झाल्यानंतर नेमक्या याच कारणामुळे पोलिसांनी अब्दुल वाहिदकडे संशयित आरोपी म्हणून पाहायला सुरुवात केली होती. त्याला वारंवार पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं जायचं, त्याच्या घरी रात्री-बेरात्री पोलिसांच्या धाडी पडायच्या. तीन-तीन दिवस पोलीस कोठडीत डांबून त्यांचा छळ केला जायचा मग पुन्हा त्याला सोडून द्यायचे. त्याच्या भावाची, कुटुंबियांची वारंवार घरी येऊन चौकशी करायची… हे सगळ तीन महिने सतत सुरू होतं आणि अब्दुलने प्रत्येकवेळी पोलिसांना सहकार्य केलं.

२९ सप्टेंबर २००६ रोजी ATS अधिकाऱ्यांचा अब्दुलला फोन आला.अब्दुल म्हणतो,

''सुबह के वक्त ए.टी.एस. हवालदार दिलीप भास्कर घाग का फ़ोन मेरे मोबाइल पर आया। उसने कहा कि वे तुझे कुछ फ़ोटो दिखाना चाहते हैं कि क्या तू उनको जानता है या नहीं? मैंने कहा कि मैं तो वहाँ रोज़ ही हाज़िरी लगाने आता हूँ, आज इतनी जल्दी क्या है? मैं जुमा की नमाज़ पढ़कर आता हूँ। उसने कहा ताजने साहब ने कहा है कि बहुत अर्जंट है। मैंने फोन काट दिया। वह बार-बार फोन करता रहा और कहा कि जल्दी से रिक्शा पकड़कर आना। मैं जल्दी से रिक्शा में सवार हुआ। फिर उसका फोन आया। उसने कहा कि वह श्रेयस सिनेमा के पास गाडी लेकर खड़ा है। वहीं आजा। में श्रेयस सिनेमा के पास उतर गया। घाग ने अपनी गाड़ी में मुझे बिठा लिया। वह पहले कालाचौकी ले गया फिर वहाँ से भोईवाड़ा ले गया। वहाँ एक कमरे में मेरा साला साजिद अनसारी और दूसरे कमरे में एक दाढ़ीवाला व्यक्ति बैठा था। फिर हम तीनों को हथकड़ी पहनाकर के.ई.एम. अस्पताल ले गये। वहाँ जाने से पहले ए.टी.एस. वालों ने मुझे धमकी दी थी कि डॉक्टर के सामने चुप रहना। उसके बाद कोर्ट रूम के बाहर सचिन कदम ने मुझे धमकी दी कि वाहिद, अदालत में जज के सामने अपनी जबान बन्द रखना। मैंने कुछ कहना चाहा तो उसने मुझे रोककर कहा कि अगर कोई शिकायत की तो पुलिस कस्टडी में लेकर तुझे बहुत टार्चर करेंगे। मैंने उससे पूछा कि आख़िर मुझे किस केस में गिरफ़्तार कर रहे हो? तो उसने कहा कि बोरीवली का एक क़त्ल केस है, सिर्फ़ कस्टडी में लेने के लिए तुम्हें गिरफ़्तार कर रहे हैं। फिर हमें जज के सामने पेश किया गया। माजिद ने रो-रोकर कहा कि वह बेगुनाह है और उसे क्यों पकड़ा गया है उसे नहीं मालूम। जज ठिपसे ने कहा कि शक के आधार पर तुमको पकड़ा गया है, अगर तुम निर्दोष हो तो तुम्हें छोड़ दिय जाएगा। पुलिस की धमकी के कारण में जज के सामने चुप रहा।"

गुप्तांगावर इलेक्टिक शॉक, पार्श्वभागात केमिकल, थर्ड डिग्री टॉर्चर

२९ सप्टेंबर २००६ ते ११ सप्टेंबर २०२५… त्या दिवसांपासून पुढची नऊ वर्ष अब्दुल वाहिद त्यानंतर तुरुंगातच खितपत पडला होता.

अब्दुल वाहिद आणि त्यांच्यासोबत ज्या १२ जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं त्या सर्वांना १९ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त सोडलं. जर हे सर्व जण निर्दोष होते तर यांनी कबुलीजबाबावर सही का केली होती? हा प्रश्न सहजपणे कोणाला ही पडेल. यावर अब्दुल वाहिद म्हणतो की,

