पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणार आहे. आता भंडारा, महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी किंवा परवाना बंधनकारक असणार आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ( FDA )
पत्रकार परिषदेत भंडाऱ्याच्या परवान्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, 'हा विषय सण, उत्सव, ईद किंवा गणेशोत्सवाचा नसून कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे. अन्न शिजवून त्याचे वाटप करणाऱ्या प्रत्येक संस्थेने, मंडळाने किंवा व्यक्तीने आधीपासूनच अस्तित्वात असलेले अन्न सुरक्षेचे स्टँडर्ड नियम पाळले पाहिजेत. यामध्ये नवीन असा कोणताही नियम लागू केलेला नाही. फेस्टिव्ह सीझन असो वा नसो, जिथे जिथे विनापरवाना, विनास्टँडर्ड किंवा प्रोटोकॉलशिवाय अन्न वाटप केले जाईल, तो थेट नियमभंग मानला जाईल. प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरने नोंदणीकृत परवाना घेणे आणि सुरक्षित अन्न पुरवणे ही एफडीएची नियमित प्रक्रिया आहे', असे तुकाराम मुंढे म्हणाले.
दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांमध्ये हजारो भाविक सहभागी होत असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत अधिक दक्षता घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सध्या अन्न व औषध प्रशासनाने आपल्या कामकाजाची व्याप्ती वाढवली असून राज्यभरात तब्बल 3100 आस्थापनांची कडक तपासणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणाऱ्या घटकांवर ही धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

