पंढरपूर: यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी तब्बल 8 कोटी 92 लाख रुपयांचे दान केले आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हे दान 2 कोटींनी घटले आहे.
यावर्षी तब्बल 32 लाख भाविकांनी आषाढीनिमित्त पंढरीत दर्शन घेतले आहे. आता आषाढी यात्रेनंतर विठुरायाच्या चरणी कोट्यवधींचे दान जमा झाल्याचे समोर आले आहे. ( Ashadhi Wari 2026 )
समोर आलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीत भाविकांनी विठ्ठलाचरणी 71 लाख 44 हजार 078 रुपये अर्पण केले आहेत. तर 2 कोटी 93 लाख 97 हजार 076 रुपयांची देणगी दिली आहे. 83 लाख 47 हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, 46 लाख 31 हजार 103 रुपये भक्तनिवास, 2 कोटी 40 लाख 32 हजार 402 रुपये हुंडीपेटी, 15 लाख 27 हजार 443 रूपये परिवार देवता तसेच 96 लाख 72 हजार 937 रुपये सोने-चांदी अर्पण करण्यात आले आहे. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 45 लाख 20 हजार 439 इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले. मागील वर्षी आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाख 08 हजार 531 रुपये दान जमा झाले होते. तर या वर्षीच्या यात्रेत 8 कोटी 92 लाख 72 हजार 478 रूपये इतके दान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 1 कोटी 91 लाख 36 हजार इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे.
तसेच आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुमारे 4 लाख 95 हजार तर मुखदर्शन सुमारे 5 लाख 42 हजार वारकऱ्यांनी घेतले. त्याचबरोबर कळस दर्शन घेत सुमारे 32 लाख वारकऱ्यांनी आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात हजेरी लावली. यंदा भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समिती आणि प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या.