"पोलीस तुमचा इतका छळ करतात की त्या दबावाखाली येऊन पोलीस जिथे म्हणतील तिथे सही करायला तुम्ही तयार होता. या केसमध्ये फसलेल्या सगळ्या आरोपींना थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आलं... हे यासाठी की कबुलीजबाबवर आम्ही सही करावी म्हणून... आमच्या गुप्तांगावर इलेक्टिक शॉक दिला गेला.. उलटं लटकवून मारहाण केली, आमच्या पार्श्वभागात केमिकल टाकलं गेलं, जेणेकरून आमच्या पूर्ण शरीरात बर्निंग सेन्सेशन होतील. त्याने तरआम्ही अक्षरशः तडफडत होतो. अंधारमय खोलीत कित्येक दिवस आम्हाला ठेवण्यात आलं. अतिशय थंड असलेल्या खोलीमध्ये कित्येक दिवस बिना कपड्याचं ठेवण्यात आलं. आमच्या घरच्यांना बोलावलं गेलं, माझ्या बायकोला मुला -मुलींना समोर ठेवून हिच्यावर आम्ही तुझ्यासमोर बलात्कार करू असं म्हणून कित्येकदा आम्हाला छळलं गेलं.. यामागचा उद्देश एकच होता की, आम्ही कबुली जबाबावर सही करावी. गेल्या १९ वर्षांपासून आम्ही उच्च न्यायालयात सांगत होतो की आमचा छळ करून आमचा कबुलीजबाब नोंदवून घेतला.. आता १९ वर्षानंतर उच्च न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकलं की, "आम्ही स्वतः कबुली जबाब दिला नव्हता तर आमचा छळ करून तो करवून घेण्यात आला होता.."

पोलिसांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही…

या सगळ्या प्रवासामध्ये अब्दुल वाहिद शेखची कायदेशीर बाजू अॅडव्होकेट इब्राहिम हर्बट यांनी सांभाळली. फक्त अब्दुलची निर्दोष सुटका व्हावी म्हणूनच नव्हे तर त्याची सुटका झाल्यानंतर आलेल्या अडचणींसाठीही इब्राहिम हर्बट यांनी कायदेशीर मदत केली.

अब्दुल वाहिद ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते त्याच शाळेत पुन्हा त्यांना शिक्षक म्हणून रुजू करण्यासाठी आणि जेवढा कालावधी अब्दुल वाहिद तुरुंगात होते त्या वेळेचा पगार त्यांना मिळावा यासाठीही त्यांनी कायदेशीर लढाई लढली.

इब्राहिम हर्बट सांगतात की,

"अब्दुल वाहिद शेख यांच्यावर 2006 मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी कट रचल्याचा, 'लष्कर-ए-तोयबा'शी संबंध असल्याचा आणि दशतवाद्यांना स्फोटक पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप सिद्ध करा, असे जेव्हा न्यायालयाने पोलिसांना सांगितले तेव्हा त्यापैकी एकही आरोप पोलीस आणि एटीएस अधिकारी सिद्ध करू शकले नाही. अब्दुल वाहिद यांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे दहशतवाद्यांना राहायला जागा दिली असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्या व्यक्तीने पोलिसांना कबुलीजबाब लिहून दिला होता की अब्दुल शेखला मी दहशतवाद्यांसोबत बघितलंय त्या व्यक्तीनेही न्यायालयात उभं राहिल्यावर सांगितलं की, " ना वाहिद शेखला मी भाड्याने घर दिलं होतं, ना मी त्यांना कोणत्याही दहशतवाद्यांसोबत बघितलं. पोलिसांच्या दबावाखाली मी कबुलीजबाबीवर सही केली होती." त्या व्यक्तीच्या या साक्षीवर आणि अब्दुल वाहिद यांच्याविरुद्ध कोणतेही गुन्हे सिद्ध न झाल्याने अब्दुल वाहिद यांची निर्दोष मुक्तता झाली."

Prison Literature… अब्दुल वाहिदचा PhD चा विषय

तुरुंगातून निर्दोष सुटका झाल्यानंतर अब्दुलला आता PhD स्कॉलर बनण्याचे वेध लागले आहेत. तुरुंगात असतानाच त्याने MA in English ची पदवी घेतली, त्यानंतर पत्रकारितेची डिग्रीदेखील घेतली. त्याला असंही वाटलं की आपण कायद्याचे शिक्षण घेतले पाहिजे, मग 2007 मध्ये त्याने कायद्याचं (LLB) शिक्षण सुरू केलं. 2015 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई येथून LLB पदवी प्राप्त केली. LLB पदवी प्राप्त केली. नुकतीच अब्दुल वाहिदला PhD पदवीदेखील प्राप्त झाली आहे. छ. संभाजी नगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठातून त्याने PhD मिळवली आहे.

अब्दुलचा PhD चा विषय देखील अतिशय वेगळा आहे. "Prison Literature" या आपल्या संशोधनाच्या विषयावर बोलताना तो सांगतो की, "भारतीय उपखंडात फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर राजकीय कैद्यांनी उर्दूमध्ये लिहिलेलं साहित्य''हा माझ्या संशोधनाचा विषय आहे.

