Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कागल येथील 'शाहू सृष्टी' जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा,  हसन मुश्रीफ यांचे निर्देश

कागल येथील 'शाहू सृष्टी' जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा, हसन मुश्रीफ यांचे निर्देश

बखर Live 1 week ago

मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची 'शाहू सृष्टी' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

'शाहू सृष्टी' केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. याबाबत थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखाना संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, पाणी पुरवठा सभापती प्रकाश गाडेकर, आनंदा पसारे, गजानन माने, शिवाजी मोरे, भिकाजी देवकर, विकास पाटील आदी उपस्थित होते.

Laxman Hake : 'शेवटचा लढा' म्हणत ओबीसींच्या आरक्षणावर घाला; जरांगेंच्या उपोषणावर हाकेंची टीका

हा प्रकल्प मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उभा राहणार आहे. प्रस्तावित सुविधा आणि विकास आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रस्तावित 'शाहू सृष्टी'मध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्याची आणि सामाजिक विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडणी करणारे जीवनकार्य आणि वारसा, तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा असलेला पर्यटक सुविधा क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थ व स्मृतिचिन्हांची दुकाने, साहसी उपक्रमांसाठी अडव्हेंचर पार्क, क्लब हाऊस, पर्यटन निवासाची सुविधाही प्रस्तावित आहे.

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण यातील योगदान तसेच त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी संशोधन, अध्ययन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्राचीही संकल्पना मांडण्यात आली आहे.

'शाहू सृष्टी'च्या विकासाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सादरीकरण शाहू सृष्टीचे आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

विशेष प्रतिनिधी
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: bakhar Live