बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासकामांच्या संकल्पनेतून बारामतीतील औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून सुमारे २० कोटी रुपये खर्चून अद्ययावत विश्रामगृह उभारण्यात आले आहे.
विश्रामगृहामध्ये अजितदादांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. या विश्रामगृहाचे उद्घाटन पुढील पंधरा दिवसांत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा 'देशमुख' पॅटर्नचीच सत्ता! १४ जागा जिंकत धीरज देशमुखांच्या 'सहकार पॅनेल'चा दणदणीत विजय!
पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त गुरुवारी (ता. १९) बारामतीत आले असताना सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामतीतील औद्योगिक विकासासंदर्भात माहिती दिली. अजितदादांच्या विकासाच्या संकल्पनेनुसार हे अद्ययावत विश्रामगृह उभारण्यात आले आहे. त्यासाठी एमआयडीसीने सुमारे २० कोटी रुपये खर्च केले आहेत. या विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची वेळ घेण्यात येणार आहे. पुढील पंधरा दिवसांत त्यांच्याकडून तारीख निश्चित करून उद्घाटन केले जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
विश्रामगृहात दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सकाळी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचे सामंत यांनी नमूद केले. अजितदादांनी बारामतीच्या विकासासाठी उभ्या केलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर या विश्रामगृहाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातूनही प्रयत्न केले जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
विशेष प्रतिनिधी