यामध्ये कविता आणि इतर सर्व प्रकारचं लिखाण आहे. जवळपास १०० अशी पुस्तकं अब्दुलने शोधून काढली आहेत, जी तुरुंगातून लिहिली गेली. त्यापैकी ४३ पुस्तकांचं अब्दुलने चिकित्सक पद्धतीने विश्लेषण केलं आहे. गीतकार मजरूह सुल्तानपुरी, अली सरदार जाफरी ,फैज अहमद फैज आहे, हबीब जलीब या सगळ्यांनी तुरुंगात असताना साहित्य निर्मिती केली होती. या सगळ्यांचा वेध अब्दुलने त्याच्या संशोधनात घेतला आहे. उर्दू कवितांमधील नज़्म, रुबाई, मर्सिया, मसनवी, हाम्द, नात, कहमक यांचेही त्याने विश्लेषण केले आहे.

फाळणीदरम्यान तुरुंगातून लिहिलेलं साहित्य फारसं उपलब्ध नाहीये, मात्र अब्दुल सांगतो की, मी ते सगळं साहित्य शोधून काढलं. "मी स्वतः अनेक ठिकाणी गेलो, अनेक तुरुंगांना भेटी दिल्या. तुरुंगामध्ये कोण कोण होतं? त्यांनी काय लिहिलं? जे लिहिलं ते प्रकशित झालं का? जर प्रकशित झालं तर ती पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध नाहीत, मग ती कुठे मिळतील, कोणत्या दुकानात मिळतील असे अनेक प्रश्न होते. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टींचा शोध घेतला. त्या लोकांपर्यंत जेव्हा मी पोहोचलो तेव्हा कोणी मला भेट म्हणून ते पुस्तक दिलं, कुणाकडे फक्त एकच पुस्तक होतं तर त्यांनी मला त्या पुस्तकाची झेरॉक्स काढून दिली.''

''कित्येक राज्यात मी गेलो, कित्येक जिल्ह्यात मी गेलो.. कित्येक शहरात गेलो... हात जोडले लोकांच्या घरी जाऊन.. काय लिहिलंय ते मला दाखवा? मला वाचू द्या? जे तुरुंगात अजूनही आहेत त्यांच्या घरी जाऊन घरच्यांशी भेटलो... जे लेखक हयात नाहीत त्यांच्या कुटुंबांशी बोललो... उत्तरप्रदेशमधील रामपूर येथील एका मौलानाकडे अनेक जुनी मासिकं आहेत, ज्या मध्ये फाळणीदरम्यान लेखकांनी लिहिलेले लेख होते. अशाप्रकारे मी संशोधन करत गेलो.."

अब्दुल वाहिद यांच्या पीएचडीचे गाईड डॉ. आस्वाद गव्हार आहेत. २०२५ छ. संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाकडून अब्दुल वाहिद यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. अब्दुल वाहिद आता डॉ. अब्दुल वाहिद झालेत. मात्र हे सगळं खूप उशिरा झालं. 'आयुष्याची अनेक वर्ष वाया गेली यांची खंत नेहमीच मनात राहील' असं वाहिद सांगतात.

तुरुंगात गेलो नसतो तर मी लेखक झालो नसतो…

तुरुंगात असतानाच अब्दुलची दोन पुस्तकं लिहून पूर्ण झाली आहेत. 'बेगुनाह कैदी' आणि 'इशरत जहाँ एनकॉउंटर'...

आपल्या या पुस्तकांबद्दल अब्दुल म्हणतो,

''तसं बघायला गेलं तर मला नाही वाटत की, मी तुरुंगात गेलो नसतो तर मी लेखक झालो असतो.कारण लेखक घडायलाही काही कारणं असतात. ज्या गुन्ह्यांमध्ये मला आणि माझ्या सोबत इतर १२ जणांना फसवण्यात आलं होतं, त्या सगळ्यांच म्हणणं ना पोलीस ऐकत होते, ना SIT चे अधिकारी, ना न्यायालय.. तुरुंगात आमच्यासोबत जे घडत होतं ते बाहेरच्या जगाला सांगणं खूपच गरजेचं होतं, असं मला नेहमी वाटायचं. मग त्यातून 'बेगुनाह कैदी' या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकात अशा काही घटनांचा उल्लख आहे ज्या कधी समोर आल्याच नसत्या आणि येऊही दिल्या नसत्या."

याशिवाय तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अब्दुल वाहिद त्याच्या आगामी दोन पुस्तकांचं काम पूर्ण करत आहे. यामध्ये एक स्वत:ची आत्मकथा आहे आणि दुसरं 'लव्ह लेटर्स फ्रॉम द जेल' आहे. अब्दुल आणि त्याच्या पत्नीने एकमेकांना लिहिलेल्या पत्रांवर आधारित 'लव्ह लेटर्स फ्रॉम द जेल' हे पुस्तक आहे.

