नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 'कॉकरोच पार्टी' संदर्भात वक्तव्य केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओतील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. जयशंकर यांनी अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी मार्को रुबिओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या सूत्रधारांना भारताच्या हवाली करण्याची विनंती केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
मूळ व्हिडिओ हा २४ मे २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत संयुक्त पत्रकार परिषदेमधील आहे. या परिषदेत भारत-अमेरिका संबंध, संरक्षण सहकार्य, व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली होती.
तपासात असे आढळून आले की, व्हायरल क्लिपमध्ये तांत्रिक फेरफार करून खोटा ऑडिओ आणि दिशाभूल करणारा मजकूर जोडण्यात आला आहे. त्यामुळे 'कॉकरोच जनता पार्टी'संदर्भातील दावा पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

