बारामती : दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी आधी धमकीचा फोन आणि त्यानंतर थेट घराजवळ येऊन गोळीबार… बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे शनिवारी (ता. २१) सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या घराजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. मी डीके बोलतोय, दोन पेटी दे, अशा शब्दांत संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे कोळेकर यांनी सांगितले. या धमकीनंतर अवघ्या काही तासांतच सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराजवळ येत गाडीच्या दिशेने दोन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बारामती शहर पोलिसांचे पथक दाखल होऊन तपास सुरू करण्यात आला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचा दावा कोळेकर यांनी केला आहे. धमकीचा फोन आणि त्यानंतर झालेला गोळीबार यांचा परस्पर संबंध आहे का, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राणा सूर्यवंशी प्रकरणानंतर पुन्हा गंभीर घटना….
दरम्यान, बारामती परिसरात १८ ऑक्टोबर रोजी वादग्रस्त उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर आता बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार झाल्याने बारामतीतील गुन्हेगारी घटनांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, खंडणीची मागणी करून घराजवळ येत गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांचे धाडस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात सातत्याने गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन खंडणीच्या धमकीमागील सूत्रधार उघड करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विशेष प्रतिनिधी
