Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश

बखर Live 3 weeks ago

मुंबई : Ghatkopar घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर परिसरातील मुंबई महानगरपालिकेची मराठी शाळा क्रमांक २ बंद करून तिची जागा खाजगी शिक्षण संस्थेला देण्याच्या निर्णयाविरोधात सकल मराठी समाज-मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला आज हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.Ghatkopar

आज संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित या आंदोलनात मराठी भाषा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान "पालिका शाळा वाचवा", "मराठी शाळा सुरू करा", "शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाGhatkopar

यावेळी वक्त्यांनी आरोप केला की, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अनेक पालिका मराठी शाळा जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून बंद पाडल्या जात आहेत. या शाळांच्या मोक्याच्या जागा खाजगी शिक्षण संस्थांना देण्याचा नियोजित प्रयत्न सुरू असून, त्यामागे शिक्षण क्षेत्रातील आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की, पंतनगर येथील पालिका मराठी शाळा क्रमांक २ ची जागा कोणत्याही खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. सदर जागेवर मुंबई महानगरपालिकेने आधुनिक सुविधा असलेली नवीन मराठी शाळा उभारून ती पुन्हा सुरू करावी. तसेच मुंबईतील इतर बंद किंवा बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या पालिका शाळांबाबतही पारदर्शक धोरण जाहीर करावे.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी इशारा दिला की, मराठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारे आणि सार्वजनिक मालमत्ता खाजगी संस्थांच्या घशात घालणारे निर्णय यापुढे सहन केले जाणार नाहीत. प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात अधिक तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल.

सकल मराठी समाज-मुंबईच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले असून, पालिका शाळा व मराठी शिक्षण वाचविण्याचा लढा अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live