पुणे: काही दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत मांडलेला तक्रारीचा पाढा आता भाजपच्या दोन नगरसेविकांमधील तीव्र संघर्षाचे कारण ठरले आहे. काशेवाडी परिसरातील अवैध धंद्यांवरून सुरू झालेला हा वाद आता चारित्र्यहनन, व्हिडीओ मॉर्फिंग आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत पोहोचला आहे.
नेमके प्रकरण काय ?
काही आठवड्यांपूर्वी झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत भाजप नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. ड्रग्जचा व्यापार आणि बाहेरून महिलांना आणून चालवला जाणारा वेश्याव्यवसाय यावर त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, याच तक्रारीचा आधार घेत आता प्रभागातील राजकारण तापले आहे.
नगरसेविका अर्चना पाटील यांचे आरोप काय?
अर्चना पाटील यांच्या दाव्यानुसार, त्यांनी मांडलेल्या तक्रारीचा विपर्यास केला जात आहे.आयुक्तांसमोर केलेल्या तक्रारीचा व्हिडीओ जाणीवपूर्वक 'मॉर्फ' करून तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे."काशेवाडीतील स्थानिक महिलाच वेश्याव्यवसाय करतात" असा चुकीचा प्रचार सहकारी नगरसेविका मृणाल कांबळे, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते करत आहेत. असा आरोप पाटील यांनी केला आहे.
प्रभागात कोपरा बैठका घेऊन महिलांना माझ्या विरोधात भडकवले जात असून, माझे राजकीय आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जुन्या बॅनर वादाचा संदर्भ देऊन माझ्यावर आणि पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
नगरसेविका मृणाल कांबळेंकडून आरोपांचे खंडन!
या संपूर्ण वादावर मृणाल कांबळे यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. नगरसेविका मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या मते व्हायरल व्हिडीओमध्ये अर्चना पाटील यांनी जे वक्तव्य केले, त्यातून नागरिकांचा गैरसमज झाला असून तो रोष नैसर्गिक आहे. यात आपला, कुटुंबाचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा कोणताही सहभाग नाही.मी असा कोणताही प्रचार आणि प्रसार केला नाही उलट पाटील यांनी सातत्याने माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असून, प्रभागातील विकासकामांमध्येही खोडा घातल्याचा आरोप कांबळे यांनी केला.
प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारात या वादामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अर्चना पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. "पक्षाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन माझ्या पाठीशी उभे राहावे," अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तर मृणाल कांबळे यांनीही "पक्षाने आपली बाजू ऐकून घेऊन आपल्याला न्याय द्यावा," अशी भूमिका घेतली आहे.
एका बाजूला गुन्हेगारीमुक्त प्रभागाचा दावा आणि दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठेची लढाई, अशा कात्रीत काशेवाडीचे राजकारण अडकले आहे. आता पोलीस प्रशासन आणि भाजपचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष प्रतिनिधी

