Dailyhunt
जैन धर्मियांचा अल्पसंख्याक दर्जा भीक नाही घटनात्मक अधिकार, ललित गांधी यांनी केला मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा  निषेध

जैन धर्मियांचा अल्पसंख्याक दर्जा भीक नाही घटनात्मक अधिकार, ललित गांधी यांनी केला मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा निषेध

बखर Live 1 week ago

मुंबई: जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे, असल्याचे सांगत जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला आहे.

लोढा यांनी जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केल्याने वाद वाढला आहे. लोढांच्या या वक्तव्यावर जैन समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लोढांनी जैन समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे वक्तव्य केले. याबाबत ललित गांधी म्हणाले, जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वत:चे तीर्थंकर, स्वत:ची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत. परंतु, जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

पुढे बोलताना ललित गांधी म्हणाले, अल्पसंख्याक दर्जा हा एकप्रकारे आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्त्वालाच नाकारणे. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही, हे लोढा यांनी समजून घ्यावे, असा इशारा गांधी यांनी दिला आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले होते की, जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या 'फूट डालो आणि राज करो' या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे. एकेकाळी दक्षिण भारतात 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ 3 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लिम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले. मात्र, हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करुन कमकुवत केले. हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरु आहे. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवता येईल, असेही ते म्हणाले होते.

विशेष प्रतिनिधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live