पुणे: उद्धव ठाकरे हे पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. देहूत भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ( Jaykumar Gore )
संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमी श्रीक्षेत्र देहूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले आहे.
दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावरून जयकुमार गोरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे. गोरे म्हणाले, "सध्या विरोधी पक्षाला काही काम उरलेले नाही. विरोधीपक्षांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असतो, यासाठी संसदेत चर्चा करणे अपेक्षित असते. मात्र तसे न करता ते बाहेर आंदोलने करत बसतात. जनतेच्या लक्षात या गोष्टी येत आहेत".
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्लीत अभिजित दिपके यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. यावरूनही गोरेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्व आता राहिलेले नाही. ते त्यांचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील", असे म्हणत गोरेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर जयकुमार गोरे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सरकार सहमत आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेला काही वेळ लागतो. एखादा निर्णय घेतला की तो लगेच पूर्ण होत नाही. मनोज जरांगेंचे समाधान होईल अशा पद्धतीने सरकार काम करेल", असे आश्वासन जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले आहे.

