बीड: २४१ कोटी रुपयांच्या कथित जमीन अधिग्रहण घोटाळ्या प्रकरणात अटकेत असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना राज्य शासनाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाकडून हा आदेश जारी करण्यात आला असून, अविनाश पाठकांच्या अटकेच्या दिवसापासूनच निलंबन लागू करण्यात आलेले आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2013 बॅचचे असलेले आयएएस अधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी सात मे रोजी लातूर येथून ताब्यात घेतले होते. अविनाश पाठक हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणात वेगाने तपास सुरू आहे.
जमीन अधिग्रहण भरपाई प्रकरणात अविनाश पाठक आणि इतर दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, बीडमधून बदली झाल्यानंतर देखील पदाचा गैरवापर करून बनावट भरपाई आदेश काढण्यात आले.आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून जमीन अधिग्रहण भरपाईचे आदेश जारी करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
लातूरचे रहिवासी असलेले अविनाश पाठक यांनी लातूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देखील पाहिली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात भूमी संपादन अधिकारी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल?
अविनाश पाठक यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कायद्याचे उल्लंघन करणे आणि धमकी देणे असे विविध गुन्हे अविनाश पाठक यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
