मुंबई : Government शासकीय नोकरीचे गाजर दाखवून एका वयोवृद्ध महिलेसह सातजणांची दोन भामट्यांनी सुमारे 68 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी योगेश जगन्नाथ पाटणकर आणि सूर्यकांत निवृत्ती मगरे या दोन्ही भामट्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील योगेशने स्वत:ला मंत्रालयातील कर्मचारी असल्याचे सांगून त्याची तिथे चांगली ओळख असल्याचे सांगून ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.Government
यातील तक्रारदार महिला ही जी. टी रुग्णालयात सिस्टर इचार्ज म्हणून निवृत्त झाली आहे. सध्या ती न्यू पनवले येथे राहत असून पूर्वी ती जी. टी रुग्णालयातील स्टाफ वसाहतीत राहत होती. तिच्याच शेजारी राहणारा आरोपी सूर्यकांत हा देखील रुग्णालयात कामाला होता. त्यानेच पीडित महिलेची ओळख दुसरा आरोपी योगेशशी करून दिली होती. योगेश मंत्रालयात कामाला असून त्याची तिथे चांगली ओळख आहे. त्यामुळे तो तुमच्या मुलाला शासकीय नोकरी मिळवून देईल, असे आश्वासन पीडित महिलेला देण्यात आले होते. सूर्यकांत आणि योगेश या दोघांवर विश्वास ठेवून पीडित महिलेने तिच्या मुलासाठी योगेशकडे शासकीय नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती.Government
पीडित महिलेच्या मुलाचे बीएसी बायोटेकचे शिक्षण पूर्ण झाल्याने योगेशने त्याला वरिष्ठ लिपीक म्हणून नोकरीचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्या दोघांनी पीडित महिलेकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही त्या दोघांनी पीडित महिलेच्या मुलाला नोकरी दिली नाही. याच दरम्यान दोन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या मुलाला खोपोलीजवळील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडीकलसाठी पाठविले होत. तिथे पीडित महिलेला काही उमेदवार मेडीकलसाठी आल्याचे दिसून आले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पीडित महिलेला समजले की, सूर्यकांत आणि योगेशने त्या सर्वांनाही शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 63 लाख 50 हजार रुपये घेतले आहेत. मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी दिली नाही.
जवळपास बारा वर्षांपासून ते सर्वजण नोकरीसाठी योगेश आणि सूर्यकांतकडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. मात्र त्या दोघांनी कोणालाही नोकरी दिली नाही. ही बाब समजताच पीडित महिलेसह इतर सर्वांनी दोन्ही आरोपींविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योगेश पाटणकर आणि सूर्यकांत मगरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तक्रारदार वयोवृद्ध महिलेसह सहाजणांची 68 लाख 50 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पोलिसांना सहाजणांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