 (अब्दुल वाहिद यांचे YouTube चॅनेल)

तुरुंगातून बाहेर आल्यावर अब्दुल वाहिदने निर्दोष असलेल्या पण तुरुंगात अडकलेल्या लोकांसाठी "Innocent Network" ही मोहीम सुरु केली आहे. जेणेकरून अशा लोकांपर्यंत पोहोचता येईल जे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकले आहेत आणि ज्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले असलं तरी त्यांच्यावरचा संशयाचा कलंक अजूनही मिटलेला नाही.

या नेटवर्कच्या माध्यमातून तो कैद्यांच्या कहाण्या समाजासमोर आणतो, त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देतो आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतो. "www.theinnocent.in" ही त्यांच्या नेटवर्कची वेबसाइट आहे, जिथे अशा खटल्यांचे दस्तऐवजीकरण, मुलाखती, न्यायालयीन माहिती आणि मार्गदर्शन दिलं जातं.

यामध्ये ते वकिलांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि पत्रकारांच्या मदतीने एक सामूहिक लढा उभा करत आहेत. अब्दुल वाहिदचं म्हणणं आहे की "हे नेटवर्क फक्त न्याय मिळवण्यासाठी नाही, तर समाजात चुकीच्या पद्धतीने गुन्हेगार ठरवण्यात येणाऱ्या लोकांविषयी जनजागृती करण्यासाठी आहे."

हिमोलिंफ… The invisible Blood अब्दुलच्या पुस्तकावरचा चित्रपट

हिमोलिंफ… The invisible Blood या नावाचा चित्रपट मे 2022 रोजी प्रदर्शित झाला. 'बेगुनाह कैदी' या हिंदी,उर्दू आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावरून हा चित्रपट करण्यात आलेला आहे. कथा अर्थातच अब्दुल वाहिद शेखची. व्यवस्थेने केलेल्या पराकोटीच्या अन्याय अत्याचाराची, आणि अब्दुल वाहिदने संविधानिक मार्गाने न हरता, केलेल्या जीवघेण्या संघर्षाची.

चित्रपटाचे नाव पण अगदी समर्पक आहे. हिमोलिंफ... ही जीवशास्त्रीय टॅमिनोलॉजी आहे. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असणारे प्राणी. जसे मानव, मांजर, उंदीर इत्यादी यांच्या शरीरामध्ये रक्त असते. आणि अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा नसणारे प्राणी. जसे किडे मुंगी गांडूळ इत्यादी यांच्या शरीरामध्ये रक्तासारखा जो पदार्थ असतो तो म्हणजेच हिमोलिंफ.

रक्त डोळ्याला दिसते. रक्त बघितल्यावर माणसाला वाईट वाटते. त्याची संवेदना जागृत होते. परंतु किड्या मुंग्यांचं रक्त उघड्या डोळ्यांना दिसत नसते. म्हणून माणसांची संवेदना जागृत होण्यास अडथळे निर्माण होतात होत नाही. व्यवस्था असेच काही माणसांचे रक्त हिमोलिंफ म्हणजे अदृश्य करून टाकते. त्यामुळे रक्ताभोवतीची संवेदना गायब करण्यात किंवा हीच संवेदना सिलेक्टिव्ह करण्यात ती यशस्वी होते.

ती खून, हत्या, आणि वध असे शब्दजंजाळ निर्माण करून माणसांचे मुडदे पाडणे जस्टीफाय करते. भारतीय राज्यघटना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणत्याही भारतीय नागरिकाविरुद्ध भेदभाव करण्यास मनाई करते. पण इथे दलित, आदिवासींच्या विरुद्ध छुपा आणि मुस्लिमाविरुद्ध उघड भेदभाव ज्यांची जबाबदारी संविधान राबविण्याची आहे. ती सत्ताच करते.

या चित्रपटाचे संवेदनशील दिग्दर्शन सुदर्शन गमरे याने केले आहे संवाद आणि पटकथा देखील सुदर्शननेच लिहिली आहे. रियाज अन्वर, रुचिरा जाधव, रोहित कोकाटे या कलाकारांनी त्यांच्या भूमिका केल्या आहेत.

Referance :

  1. Begunah Qaidi (Hindi book) - Aatankwaad ke jhootey muqaddmon mein phasaaye gaye Muslim nau jawanon ki daastaan
  2. https://sabrangindia.in/a-spectacle-of-injustice-undone-after-19-years-bombay-hcs-acquittal-in-the-7-11-mumbai-train-blasts-case-recognises-the-mis-use-of-torture-for-confession/
  3. https://en.wikipedia.org/wiki/Haemolymph:_Invisible_Blood
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus