पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांवरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून, म्हणजे मंगळवारपासून पुढील १४ दिवसांसाठी पुणे शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका आणि सार्वजनिक सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
fuel price hike
पुणे पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(२)(३) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कामगार संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच आगामी बकरी ईद आणि इतर धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरभर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे किंवा मिरवणुका आयोजित करण्यास पूर्ण बंदी असेल. कोणत्याही प्रकारच्या भडकावू घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी वाजवणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच कोणत्याही राजकीय नेत्याचे, व्यक्तीचे किंवा संघटनांचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे, निषेधार्थ प्रतिकात्मक दहन करणे यावरही कठोर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह मजकूर असलेले फलक, पोस्टर्स किंवा चित्रे लावल्यास संबंधितांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आदेशाचे उल्लंघन करून कोणी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करू शकतील अशा वस्तू बाळगल्यास त्या तात्काळ जप्त केल्या जातील. संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
शहरातील स्वारगेट, मंडई, भवानी पेठ, कोंढवा, हडपसर, शिवाजीनगर आणि कॅम्प परिसरासारख्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलिस पथके तैनात करण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर अफवा किंवा भडकावू संदेश पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी

